पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेजोवलयाचा भेद । ३५

यांना ख्रिस्ताच्या शिष्यांत सामील करणें म्हणजे 'वेषधारी लांडग्या'स मेंढयांत सामील करणें किंवा डंकनरोडवासी अखंड सुवासिनींचे 'सीता- मंदोदरी- तारा' या वर्गांत परिगणन करण्यासारखेंच आहे.
भामटे
 या ठिकाणी सिडने स्मिथ याचें एक अवतरण शास्त्रीबुवांनी दिलें आहे. आपला युक्तिवाद मांडतांना विष्णुशास्त्री यांनी हें मुद्दामच धोरण ठेवलें होतें, असें दिसतें. भारताची प्राचीन परंपरा, त्याचें तत्त्वज्ञान, त्याची संस्कृत विद्या यांचें गुणगान करणाऱ्या पाश्चात्त्य पंडितांचे उतारे द्यावयाचे; आणि ख्रिश्चन धर्म, इंग्रजी राजनीति, यांचें रूप स्पष्ट करण्यासाठीहि पाश्चात्त्य व विशेषतः इंग्रज पंडितांचेच उतारे द्यावयाचे. यामुळे इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचे दात त्यांच्याच घशांत घातल्यासारखे होऊन येथल्या जनतेचे डोळे उघडणे सुलभ झालें. सिडने स्मिथ म्हणतो, "तुम्ही वन्य जमातींना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देऊ पाहत असाल तर प्रथम तुमचें बायबल जाळून टाकणें अवश्य आहे. कारण त्यावरून पाहतां तुम्ही ख्रिश्चन नसून भामटे आहांत, हें त्यांना कळून येईल." एडमंड बर्कहि एकदा म्हणाला होता की, "आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून इंग्रज पुढे आले की ख्रिश्चन धर्माला तिलांजलि देतात." इंग्रज ख्रिस्ती धर्माचें आचरण करतात तें असे !
प्रजाभक्षक
 नीतीच्या दृष्टीने तरी काय आहे ? राजा हा प्रजेचा रक्षणकर्ता असावा, त्याने तिला सुमार्गाला लावावें, देश समृद्ध करावा, हीं सामान्यपणें सर्व जगांत नीतितत्त्व आहेत. ही जबाबदारी न घेतां जो केवळ सुखोपभोगाची अपेक्षा करील. तो राजा प्रजारक्षक नसून प्रजाभक्षक होय. आम्हांस लिहिण्यास दिलगिरी वाटते की, प्रभुत्वाची खरी लक्षणें आमच्या राज्यकर्त्यांच्या ठायीं विरलतेनेच आढळतात. प्रारंभीचे राज्यकर्ते अल्पिष्टन, बेंटिक यांची नीति श्रेष्ठ होती. ती मंडळी कोणीकडे आणि खुद्द कलेक्टरास, दुष्काळांत लोक मरत आहेत, असा नुसता अहवाल दिल्याबद्दल ताबडतोब अर्धचंद्र देणारे व लक्षावधि प्रजा मरणाच्या दारी बसली असतां दिल्लीस दिवा लावणारे बीकन्सफील्डप्रमुख महापंचायतन कोणीकडे ! आमच्या राज्यकर्त्यांचें एकच सूत्र आहे. जेणेंकरून गोऱ्या लोकांच्या पोतड्या भरतील तो कायदा. त्यामुळे पूर्वीची तिस्मारखानी व पेंढारशाही पुरवली, पण इंग्रजी चरक फार भयंकर असें सर्वांस वाटू लागले आहे. के. सी. एस्. आय्. या किताबाचें विष्णुशास्त्री यांनी (क. स. ई.) असें मराठी रूप केलें आहे.
 व्यावहारिक राजनीतीच्या दृष्टीने पाहिलें तरी इंग्रज राज्यकर्ता नालायकच दिसतो. हिंदुस्थान ही सोन्याची अंडी घालणारी हंसी त्याला मिळाली खरी; पण तिच्या पोटांतलीं सर्व अंडी एकदम मिळवावीं अशी हाव त्याला सुटली असून, तो तिच्या गळ्यावर सुरी फिरवीत आहे. मागे पेंढाऱ्यांच्या राज्यांत लुटालुटीचें वादळ