पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी विद्येचें वज्र । ४३

अपरिहार्य होतो. आगरकरांनी हा विचार फार जोरदारपणे मांडला आहे. ते म्हणतात, "जो तो लोकमताच्या बागुलबोवाला भिऊन दडून बसेल, तर कोणत्याहि समाजाला उन्नतावस्था येणार नाही. इतकेंच नव्हे, तर त्यास उतरती कळा लागून अखेर त्याचा ऱ्हास होईल." शास्त्रीबुवांची लोकमताविषयी हीच वृत्ति होती. मालेच्या पहिल्या वर्षाच्या समारोपाच्या अंकांत त्यांनी म्हटले आहे की, "आमच्या बुद्धीने जें जें आम्हांस खरें भासलें व ज्याच्या सत्यत्वाविषयी आम्हांस स्वतः संशय उरला नाही तें तें, कितीहि लोकमताविरुद्ध असले तरी, आम्ही प्रमाणांसहित सादर केलें आणि पुढेहि निष्पक्षपातीपणाने जो मजकूर आम्हांस खरा वाटेल तो आम्ही अवश्य लिहिणार; मग तो कोणास आवडो, कोणास न आवडो. 'खऱ्यास मरण नाही' ही आमच्या भाषेतील उत्कृष्ट म्हण आम्हांस सर्वथैव मान्य होय !"
इंग्रजांचा इतिहास
 मुद्रणस्वातंत्र्य हा विचारस्वातंत्र्याचाच एक प्रकार होय; आणि लोकशाहीला प्राणभूत असणारें जें वृत्तपत्र त्याचें अस्तित्व सर्वथा या मुद्रणस्वातंत्र्यावरच अवलंबून असतें. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याइतकाच, विष्णुशास्त्री यांनी मुद्रणस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे; आणि या बाबतींत देशी वृत्तपत्रांनी, युरोपीय वृत्तपत्रांचे आदर्श पुढे ठेवून, सरकारच्या कृत्यांवर पहारा ठेवण्याचें कार्यं निर्भयपणें केलें पाहिजे, असा त्यांना उपदेश केला आहे. या विषयासंबंधीचे लेख केसरीच्या अंकांत आलेले आहेत. (जानेवारी, फेब्रुवारी १८८२) मुद्रणस्वातंत्र्याचें महत्त्व सांगतांना विष्णुशास्त्री म्हणतात, "राजकीय प्रकरणीं जो स्वातंत्र्याचा झेंडा साऱ्या पाश्चात्य राष्ट्रांतून आजला उभारलेला आढळतो तो कसा उभारला गेला ही हकीगत समजण्याची ज्यास इच्छा असेल व जयप्राप्ति तरी केवढ्या दारुण व दीर्घकालिक युद्धप्रसंगानंतर झालेली आहे हें ज्यास पुरतेपणीं ध्यानांत आणावयाचें असेल, त्याने युरोपीय राष्ट्रांचा व विशेषतः आमच्या राज्यकर्त्यांचा इतिहास साग्र ऐकून घेणें जरूर आहे. कां की, वरील स्वातंत्र्याबद्दल युरोपांत जशा खटपटी व झटापटी झाल्या तशा इकडे झाल्या नाहीत."
प्रजासत्ताक
 आगरकरांनी विष्णुशास्त्री यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखांत म्हटलें आहे की, "एखाद्या वेळी त्यांचा कल्पनाविहंग पूर्ण पंख उभारून भराऱ्या मारूं लागला म्हणजे त्याला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखाली सुखाने नांदत आहे असें दिसे." विष्णुशास्त्री यांनी भाषण मुद्रणस्वातंत्र्याविषयी, वृत्तपत्रांच्या व ग्रंथकारांच्या स्वातंत्र्याविषयी लिहितांना पाश्चात्त्य देशांत यासंबंधी जो संग्राम झाला त्याचें व विशेषतः व्हॉल्टेअरच्या निर्भय लेखनाचें जें अत्यंत आत्मीयतेने वर्णन केलें आहे त्यावरून आगरकरांचे ते उद्गार यथार्थ आहेत असें वाटतें आणि ध्यानांत येतें की, इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचा जरी ते कडवा द्वेष करीत असले तरी पाश्चात्त्य संस्कृतीचा ते तिळमात्र द्वेष करीत नसत. उलट तेथील व्हॉल्टेअर, गिबन,