पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"नाहं हन्ति न हन्यते" हे जे सांगितले ते हेच. ते पुढे पाहूच). यानंतर अनेक श्लोकांतून याचे वर्णन आहे, ज्ञान आहे. "आत्मा हा ज्ञानमय आहे, तो जन्मत नाही किंवा मृत्यूही पावत नाही. तो कोणाही पासून उत्पन्न होत नाही. त्याचे स्वरूप शुद्ध असते ते कधीही बदलत नाही. तो अजर आहे. अमर आहे. चिरंतन आहे. शरीर नष्ट झाले तरी तो नष्ट होत नाही कारण तो अशरीर आहे. तो अणूपेक्षाही लहान व मोठ्याहूनही मोठा आहे (अणोरणीयान्महतो महीयान) ." याच उपनिषदात मानवाचे विश्लेषण करताना एक रूपक वापरून असे म्हटले आहे -
 आत्मानं रथिनं विद्धि शरीरम् रथमेव तु ।
 बुद्धिं तु सारथीं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।
 इंद्रियाणि ह्याबाहुर्विषयांस्तेषु गोचरान् ॥
 "जीवात्मा हा रथातून प्रवास करणारा स्वामी आहे. शरीर हा रथ होय. बुद्धी हा सारथी असून, मन हा त्याचा लगाम आहे. जीवात्मा ह्या लगामाने इंद्रियरूपी घोड्यांना काबूत ठेवतो."

 आजच्या युगात हे रूपक मनापासून अभ्यासण्याजोगे आहे. आज आमची खरी व्याधी आहे ती आत्यंतिक अवनत मनाची. मग इंद्रिये भरकटली तर नवल नाही. घोड्यांना लगामच नाही. सर्व भूतमात्रांचा आत्मा एकच आहे. हा भूतान्तरात्मा त्या त्या ठिकाणी त्या रूपाचे प्रतिरूप होऊन राहत असतो. मुंगीपासून हत्तीपर्यंत किंवा सूक्ष्म पाणजीवापासून ते अगदी व्हेल माशापर्यंत प्रत्येकात तोच आत्मा त्या रूपाचे प्रतिरूप होऊन जातो, व तसा राहत असतो. आत्मा शिकवून समजत नाही, बुद्धीने त्याचे आकलन होत नाही. एखाद्याच व्यक्तीला जो जाणवतो. हा आत्मा अस्पर्श, अरूप, अव्यय, अरस, अनादी, अनंत या सर्वांच्या पलीकडचा आहे. उपनिषदात "हे नाही, ते नाही, काहीच गुणधर्म नाही" असा नन्नाचा पाढा वाचणारे नकारात्मक वर्णन आहे. मग प्रश्न पडतो की सत्य काय आहे ? आत्मा आणि परमात्मा या दोघांच्याही बाबत ही गोष्ट लागू आहे. सत्य एकच त्याचे अस्तित्व, तो आहे. आपण ज्ञान इंद्रियांवाटे मिळवतो. आत्म्याचे बाबत इंद्रियांद्वारा तो समजणे अशक्य. तो फक्त अंतर्मनालाच जाणवतो. आणि ज्याला या सत्याची जाणीव झाली तो मानव या जगात असूनही जगापलीकडे पाहू शकतो. या

५९