पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४ । केसरीची त्रिमूर्ति

प्रभावाखाली हिंदी लोक दडपून गेले होते. आपण दासच होण्याच्या लायकीचे आहों, सुज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करूं नये, अशी त्यांची भावना झाली होती. अशी ही आत्मनि अवज्ञा असतांना, हा हीनगंड रुतून बसलेला असतांना त्या राजसत्तेला प्रतिकार करण्याची कल्पना त्यांच्या स्वप्नांत सुद्धा येण्याची शक्यता नव्हती. म्हणून अगदी परखड शब्दांत विष्णुशास्त्री यांनी ब्रिटिशांची स्वार्थी राजनीति, लुटारू कारभार, ढोंगी, आपमतलबी धर्म, त्यांचें मायिक बोलणें यांचें रूप स्पष्ट करून त्यांच्यावरची भोळया जनतेची श्रद्धा छेदून टाकली.
वास्तव रूप
 'आमच्या देशाची स्थिति' हा प्रबंध लिहिण्यामागे हाच प्रधान हेतु होता असें दिसतें. आमच्या राज्यकर्त्यांची स्थिति, एतद्देशीय राजेरजवाड्यांची स्थिति आणि सामान्य लोकांची स्थिति असे याचे तीन भाग आहेत. या तीनहि भागांत उद्दिष्ट एकच आहे- इंग्रज राज्यकर्त्यांचे वास्तव रूप हिंदी लोकांना दाखविणें !
 इंग्रज राज्यकर्त्यांचा विचार करतांना, ते ख्रिश्चनधर्मी आहेत, तेव्हा ते त्या धर्मातील तत्त्वांप्रमाणे कितपत वागतात, नीतीचीं जीं सर्वमान्य तत्त्वें आहेत त्यांचें ते पालन करतात की नाही, आणि राज्यकर्त्यांची जी अगदी प्राथमिक व्यवहारदृष्टि, ती तरी त्यांना आहे की नाही, असे प्रश्न विष्णुशास्त्री यांनी उपस्थित केले आहेत. यांची उत्तरें काय असतील तें निबंध न वाचतांच समजण्याजोगे आहे. या सर्व प्रबंधाची रचनाच शास्त्रीबुवांनी अशी केली आहे की, प्रत्येक विभागाच्या प्रारंभींच त्याचा भावार्थ स्पष्ट व्हावा. इंग्रज राज्यकर्त्यांचें विष्णुशास्त्री यांनी दाखविलेलें रूप पाहा.
येशूचे अनुयायी
 इंग्रज सत्ताधारी हे ख्रिश्चन आहेत. आमच्याच खजिन्यांतून दरसाल लाखो रुपये उठवून मिशनऱ्यांकरवीं ते गावोगावीं, रस्तोरस्तीं, सद्धर्माचा प्रकाश पाडीत आहेत. तेव्हा ते येशूमहाराजांचे परम भक्त आहेत हें कोणालाहि दिसणार आहे. आता ही ख्रिस्तभक्ति आणि गेल्या शंभर वर्षांतला कारभार यांत कितपत मेळ आहे हें कोणाला सांगायला नकोच. जो कोणी पवित्र शास्त्रांतील येशुचें चरित्र आणि क्लाइव्ह, हेस्टिंग्ज, टेंपल, डलहौसी या चतुष्टयाची चरित्रावलि वाचील त्यास वरील मंडळींची ख्रिस्तलोकीं काय संभावना होण्यासारखी आहे, हें समजण्यास फार आयास पडतील असें नाही. दया, क्षमा, सत्त्वभाव हीं ख्रिस्ती धर्माची तत्त्वें आहेत, असें शुभवर्तमानांत सांगितलें आहे. इंग्रजांचें वर्तन त्यांस अनुसरून आहे काय ? परमुलखावर जाऊन धाड घाला, ज्यांनी सालसपणें तुम्हांला आश्रय दिला त्यांच्यावर उलटून अरेरावी करा, खोट्या सह्या करा, दुसऱ्यांच्या बायका उपटा, दिवसाढवळ्या दरवडे घाला, वाटेल त्यास उचलून फाशी द्या, असा उपदेश शुभवर्तमानांत आढळत नाही ! तेव्हा लिटन, टेंपल (एक त्या वेळचे व्हाइसरॉय, एक गव्हर्नर)