Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वीकारून पुढे जातो. समाजव्यवस्था बदलण्यावर त्याचा भर नाही. त्यांचा आग्रह घटनेतील कलमांना दुरुस्ती सुचविण्यासारखा आहे. त्यांना काही वाटा मोकळ्या हव्या आहेत.
 मराठी वाङ्मयात सामाजिक प्रक्षोभाचा अभाव हा प्रश्न मी अस्पृश्य वर्गापुरता मर्यादित मानीत नाही. बौद्ध, अबौद्ध, महार, चांभार, मांग, ढोर हा मानवसमाज गुलामीचे दलित जिणे जगत होता, व आजही त्या जीवनात फारसा बदल झालेला नाही, हे मला मान्यच आहे. पण याशेजारी आदिवासींचे विशाल समूह पसरलेले आहेत. त्यांत भटक्या जमाती, वन्य जमाती, गुन्हेगार जमाती या सर्वच आल्या. त्यांचेही जुने जग संपलेले आहे आणि नव्या जगाशी त्यांचा सांधा जुळलेला नाही. सर्व भारतभर पसरलेला मुस्लिम समाज असाच आहे. पाच कोटींपैकी पाच-चार टक्के वरिष्ठवर्ग सोडला, तर या समाजातील इतरांचे काय ? त्यांच्याही मनावर चमत्कारिक ताण पडलेले दिसतात. ग्रामीण भागातील राजकीय नेतृत्व मिळालेला सधन शेतकरी सोडल्यास उरलेला अफाट कुणबी शेतमजूर हाही असाच प्रचंड समाज आहे. परंपरा, अंधश्रद्धा, मनाचा मरगळलेपणा, दैववाद हे घटक या समाजात आहेतच. त्या जोडीला तिटकारा, तुच्छता, विफलता, चीड, अश्रद्धा, बेजबाबदारपणा यांचाही उदय होत आहे. या सर्वांच्या जीवनाचे वाङ्मयात प्रतिबिंब का पडत नाही?

 मराठीत ग्रामीण कथा नाही काय ? ग्रामीण कथा आहे, पण ती किस्स्यांच्या चक्रात अडकलेली आहे. शहरी वाचकवर्ग हा शेवटी शहरी नागरिक आहे. वरिष्ठवर्गीयत्वाचा अभिमान आणि सुशिक्षित असल्याचा दर्प या वर्गाच्या ठिकाणी भरपूर आहे. आपला देश जर अशिक्षित आणि मागासलेला देश असेल, ग्रामप्रधान देश असेल व अशा देशात प्रौढ सार्वत्रिक मतदानावर आधारलेला लोकशाहीचा प्रयोग चालू असेल, तर नवे नेतृत्व ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांचे किंवा अशिक्षितांचेच येणार. आणि या नेतृत्वाचा उदय होत असताना साचून राहिलेली पुष्कळशी घाण जाळीजळमटासह उसळून येणार, हे स्वाभाविकच आहे. घाणीचे समर्थन कुणीच करणार नाही. पण तिची सहानुभूतीने कारणमीमांसा तर केली पाहिजे. या शहरी वाचकवर्गाला लोकशाहीची ही प्रक्रियाच मान्य नाही. मुळात लोकशाहीवर त्यांचा खराखुरा विश्वासच नाही. आपली बौद्धिक अहंता व दर्प यांना आज क:पदार्थ लेखले जात आहे, याची चीड तेवढी या वाचकवर्गाला आहे. ग्रामीण समाज व जीवन हा या शहरी वाचकांच्या वांझोट्या उपहासाचा व फलशून्य चेष्टेचा विषय आहे. या नागर वाचकवर्गोचे मनोरंजन किस्सा असणारी ग्रामीण कथा आज करू पाहत आहे. ग्रामीण भागातील नासकेकुजकेपणाचे प्रदर्शन चटकदार शैलीत करून हा प्रयत्न होत आहे. भाषेचा, पोशाखाचा, क्वचित बाह्य रूपरेखेचा, शरीरवर्णनाचा अनोखेपणा, कथानकाचा मुद्दा जुळवून आणलेला सांकेतिक नवेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न, कथानक व कलाटणी याला प्राधान्य देणाऱ्या या कथेत आहे. या विनोदाला कोणतेही गंभीर प्रयोजन नाही. किस्सा हाही वाङ्मयाचाच एक प्रकार आहे. ललित वाङ्मयाचे मूल्य करमणुकीच्या उथळ विनोदी खळखळाटाला कदाचित

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ९१