पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४ । केसरीची त्रिमूर्ति

बकल यांसारखे जे थोर ग्रंथकार त्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यांच्यासारखेंच कार्य येथे भारतांत आपण करावयाचें, अशी प्रतिज्ञा करूनच त्यांनी लेखणी उचलली होती.
पाश्चात्त्य विद्या
 पण यापेक्षाहि विष्णुशास्त्री यांचें पाश्चात्त्य संस्कृतीवरचें खरें प्रेम दिसून येतें तें त्यांची लेखणी जेव्हा पाश्चात्य विद्या, पाश्चात्त्य ज्ञान यांचा गौरव करते तेव्हा. भारताचा खरा उद्धार हा पाश्चात्त्य विद्येमुळे, पाश्यात्त्य ज्ञानामुळे होणार आहे याविषयी त्यांच्या मनाची दृढ निश्चिति झाली होती. त्यामुळे निबंधमाला वाचतांना त्यांनी या ज्ञानाचा जणू ध्यास घेतला होता असें पदोपदीं वाटू लागतें.
 शास्त्रीबुवांनी निबंधमाला हें मासिक-पुस्तक काढलें त्याचा हेतु काय ? "ज्या लोकांस विद्यालयांतील. शिक्षणाचा वगैरे लाभ न घडल्याने ज्ञानाचा मार्ग खुला नाही त्यांस अनेक गोष्टींचें ज्ञान व्हावें, हा एक हे निबंध लिहिण्याचा उद्देश आहे. संस्कृत व विशेषतः इंग्रजी भाषेत जें अगाध ज्ञान भरलें आहे त्याचा पाट फोडून जर आपल्या भाषेकडे वळवितां येईल तर केवढी मजा होईल !" 'प्रस्तुत मालेचा उद्देश' या दुसऱ्या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी आपला हा उद्देश लोकांस कळविला आहे; आणि याच निबंधांत एकंदर मासिक- पुस्तकांचे महत्त्व वर्णितांना त्यांनी इंग्रज लोकांच्या विद्याभिलाषाचें फार कौतुक केलें आहे. "इंग्रजांनी आमची लक्ष्मी जशी लुटून नेली तशी संस्कृत भाषेचा त्यांना शोध लागतांच त्या लक्ष्मीहून अमूल्य अशी विद्याहि लुटून नेली. आणि यापुढे तिचें महापीठ तिकडेच स्थापन होणार, असा अदमास दिसतो." "मराठी भाषेविषयीहि त्यांनी असाच अचाट उद्योग केला आहे. तो म्हणजे मोल्सवर्थ व कँडी यांनी रचलेला कोश हा होय. हा कोश रचून त्यांनी महाराष्ट्र-भाषेवर जे उपकार करून ठेविले आहेत त्यास पार नाही." 'वक्तृत्व' या निबंधांतहि त्यांनी हेच उद्गार काढले आहेत. "इंग्रज सरकारचा या देशावर सर्वांत मोठा उपकार हाच होय की, ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने एतद्देशियांस दिली व अद्याप देत आहे. चाळीस वर्षांपूर्वी मेकॉलेने जी नवी पद्धति सुरू केली तिच्यामुळे ही नवी (पाश्चात्त्य) विद्या प्रसार पावून त्यामुळे देशाची स्थिति आजला एकंदर बदलून गेली आहे, असें म्हटलें असतां चालेल."
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत आरंभी आणि शेवटी मिळून विष्णुशास्त्री यांनी पाश्चात्त्य विद्येचें व ज्ञानाचें स्तोत्रच रचलें आहे असें दिसेल. ते म्हणतात-
इंग्रजी विद्येचें वज्र
 इंग्रजी राज्यापासून आपला मोठा लाभ कोणता झाला ? "मानसिक उन्नति. मानसिक उन्नति म्हणजे देशाभिमान, जात्यभिमान, स्वाभिमान, अनुचित कर्मापासून निवृत्ति, स्वातंत्र्याभिलाषा, दैन्यवर्जन इत्यादिकांविषयी ज्या मानसिक स्थितीपासून स्फूर्ति येते ती." हा लाभ इंग्रेजी राज्यापासून कसा होणार? "या राज्यांमुळे पाश्चा-