Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्वंद्व

पुलाखालून पाणी संथपणे वाहतंय

नदीचं पवित्र पात्र गावागावातलं मलमूत्र
सांडपाणी गोळा करत हळूहळू पुढं सरकतंय

खच्चून भरलेल्या धावत्या एसटीतून
भलंदांडगं कुंकू ल्यायलेली एक घामेजलेली बाई
कनवटीची चिल्लर चाचपत
एक नाणं लगबगीनं काढते
...आणि आयुष्याची पुंजी दान करावी
अशा नाठाळ श्रध्दाळूपणानं
जीव खाऊन बसच्या खिडकीतून
अरुंद पुलाकडे नदीच्या पात्रात भिरकावते

नाणं हेलकावत नदीच्या तळाला
जिळबट शेवाळात गडप झालं असेल
माझ्या सदैव द्वंद्वात असलेल्या मनासारखं

इकॉनॉमीच्या नाकावर टिच्चून
श्रध्देच्या बाजारू मानसिकतेत झिजत
नाणं आपल्या दोन्ही बाजू
गाळात हरवून बसलंय

पुलाखालून खूप पाणी वाहून जाईल कदाचित
....पुढं पूलही असेल, नसेल

या युगानंतरच्या पिढ्यांना
आपल्या संस्कृतीची माहिती देण्यासाठी

त्या नाण्याचा उपयोग होईलही कदाचित

कबुतरखाना / १५