सम ध्येय नाही
हजारो वर्षे येथे ग्रामसभा होत्या. त्यांना स्वायत्तता होती. त्यातून ग्रामाच्या संरक्षणासाठी आत्मबलिदान करावे ही निष्ठा निर्माण झाली होती हे वर सांगितलेच आहे. पण ग्रामाच्या मर्यादेपलीकडे या निष्ठेचा विकास झाला नाही. महाराष्ट्रात प्रारंभी विदर्भ, अश्मक, मूलक, गोपराष्ट्र, पंडुराष्ट्र असे प्रादेशिक विभाग सहजगत्याच झाले होते. तेथपर्यंतही या भूमिनिष्ठेची परिणती झाली नाही. ती झाली असती तर उत्तरेतल्या कठ, मालव, क्षुद्रक या गणराज्यांसारखी गणराज्ये येथे निर्माण झाली असती आणि मग त्यांचा विकास होऊन अनेक गणराज्यांचा एक महाराष्ट्र झाला असता. पण महाराष्ट्रात वा दक्षिणेतल्या अन्य प्रांतांतही गणराज्ये कधी झालीच नाहीत. इतिहासाच्या प्रारंभी येथे सातवाहन साम्राज्यच प्रस्थापित झाले आणि पुढे यादवअखेर साम्राज्य- परंपराच चालू राहिली. या साम्राज्यात वर सांगितल्याप्रमाणे ग्रामसभा होत्या, विषय, राष्ट्र यांच्या स्वायत्त सभा होत्या, व्यापारी, शेतकरी, कारागीर, ब्राह्मण यांच्या श्रेणी, पूरा, संघ यांसारख्या व्यावसायिक संघटनाही होत्या. पण त्यांतून महाराष्ट्रापुरती किंवा त्याहून लहान अशा एखाद्या प्रदेशापुरतीमुद्धा देशभावना किंवा सर्व समाजाच्या ऐक्याची भावना निर्माण झाली नाही. याचे कारण म. म. काणे यांनी म्हटल्याप्रमाणे, लहान लहान राज्ये, धर्म, राष्ट्र, अशा काही समध्येयांनी एकत्र संघटित करण्याचा प्रयत्न येथील राजनीतिशास्त्रज्ञांनी केला नाही. त्यांनी फक्त राजसत्तेचा विचार केला. यामुळे भारतात राजांची राज्ये झाली, लोकसंघटना झाली नाही. दक्षिणेत तर नाहीच, पण उत्तरेतही नाही. तेथे प्रथम निर्माण होऊन काही अंशी विकसित झालेली गणराज्येही विनाश पावली. आर्यभूमीविषयी निर्माण झालेली निष्ठाही पुढे लोपली आणि मोठमोठे राज्यकर्ते सम्राट व त्यांच्या साम्राज्यात, त्यांच्या कृपेने नांदणाऱ्या ग्रामसभेसारख्या स्वायत्त संस्था, असे भारताच्या शासनाला रूप येऊन तेच दीर्घकाल टिकून राहिले.
शारीर एकात्मता
याचे कारण म्हणजे व्यक्तीला व्यक्तीची प्रतिष्ठा न देणारे हिंदूंचे धर्मशास्त्र हे होय. समाज हा एक पुरुष होय व भिन्न वर्ग, भिन्न वर्ग, भिन्न जाती हे त्या पुरुषाच्या शरीराचे घटकावयव होत ही कल्पना प्राचीन काळापासून या देशात आहे. पण तीतून देशाच्या वा समाजाच्या शारीर एकात्मतेचे तत्त्व (ऑरगॅनिक थिअरी ऑफ स्टेट, ऑरगॅनिक व्ह्यू ऑफ सोसायटी) येथे निर्माण झाले नाही. शरिरात एका अवयाचे सुखदुःख तेच सर्व शरीराचे सुखदुःख असे असते. समाजात तसे असावे. शासनाने असे राज्य निर्माण करावे. पण यासाठी धार्मिक, सामाजिक, न्यायालयीन समता अवश्य असते. आणि हिंदुधर्मशास्त्रज्ञांनी अशी समता स्वप्नातही मान्य केली नाही. बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, स्पर्शबंदी यांचे शास्त्र सांगून समाजपुरुषाची
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४९
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना