पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० । केसरीची त्रिमूर्ति

वरच्याहून निराळी अशी कारणमीमांसाहि केली नसती; पण दीर्घकाळपर्यंत या देशांत विचारस्वातंत्र्य नाही, सृष्टिसंशोधन नाही, विद्याभिरुचि नाही, एकोपा नाही, प्रवृत्तिधर्म नाही, प्रवासाची आवड नाही, ग्रंथलेखन नाही आणि देशाभिमान नाही आणि तो जातिभेदामुळे नाही अशी कारणें त्यांनी वरचेवर सांगितली आहेत. तेव्हा आमच्या अवनतीला आमचे आम्हीच जबाबदार आहों, आमच्या मूर्खपणामुळे आम्ही ऱ्हास पावलों, हें मत आम्हांस बिलकुल मान्य नाही, असें जरी ते म्हणत असले, तरी अवनतीचीं वरील कारणें त्यांनीच सांगितली आहेत, हें आपण विसरता कामा नये.
 आता आमच्या देशाला कांहीहि झालेले नाही हें दाखविण्यासाठी विष्णुशास्त्री यांनी जी प्रमाणे सादर केलीं आहेत त्यांचा विचार करून हा विषय संपवू.
आमचे शौर्य
 आमच्या ठायीं पूर्वीचें शौर्य, धैर्य, पराक्रम अजून कायम आहे हें सांगण्यासाठी इंग्रजांनी येथे तयार केलेली काळी फौज हैं उदाहरण त्यांनी दिलें आहे. 'इंग्रजी भाषा' या निबंधांतहि डुप्लेने व पुढे इंग्रजांनी एतद्देशीय लोकांच्या फौजा तयार करूनच हिंदुस्थान जिंकला व सध्या इंग्रजी साम्राज्याचा तोच आधारस्तंभ आहे, हा हिंदी लोकांच्या शौर्याचा पुरावा म्हणून दिला आहे. आमच्या पलटणी अफगाणिस्तान, सयाम, चीन, इजिप्त, रशिया या देशांत इंग्रजांनी नेल्या तेव्हां त्या युरोपीय पलटणींइतक्याच शौर्याने लढल्या, असें टीप देऊन मुद्दाम निदर्शनास आणले आहे. शिवाय लोकहितवादींवरील दुसऱ्या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, पूर्वीपासून शिपाईगिरीविषयी प्रख्यात असे जे रजपूत, पुरभय्ये वगैरे लोक त्यांच्या अंगचें पाणी हल्लीच्या चिरकालिक स्वस्थतेनेहि कमी झालें आहे, असें नाही. इतकेंच की, तें प्रगट होण्यास हल्ली बिलकुल जागाच नाही.
 विष्णुशास्त्री यांनी हीं जीं प्रमाणें दिली आहेत त्यांवरून प्रत्यक्ष रणांगणांतलें शौर्य-धैर्य हिंदी लोकांच्या अंगी होतें एवढे जरी सिद्ध होत असले, तरी युद्धविद्या, युद्धनेतृत्व, त्यासाठी लागणारें स्वपरबलाचें ज्ञान, इतिहास-भूगोलाचें ज्ञान, लढाईतल्या विविध व्यूहरचना यांचे कसलेंहि ज्ञान, की जें पूर्वी सर्वार्थाने या देशांत होतें तें हिंदी लोकांच्या ठायीं नव्हतें हेंच सिद्ध होत नाही काय ? फ्रेंच, इंग्रज सेनापति व त्या राष्ट्राचे नेते यांनी आपल्या युद्धनेतृत्वाने यांना हाताखाली तयार केलें, व्यूह आखून या फौजा तेथे नेऊन उभ्या केल्या म्हणजे त्या असामान्य धैर्याने लढत. याचा अर्थच हा की आमच्याजवळ शौर्य असूनहि शत्रूवर विजय मिळविण्यासाठी- राष्ट्राचें रक्षण करण्यासाठी- त्याचा कसा उपयोग करावा, याची विद्या आमच्या जवळ नव्हती. रजपुतांचे शौर्य कायम होतें, हें खरें आहे. पण पृथ्वीराजाचा पराभव झाल्यानंतर पुढे अनेक शतके आक्रमकांची साम्राज्यें स्थापणें व वाढविणे यासाठीच तें खर्ची पडलेलें होतें. हा अधःपात नव्हे काय ? आणि याला आमचे आम्हीच जबाब