या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. या प्रदीर्घ काळाचे चार विभाग पडतात. सातवाहन ते यादव ( इ. पू. २३५ ते इ. स. १३१८ हा पहिला विभाग. १३१८ ते १६४७ हा मुस्लिम सत्तेचा काळ म्हणजे दुसरा विभाग. हाच बहामनी काल होय. १६४७ ते १८१८ हा मराठा काल म्हणजे तिसरा विभाग आणि १८१८ ते १९४७ हा ब्रिटिश सत्तेचा काळ म्हणजे चवथा विभाग होय.
धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. प्रत्येक कालखंडातील या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे केलेले आहे.
लो. टिळक, डॉ. भांडारकर, म. म. मिराशी, डॉ. आळतेकर, चिं. वि. वैद्य, डॉ. केतकर, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, डॉ. शं. दा. पेंडसे, डॉ. काणे, डॉ. धनंजयराव गाडगीळ, श्री. जावडेकर, सेतुमाधवराव पगडी, डॉ. मुनशी, डॉ. गोपालाचारी, नीलंकठ शास्त्री, डॉ. सेन, यदुनाथ सरकार, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, कृष्णस्वामी आयंगार, ह्यांसारख्या विख्यात पंडितांच्या ग्रंथांच्या आधारे हे सर्व विवेचन केलेले आहे. पण मते आणि दृष्टिकोण सर्वस्वी माझा आहे. त्यामुळे ग्रंथातील गुणदोषांची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे.
ह्या पंडितांच्या आधारे विवेचन केले असले तरी ग्रंथात त्रुटी अनेक राहिलेल्या असणे पूर्ण शक्य आहे. काही महत्त्वाच्या घटना, काही थोर कर्ते स्त्रीपुरुष यांचा निर्देश राहून गेला असेल, काही मांडणी मागे-पुढे झाली