पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ । केसरीची त्रिमूर्ति

हें खरें पण रत्ने बाळगणारांस जशी रत्नांची पारख नेहमी असतेच असे नाही त्याचप्रमाणे आमची स्थिति होती."
 काव्याभिरुचि नाही, विद्यानंद काय तें जाणण्याची पात्रता नाही, शोधकपणा नाही, आणि आपल्या जवळच्या ग्रंथाची योग्यता समजण्याइतकी सुद्धा कुवत नाही ! हा दोष दिसायला जातिभेद, निवृत्ति यांपेक्षा लहान असला, तरी प्रत्यक्षांत तो तसा नाही, इतकेंच नव्हे, तर संस्कृतीचें जें आद्य लक्षण तेंच आमच्या ठायीं त्या तमोयुगांत नव्हतें, असा त्याचा भावार्थ असल्यामुळे तो दोष अत्यंत घातक होय, हें सहज ध्यानांत येईल. मराठ्यांच्या काळाच्या आधी अनेक शतकें हा देश अवनत स्थितीतच होता, असें एक-दोन ठिकाणी विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे; आणि त्यामुळे आर्य लोकांचा धर्म, विद्या, यांचा सर्वथा लोप होण्याचा समय आला होता तो मराठ्यांच्या पराक्रमामुळे टळला, असेंहि त्यांनी म्हटले आहे. वरील विवेचनावरून असें दिसतें की, मराठ्यांच्या पराक्रमामुळे सर्वनाश होण्याचें जरी टळले तरी विद्याभिरुचि, शोधकपणा, ज्ञानलालसा हे गुण कांही आपल्या पंडितांना लाभले नाहीत. ते युरोपियनांनी शिकविले तेव्हा त्यांचे महत्त्व आम्हांला समजलें. यावरून विद्याभिरुचीचा लोप हा समाजाला किती घातक ठरतो हें कळून येईल.
निष्णात वैद्य
 विष्णुशास्त्री यांनी आत्मनिरीक्षण कसें केलें आहे या दृष्टीने निबंधमाला तपासून पाहतां, असें दिसतें की, एखादा निष्णात वैद्य रोग्याची प्रकृति तपासूं लागला म्हणजे, बाह्यतः क्षुल्लक दिसणाऱ्या लक्षणांवरूनहि अंतरांतल्या मोठ्या व्याधी जसा अचूक जाणतो, त्याचप्रमाणे विष्णुशास्त्रीहि हिंदी जनांच्या मनाला जडलेल्या व्याधी जाणीत होते. जॉनसनचें चरित्र हा त्यांचा प्रबंध पाहा. प्रारंभीच त्यांनी सांगितलें आहे की, "हिंदुस्थानांतील जुन्या-नव्या कोणत्याहि भाषेत चरित्र-लेखनाचा प्रकार मुळीच आढळत नाही. आता शंकरविजय, ललितविस्तार, भोजप्रबंध किंवा भक्तिविजय, संतलीलामृत अशांसारखे ग्रंथ संस्कृतांत व मराठींत आहेत खरे, पण पुराणांत व इतिहासांत जितकें अंतर तितकेंच वरील ग्रंथांत व खऱ्या चरित्रांत ! ग्रीक व रोमन लोकांत प्लूटार्क, कॉर्नेलियस, नीपॉस वगैरे चरित्रकार जसे होऊन गेले तसा प्रकार इकडे बहुधा कधीहि झाला असेलसें वाटत नाही!" याचें कारण काय ? तर या रचनाविशेषाची अभिरुचीच लोकांत नव्हती व अजूनहि नाही !
पुराण-वृत्ति
 अभिरुचि नाही ! पुराणांची अभिरुचि आहे; पण इतिहासाची नाही; आणि इतिहासाची नाही तशीच- किंवा म्हणूनच चरित्राची- नाही. याचा अर्थ असा की, वास्तव सृष्टीचें- जड किंवा मानवी वास्तव सृष्टीचें- जें ज्ञान त्याचीच अभिरुचि आम्हांला नाही. हा काय लहान दोष आहे ? किंबहुना या दोषामुळेच इतर अनेक