पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सेंट फ्रान्सिस यांची आहे. आपल्या तत्त्वज्ञानातही त्या अमूर्त तत्त्वाचे चिंतन व सर्व प्राणीमात्रा विषयी प्रेम, त्यांना आपल्या बरोबरीने समजणे व वागवणे हे आहेच. विज्ञानाचे कर्मकांड झाल्यामुळे व बुद्धीचा अतिशय स्वार्थापोटी वापर यामुळे आपण साधुसंतांची शिकवण विसरत आहोत व स्वार्थापोटी निसर्गाचा व ओघानेच आपलाही नाश ओढवून घेत आहोत.
 सेंट फ्रान्सिस, शमान असे परदेशी किंवा आपले सत्यकाम जाबाली, रोहित हे लोक प्राणीमात्रांशी कसे बोलू शकत असत? हरवलेले प्राणी परत घरी कसे येत असत? या प्राण्यांच्या मालकांना घराचा रस्ता माहीत होता. ते पाळीव प्राणी व मालक यांत निश्चितपणे मनोमीलन म्हणा किंवा मन सर्वत्र-सर्व प्राण्यांमध्ये असते ते तत्त्व सत्य असले पाहिजे. आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आत्मा एकच आहे. तो अमूर्त, सर्वविश्वव्यापी, प्रत्येक प्राणीमात्रात अस्तित्वात असणारा असाच आहे. तो अजर व अमरही आहे. ल्याल वॅटसन हा एक अत्यंत व्यावहारिक व विज्ञानवादी असा जीवशास्त्राचा अभ्यासू तज्ज्ञ होता. तो म्हणतो -
 "मला असं वाटतं की असा काहीतरी एक आदर्श प्रवाह असावा जो सर्व प्राणीमात्रांना कवटाळत असावा. यामुळेच ते एकमेकांचे विचार, कल्पना समजू शकतात, आपल्या अंगी बाणवू शकतात. जीवशास्त्राचा अभ्यासू म्हणून माझी अशी धारणा झाली आहे की ही जी जाणीव, किंवा ज्ञान अथवा अंतर्ज्ञान आहे त्याला काल, अवकाश किंवा प्राणीमात्रांचे कायिक स्वरूप या कशाचेही बंधन नाही. माझी अशी धारणा आहे की ज्याप्रमाणे एखादा प्रवाही पदार्थ त्याच जातीच्या पदार्थाकडे ओढला जातो (osmosis) त्याचप्रमाणे आपले ज्ञान जरुरीनुसार अशाच न दिसणाऱ्या वा जाणवणाऱ्या अतिशय मोठ्या साठ्यातून आपल्याकडे येत असते, जणू मनाचीच वैश्विक पातळीवरील परिसराशी एकरूपता. असा अनुभव येणे हे आश्चर्यजनक व स्वानंदी स्वरूपाचे असते."
 उपनिषदे, गीता, पातंजल योगसूत्रे किंवा ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा अनेक संतांच्या वाङ्मयांत हेच तत्त्वज्ञान आढळते. तुकारामाच्या अभंगाप्रमाणे ही वनचरे आमचे सोयरेधायरे आहेत. साहजिकच अशा सोयऱ्याधयऱ्याबरोबरचे संबंध प्रेमाचे असतात, आपण त्यांच्याबरोबर विचारविनिमय करू शकतो, सुखदुःख वाटून ४२