पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मप्रत्यय । १७

सर्व प्रकारची हानि झाली असून, तें नष्ट झाल्यावांचून आमची उन्नति होणार नाही, अशी विष्णुशास्त्री, आगरकर व टिळक यांच्या मनाची निश्चिति झाली होती. निबंधमालेने हा संदेश प्रथम दिला, म्हणून तिच्यामुळे नवयुग निर्माण झालें.
यथान्याय
 लोकहितवादींच्या कार्याचा व्याप अथवा त्याची महत्ता दादाभाई किंवा रानडे यांच्याइतकी नाही, हें खरें आहे. तरीहि गेल्या शतकांतील प्रबोधनच्या कार्यात त्यांचें स्थान महत्त्वाचे आहे याबद्दल दुमत होईल असें वाटत नाही. धर्म समाजरचना, अर्थव्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी, आजहि पुरोगामी वाटतील, असे विचार सव्वाशे वर्षांपूर्वी सांगितले, यांतच त्यांची थोरवी आहे. राममोहन रॉय यांनाहि नव्या अर्थकारणाचें स्वरूप आकळलें नव्हतें; तें लोकहितवादींनी पुरेपूर जाणलें होतें व आपला व्यापार वाढला पाहिजे, कारखाने स्वतःचे उभारले पाहिजेत, असा उपदेशहि केला होता.
 पण ब्रिटिश राज्य व ब्रिटिश राज्यकर्ते हा विषय आला की त्यांची सर्व आकलनशक्ति मरगळून जाई. इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे, असेंच ते म्हणत. एवढेच नव्हे तर, 'इतिहासाच्या संबंधाने समुद्रच' असा ज्यांचा लौकिक होता ते लोकहितवादी 'इंग्रजांनी हिंदुस्थानचें राज्य न्यायाने घेतलें' असेंहि सांगत. "त्या राज्यस्थापनेचा इतिहास पाहूनच, इंग्रजांनी यथान्याय राज्य घेतले आणि ईश्वराने हे राज्य त्यांस अशा प्रकाराने दिले की, त्यांस कोणी दोष देणार नाही, असें माझें मत झालें आहे," असें एका पत्रांत ते लिहितात तेव्हा विस्मय वाटतो. क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्ज यांची चरित्रें अप्रामाणिकपणा, वचनभंग, पिसाट लोभ यांनी बरबटलेली आहेत हे लोकहितवादींना माहीत नव्हतें काय ?
 पण हा प्रश्न दादाभाई, रानडे यांच्याबद्दलहि निर्माण होतो. विष्णुश्चास्त्री यांच्या आधीच्या सर्वच थोर पुरुषांबद्दल तो विचारावा लागतो. ब्रिटिश हेच आपले उद्धारकर्ते आहेत, असें कोणत्या इतिहासाच्या अधारे आपण म्हणतां ? याला उत्तर नाही. त्यांची तशी श्रद्धा होती, एवढेच उत्तर देतां येईल. या श्रद्धेला सुरुंग लावून 'आपणच आपले उद्धारकर्ते' हा स्फूर्तिदायक विचार प्रथम विष्णुशास्त्री यांनी मांडला.
म. फुले- अनन्यकोटी
 यानंतर महात्मा जोतिबा फुले यांचा विचार करावयाचा. वरील तिघांच्या तुलनेने पाहतां फुले अनन्यकोटीतले होते. लोकहितवादी, रानडे हे समाजसुधारकच होते; पण स्वतः प्रतिपादिलेलीं तत्त्वें आचरण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी माघार घेतली; पण फुले यांनी अनन्यसामान्य धैर्य दाखवून आपल्या तत्त्वांप्रमाणे जन्मभर आचरण केलें. प्रथम त्यांनी महार-मांग- चांभार या जातींच्या मुलींसाठी शाळा स्थापिली. त्यापाठोपाठ कनिष्ठ जातींसाठी इतर अनेक शाळा स्थापन केल्या. विधवा-
 के. त्रि. २