पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्ष-किरणें । ६५

लागतात. विष्णुशास्त्री प्रारंभापासून स्वजनांकडे तशाच दष्टीने पाहत होते. त्यांनी स्वजनांवर क्ष-किरणें टाकली आहेत, असें म्हटलें तें याच अर्थाने.
मूढविद्या
 संस्कृत विद्या, जुने पंडित, त्यांचे दशग्रंथी पांडित्य यांचा शास्त्रीबुवांना केवढा अभिमान असावयास हवा ! पण या पंडितांची विद्या जडमूढ होती. म्हणून त्यांना त्यांचा अभिमान तर नव्हेच, उलट तिरस्कार वाटत असे. 'विद्वत्त्व आणि कवित्व' या निबंधांत त्यांनी या पंडितांच्या जड पांडित्यांवर अतिशय परखड टीका केली आहे. त्यांना काव्याची अभिरुचि मुळीच नाही. श्लेषासारखे शब्दचमत्कार याची त्यांना गोडी. या पंडितांना शब्दाचें प्रसन्नार्थत्व व एकार्थत्व कधीहि सहन होत नसतात. अशी टीका करून शास्त्रीबुवा म्हणतात, "युरोपांतील सामान्य पंडितास आमचे काव्य-ग्रंथ जसे समजतात तसे इकडील मोठमोठ्या शास्त्र्यांसहि समजत नाहीत, व त्यांतील अप्रतिम रसाचा आस्वाद घेण्यास हे परस्थ लोक जर आम्हांस न शिकविते, तर तो आम्हांस कधीहि समजताना, यांतहि अगदी संशय नाही. सारांश, या शास्त्राची चांगली माहिती ज्यास करून घेणें असेल त्याने या विषयावरील इंग्रेजी ग्रंथ वाचले पाहिजेत." 'वाचन' या निबंधांत याहिपेक्षा कठोर टीका त्यांनी केली आहे. "या जुन्या शास्त्री, पंडितांस काव्याभिरुचि नव्हतीच, पण एकंदर विद्येचीच अभिरुचि त्यांना नव्हती," असें त्यांनी म्हटलें आहे. विद्याभिरुचीच नसल्यामुळे "खरें विद्यासुख हे जुन्या पद्धतीच्य लोकांस बहुतकरून मुळीच माहीत नाही." या ठिकाणीहि पुन्हा विष्णुशास्त्री यांनी आपल्या लोकांची युरोपीय लोकांशी तुलना केली आहे. "काव्यशास्त्र- विनोदाने ज्यांचा काळ जातो असे धीमान पुरुष युरोप खंडांतच काय सापडतील ते सापडतील. आमच्या हिंदुस्थानांत तर विचारूच नका. येथे पुराणें, ज्ञानेश्वरी इत्यादि ग्रंथ लोक पूर्वी वाचीत असत, पण ते परमार्थ- बुद्धीने ! अर्थज्ञान किंवा रसानुभव घेऊन वाचणारे फारच थोडे. त्यामुळे वाचनापासून होणारा आनंद त्यांस कधी घडत नसे. व्यसन, निद्रा किंवा कलह ह्यांतच त्यांचा काळ जावयाचा !"
युरोपियनांचे उपकार
 'संस्कृत कविता' या लेखांत प्राच्य पंडितांवर अशीच टीका करून विष्णुशास्त्री यांनी युरोपी पंडितांची मुक्तकंठाने स्तुति केली आहे. "आमच्या प्राचीन भाषेचा पुरस्कार जर पाश्चात्त्य पंडितांनी घेतला नसता, तर तिची काय दुर्दशा होऊन जाती, हें सांगवत नाही. या थोर मनाच्या लोकांनी तिचें नुसतें रक्षण केलें इतकेंच नाही तर तिचा सार्वत्रिक प्रसार होण्यास ते कारणीभूत झाले. यावरून साऱ्या भारतवर्षीय जनांवर त्यांचे केवढे उपकार आहेत तें सहज ध्यानांत येईल. शोधकपणा हा जो पाश्चात्य पंडितांचा गुण तो पूर्वीच्या पंडितांत मुळीच नव्हता म्हटलें तरी चालेल. आमच्या प्राचीन विद्यांचें अध्ययन करून त्या आम्ही जागरूक ठेवीत होतों
 के. त्रि. ५