पान:पायवाट (Payvat).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही भाग या वास्तव जीवनाच्या चिंतनाशी संबंधित असाच आहे. पण काव्याचा काही भाग समाजजीवनाच्या चित्रणाला तटस्थ राहू शकतो. अपवाद म्हणून कथा, कादंबरी, नाटकालाही असा तटस्थपणा स्वीकारता येतो, नाही असे नाही. पण या वाङ्मयप्रकारांचा निर्वाह फार काळ तटस्थपणावर राहू शकत नाही. कलावंतांनी अमुक वादाचा किंवा तमुक समस्येचा पुरस्कार करावा असा आग्रह नसून समाज ज्या अवस्थेतून जातो आहे, ज्या व्यथा, जी दुःखे भोगतो आहे, त्या व्यापक वास्तवाचे प्रतिबिंब वाङ्मयात पडावे या अपेक्षेतून, ते तसे पडते का नाही असा प्रश्न आहे. असे प्रतिबिंब जर वाङ्मयात अभिव्यक्त होऊ शकले, तर वाङ्मयातून प्रकटणाऱ्या जाणिवांची समृद्धी वाढेल. म्हणजे पर्यायाने वाङ्मयाची समृद्धी वाढेल. कलेच्या पातळीवरून वास्तवाच्या आकलनाचा आणखी एक टप्या गाठला जाईल व साहित्याच्या कक्षांचा विस्तार विविध परिमाणांनी होईल. हे जर घडू शकले तर आज वाङ्मयात पुन्हा जाणवू लागलेले आवर्त काहीसे समाप्त होतील. जीवनात अस्तित्वात असणारी, व्यापक प्रमाणात सर्वत्र आढळणारी ही वास्तवता प्रतिभावंतांना एक आव्हान म्हणून समोर उभी आहे. पण या आव्हानाचा स्वीकार मात्र दिसत नाही.

 चर्चेच्या ओघात असा एक मुद्दा उपस्थित झाला की, प्रत्येकच कलाकृती- जर ती अस्सल कलाकृती असेल तर-रसिकाला अस्वस्थ करतेच. कलासौंदर्याचा तो एक स्वभावच आहे. ही भूमिका मर्यादित अर्थाने खरी आहे. प्रत्येक अस्सल कलाकृती भावानुभवाची जी आकृती साकार करीत असते, तिची अपूर्वताच तिच्या आकलनाला थोडासा अडसर असते. तिच्याशी रमरस होताना रसिकांना अस्वस्थता जाणवतेच. सुखांतिका वाचतानाही हा अनुभव येतो. निसर्गसौंदर्यात न्हाऊन निघालेल्या कवितेच्या आस्वादातही हा अनुभव येतो. पण ही अस्वस्थता म्हणजे ज्याची आपण चर्चा करतो आहोत तो सामाजिक प्रक्षोभ नव्हे. शोकनाट्याचा आस्वाद घेताना तर आपण अधिकच अस्वस्थ होतो. त्याचा शेवट पाहून सुन्न होतो. घटनांची अपरिहार्यता पटली म्हणून अस्वस्थता कमी होत नाही. पण हाही सामाजिक प्रक्षोभ नव्हे. सामाजिक प्रक्षोभ हा समाजाच्या व्यथेचा हुंकार असतो. समाजाची व्यथा ही व्यक्तींची व्यथा असतेच. पण व्यक्तींच्या सर्वच व्यथांचे स्वरूप सामाजिक नसते. व्यथा आणि वेदना यांचे चित्रण म्हणजे सामाजिक प्रक्षोभ नव्हे. सामाजिक प्रक्षोभाच्या मागे समाजरचनेला आणि प्रस्थापित मूल्यांना आव्हान देणारे एक बंडखोर मन उभे असते. सगळ्याच समाजसुधारणावादी कादंबऱ्या या अर्थाने प्रक्षोभक नसतात. हरिभाऊंची 'पण लक्षात कोण घेतो ? 'सारखी अस्सल कलाकृती सामाजिक व्यथेला मुम्खर करीत नाही काय ? करते, हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. पण हे चित्रण सहानुभूती व अनुकंपा जागे करणारे चित्रण आहे. सहानुभूती व अनुकंपा ही काही पापे नव्हेत. सुधारणावादाला त्याचीही कमीअधिक गरज असेल, पण प्रक्षोभ म्हणजे अनुकंपा नाही. हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्यांतसुद्धा प्रक्षोभक असे फारसे काही नाही, हरिभाऊंचा सुधारणावाद जुन्या समाजव्यवस्थेची मूल्ये

९० पायवाट