पान:पायवाट (Payvat).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवा पायंडा टाकणाऱ्या कवितांची मोजदाद करून केशवसुतांनी मराठीत नवीन काय आणले व ते क्रमाने कसे रूढ झाले याचा विचार करू इच्छिणाऱ्यांना व त्या संदर्भात केशवसुतांचे युगप्रवर्तकत्व ठरविणाऱ्यांना ती मोकळीक असली पाहिजे; आणि ज्यांना केशवसुतांतील नवेनवे प्रयोग करण्याची धडपड करणारा माणूस जाणवतो, या माणसाशी फटकून विसंवादी राहणारा व निराळ्या वाटेने जाणारा प्रतिभावंत जाणवतो, त्यांना तो पाहण्याची मोकळीक असली पाहिजे. ज्यांना केशवसुतांचे कलात्मक आकलन करताना त्यांच्या कवितेतील गद्यप्राय विफल काव्याचे आधार घ्यावेसे वाटतात, व्याख्यानांचे आधार द्यावेसे वाटतात, त्यांना तसे करण्याची मोकळीक आहेच. पण ज्यांना कलेच्या पातळीवर सफल झालेल्या साहित्यकृतींवरच केशवसुत या प्रतिभावंताचे व्यक्तिमत्त्व शोधले पाहिजे असे वाटते, त्यांनाही ती मोकळीक असली पाहिजे. केशवसुतांच्या कवितेतील सफल साहित्यकृती कोणत्या यावर थोडाफार मतभेद होण्याचा संभव आहे, हेही जरी मान्य केले तरी या सफल साहित्यकृतींमधून अभिव्यक्त होणाऱ्या मनाचीही एक शिस्त आहे, त्याची एक संगती आहे हे जाणवत राहते. ही संगती निसर्गपूजकाची, स्त्री-सुधारणावाद्याची किंवा उपयुक्ततावादाला मान्यता देणाऱ्याची संगती नाही, तर वैचारिक अनुभव कलेच्या पातळीवर नेणारी व अधिक मूलभूत प्रश्नांचा विचार करणाऱ्या मनाची ही संगती आहे.

प्रतिष्ठान, सेप्टेंबर १९६७

केशवसुत : काही प्रतिक्रिया ८७