पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचा विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. एक वर्षानंतर ४ मार्च १९११ रोजीच्या पत्रासोबत सयाजीरावांनी इंदुमतीदेवींची पत्रिका आणि छायाचित्र शाहू महाराजांकडे पाठवले. शाहू महाराजांनी इंदुमती देवींना पाहण्यासाठी बडोद्याला जाण्याचे निश्चित केल्यानंतर सयाजीरावांनी त्यांना स्वतः सोबत पुत्र राजारामांचा आरोग्यअहवाल आणण्याची सूचना २४ मार्च १९११ रोजीच्या पत्राद्वारे केली. आजही विवाह जुळवताना आपण वधू-वरांची जन्मपत्रिका आणि गुण जुळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो.
 या पार्श्वभूमीवर ११० वर्षापूर्वी वधू-वरांची आरोग्यपत्रिका तपासणे आवश्यक मानणाऱ्या सयाजीरावांची वैज्ञानिक दृष्टी आपल्याला थक्क करते. सयाजीरावांच्या या पत्राला उत्तर देताना शाहू महाराज लिहितात, " माझी पत्नी महाराणीसाहेब आणि आजीबाईसाहेब या जुन्या रूढी आणि परंपरांचा आदर करणाऱ्या आहेत. वर्षानुवर्षे ज्या ज्या पद्धतींचा आपण सन्मान करत आलोय, या मोडण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे राजपुत्राची अशी तपासणी करण्यासाठी मी त्याला मुंबईस आणणार नाही. आमच्यात अशी पद्धत नाही. राजपुत्राची आरोग्यटिपणही आम्ही ठेवलेले नाही. हवे तर राजवैद्यांना बरोबर आणतो.”

 यावर सयाजीराव शाहू महाराजांना लिहितात, “राजकुमारी इंदुमती बारा वर्षांची झाल्याशिवाय विवाह करता येणार नाही. बारा वर्षाअगोदर मुलीचे लग्न केल्यास बडोद्यातील प्रचलित

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४५