पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ । केसरीची त्रिमूर्ति

विवाहाला उत्तेजन देऊन ते घडवून आणले. बालहत्याप्रतिबंधक गृह काढलें, आणि अस्पृश्यांसाठी घरांतला पाण्याचा हौद खुला केला; आणि हें सर्व करीत असतांना, चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता यांचा आधार असलेलें जें हिंदु धर्मशास्त्र त्याच्यावर अत्यंत प्रखर असा हल्ला चढविला. या ब्राह्मणी शास्त्रांतील विषमता, अन्याय, जुलूम, पक्षपात यांवर एवढी विदारक, प्रखर टीका दोन हजार वर्षांत कोणी केली नसेल इतकी जोतिबांनी केली. या काळांत यामुळेच त्यांच्यावर अनेक संकटें आली. प्राणसंकटहि आले. पण जोतिबा डगमगले नाहीत. ते अत्यंत धाडसी, साहसी होते. त्यांनी या सर्व सकटांना तोंड देऊन सामान्य, दलित जनतेच्या उद्धाराचे कार्य अव्याहत चालविलें.
इंग्रज त्राते
 पण असे असूनहि लोकहितवादी, रानडे यांची इंग्रज राज्यकर्त्यावर एकपट श्रद्धा असली, तर म. फुले यांची दसपट शतपट होती. ब्राह्मणी सत्तेपासून दलितांचें संरक्षण व्हावें म्हणून, "यापुढे तरी सरकारने शुद्धीवर येऊन प्रत्येक खेड्यांत एका तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थाला गतकुळी शेतें इनाम देऊन त्याला गावच्या कच्च्या हकीगतीविषयी रिपोर्ट करण्यास सांगावें," अशी सूचना केली आहे; आणि इंग्रज हेच आपले त्राते अशी त्यांची शेवटपर्यंत श्रद्धा होती. आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांत इंग्रजांनी तेथील आदिवासींच्या अमानुष कत्तली केल्या होत्या, आणि भयानक अस्पृश्यता निर्माण करून, त्यांच्या वेगळ्या वस्त्याहि शक्य तेथे निर्माण केल्या होत्या. हा इतिहास जोतिबांनी दृष्टिआड केला. पण एवढेंच नाही. हिंदुस्थानांतल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांचे स्वरूप कांही प्रमाणांत तरी तसेंच आहे असें स्वतः जोतिबांनीच 'शेतकऱ्याचा आसूड' या आपल्या प्रबंधांत दाखवून दिले आहे. दादाभाईंनी इंग्रजांवर केलेले आरोप थोड्या सौम्य भाषेत जोतिबांनीहि केले आहेत. असें असतांना इंग्रजांखेरीज आपला त्राता कोणी नाही या मताला ते चिकटून बसले आणि ती भावना शूद्रांच्या व सर्व ब्राह्मणेतरांच्या मनांत त्यांनी दृढमूल करून टाकली.
 जोतिबांचा लढा ब्राह्मण्याविरुद्ध होता, सनातन हिंदु धर्मशास्त्राविरुद्ध होता. त्यांच्या मतें ब्राह्मण हेच फक्त आर्य व त्या शास्त्राचे पुरस्कर्ते असून, शूद्र, अस्पृश्य यांसकट सर्व ब्राह्मणेतर समाज हा शूद्र होता. असे असतांना त्या सर्वांना संघटित करून, त्यांना स्वतःच्या बळावर, स्वावलंबनाने, ब्राह्मण्याविरुद्ध लढा करण्यास त्यांनी उद्युक्त केलें असतें तर सर्व ब्राह्मणेतर समाजाचें आत्मतेज जागृत झालें असतें; पण तसें झालें नाही. जोतिबांनी लढा सुरू केला; पण ब्राह्मणांखेरीज आपण सर्व शूद्र आहों, समान आहों, हें तत्त्वज्ञान ब्राह्मणेत्तरांनी क्षणभरहि स्वीकारलें नाही. सत्यशोधक चळवळींतून त्यांनी ब्राह्मणद्वेष फक्त घेतला. चातुर्वर्ण्य, जातिभेद या सर्व संस्था, त्यांतील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व वगळून, ब्राह्मणेतरांना जशाच्या तशा हव्या