Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-८-

अवनतीची मीमांसा


अवनतीची मीमांसा
 उत्कट अशा स्वदेशप्रीतीमुळे विष्णुशास्त्री यांची विवेकी दृष्टि केव्हां केव्हा झाकोळून जात असें, असें वर म्हटले आहे. तशा झाकोळलेल्या दृष्टीतूनच त्यांनी भारताच्या अवनतीची मीमांसा केली आहे. तिचें समीक्षण आता करावयाचे आहे. लोकहितवादी यांच्या ग्रंथांवर टीका करण्यासाठी त्यांनी जे दहा-बारा निबंध लिहिले त्यांतील आरंभीच्या तीन-चार निबंधांत ही मीमांसा आलेली आहे. आणि सारार्थाने तीच पुढे 'आमच्या देशाची स्थिति' या शेवटच्या प्रबंधाच्या समारोपांत त्यांनी दिली आहे.
 विष्णुशास्त्री यांचा निश्चित सिद्धान्त असा की, "आमच्या देशास काही एक झालेलें नाही. त्यांची नाडी अद्याप साफ चालत असून शरीरप्रकृतीस म्हणण्यांसारखी कांही एक विकार झालेला नाही." मात्र देशाला कांही झालेले नाही, असे म्हणत असतांनाच सध्या त्याला विपन्नावस्था आलेली आहे, सांप्रत तो ऱ्हास पावला आहे, हे त्यांना मान्य आहे. या दोन विधानांत विसंगति आहे, असें दिसेल; पण लोकहितवादीवरील निबंधात त्यांनी त्यासबंधी खुलासा केला आहे.
नैमित्तिक निकृष्टावस्था
 ते म्हणतात, "एकंदरीत हल्लीच्या काळाला या देशाची स्थिति मोठी भयंकर झाली आहे, त्याला निकृष्ट दशा आली आहे, यांत बिलकुल संदेह नाही, पण निकृष्ट स्थितीचीं दोन स्वरूपें असतात. एक नित्य, शाश्वत निकृष्ट स्थिति व दुसरी आगंतुक, नैमित्तिक अशी निकृष्ट स्थिति. दुसऱ्या निकृष्ट स्थितीत कांही तात्कालिक भयंकर अनर्थापात होऊन राष्ट्र क्षीण झाल्यासारखें दिसतें पण त्याच्या अंगचा मूळचा जोस