असेल, काही मते कोणाला एकांगी वाटतील. असे अनेक दोष ग्रंथात सापडतील याची मला जाणीव आहे. पण मी आपल्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत एवढेच येथे मी नमूद करतो.
माझ्या आधी महाराष्ट्र संस्कृती या विषयावर तीन-चार पंडितांनी पुस्तके लिहिलेली आहेत. डॉ. शं. दा. पेंडसे यांनी 'महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास' हे पुस्तक लिहिले आहे. पण त्यांनी वेदवाङ्मयापासून प्रारंभ करून समर्थ रामदास यांच्यापर्यंतच लिहिले आहे, आणि वेद, उपनिषदे, सूत्रग्रंथ, स्मृतिग्रंथ यांच्या विवेचनावरच जास्त लक्ष दिलेले आहे. शिवाय संस्कृतीच्या धार्मिक अंगाच्या विवेचनावरच त्यांचा भर आहे. प्रा. वि. पां. दांडेकर (बडोदे) यांनी 'महाराष्ट्र' हे पुस्तक १९४७ साली लिहिले आहे. ते अगदी त्रोटक असून केवळ ११४ पृष्ठांचेच आहे. संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचा विस्तृत परामर्श घेणे एवढ्या लहान जागेत शक्यच नव्हते. प्रा. द. वा. डिकसळकर यांच्या 'महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास' या पुस्तकात यादव कालापर्यंतच इतिहास दिलेला आहे. संस्कृतीच्या सर्व अंगांचा परिचय करून देणारे पुस्तक म्हणजे प्रा. शेणोलीकर व प्रा. देशपांडे यांनी लिहिलेले- 'महाराष्ट्र संस्कृती' हे पुस्तक होय. हा ग्रंथ डेमी चारशे पृष्ठांचा म्हणजे तसा विस्तृत आहे. पण तो केवळ संकलनात्मक असून एम्. ए. च्या विद्यार्थ्यासाठी पाठ्यपुस्तक म्हणून लिहिलेला आहे, असे त्यांनीच प्रस्तावनेत म्हटले आहे. यावरून महाराष्ट्र संस्कृतीच्या सर्व अंगोपांगांचे संशोधन करून त्यांचा विस्तृत परामर्श घेणाऱ्या ग्रंथाची उणीव होती हे दिसून येईल. ती या ग्रंथाने भरून निघेल अशी आशा आहे. या ग्रंथात येणाऱ्या प्रत्येक विषयाचे अत्यंत बारकाईने संशोधन करून मी विस्तृत विवेचन केले आहे. विशेषतः सातवाहन ते यादव ही सर्व घराणी महाराष्ट्रीय राजघराणी होती की नाही या अत्यंत वादग्रस्त विषयाचे प्रदीर्घ विवेचन करून, त्याविषयी निघणाऱ्या सर्व आक्षेपांना उत्तर देऊन, ही सर्व घराणी महाराष्ट्रीयच होती असा सिद्धान्त मी मांडला आहे. वाचकांनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.