पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश । २३

ग्रंथ - निर्मिति
 भाषेच्या अभिवृद्धीचा मार्ग येथे शास्त्रीबुवांनी स्पष्ट केला आहे. भाषेची अभिवृद्धि म्हणजे काय ? विकास म्हणाजे काय ? सर्व जगाचें ज्ञानभांडार तिच्यांत आणून सोडणारे ग्रंथ तयार होणें ! हीच अभिवृद्धि, हाच विकास; आणि हा विकास झाला म्हणजे सहजगत्याच देशाचा विकास होईल. कारण मराठींत ग्रंथ झाल्याने आज ज्ञानाचा मार्ग ज्यांस खुला नाही त्यांस तो खुला होईल आणि त्यांतूनच देशाचा उत्कर्ष साधेल. या सर्व निबंधांत भाषेचा उत्कर्ष म्हणजेच देशाचा उत्कर्ष हें सूत्र विष्णुशास्त्री यांनी अखंड राखलें आहे. शेवटीं समारोप करतांनाहि त्यांनी म्हटलें आहे की, "आपल्या भाषेच्या अंगी अर्थव्यंजकता, वर्णसौंदर्य फार कमी आहे हा अलीकडील विद्वानांचा ग्रह कांही अंशीं तरी मोडून टाकण्यास जर आमचें निबंध कारण झाले तर आमच्या हातून देशहिताचे एक मोठेच कृत्य घडलेसें आम्ही मानूं."
 तेव्हा स्वत्व याचा पहिला अर्थ म्हणजे स्वभाषेचा अभिमान, आणि त्याची जागृति म्हणजे स्वत्वाची ओळख होय, याविषयी विष्णुशास्त्री यांच्या मनांत तिळप्राय संदेह नव्हता, हें यावरून स्पष्ट होईल. तसें असल्यामुळेच त्यांनी स्वत्वा जागृतीला तेथूनच प्रारंभ केला.
मर्मघातक हल्ला
 स्वधर्म हा स्वत्वाचा दुसरा महत्त्वाचा घटक होय. एका अर्थी स्वभाषेच्या तुलनेने स्वधर्म हा दसपटीने, शतपटीने महत्त्वाचा घटक आहे. म्हणून मिशनऱ्यांनी मराठीचा किंवा इतर देशभाषांचा आश्रय करण्यांत मुळीच खंत मानली नाही आणि धर्मावर मात्र अत्यंत मर्मघातक हल्ला चढविला. इंग्रज पंडितांचें धोरण असेंच होतें. सरकारने प्रजेवर धर्माच्या बाबतींत सक्ती करावी की नाही असा विषय चालला असतां, मेकॉलेसाहेब हिंदुस्थानाविषयी लिहितात, "परधर्म जबरीने लोकांवर बसविला असतां, जेथे त्यांचे अपरिमित कल्याण होईल, असा देश हिंदुस्थानाखेरीज कदाचित् दुसरा कोठेहि सापडणार नाही. तेथील धर्मासारखा नीचतेस पोचलेला धर्मं साऱ्या पृथ्वीवर कोठेहि नाही. त्याचा समूळ उच्छेद करून ख्रिस्ती धर्माचें अत्यंत हीन काळी अत्यंत हीन जें स्वरूप कधी कोठे चालू असेल, तें त्याच्या जागी आणून बसविलें असतांहि त्या देशांतील लोकांचे हित होणार आहे."
प्रत्याघात
 अशा तऱ्हेने अत्यंत दुष्ट व विकृत बुद्धीने केलेले धर्मावरचे हल्ले हिंदूंना सहन होणें कसें शक्य होतें ? १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा त्या संतापाचाच उद्रेक होता. इतरहि मार्गांनी हिंदूंनी या आघाताला प्रत्याघात चालविला होता. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 'विचारलहरी' हे नियतकालिक चालविलें होतें. त्यामुळे कांही काळ त्यांच्या नोकरीवरहि गदा आली होती. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी मिशनऱ्यांच्या अस्सल भाषेतच त्यांना प्रत्युतर देऊन अनेक ठिकाणीं त्यांना नामोहरम