पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याने ईश्वराच्या सर्व लेकरांत समानता मानली व तसा प्रचार केला. हा सर्व प्राणीमात्रांच्या बाबतचा समभाव ही धारणा त्या काळातील पाश्चात्य धारणेच्या अगदी विरुद्ध होती व आजही आहे. यामुळेच प्रो. लिन व्हाईट याने सेंट फ्रान्सिस याला “थोर पर्यावरणवादी, पृथ्वी, पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या समानतेवर व चांगल्या संबंधावर श्रद्धा ठेवणारा असा संत होता" असं म्हटलं आहे. सामान्य माणसांची श्रद्धा व लीनची वैज्ञानिक दृष्ट्या चिकित्सा यांत तसं काही मूलभूत अंतर नाही. भारतीय तत्त्वज्ञानात तर अति प्राचीन काळीही ऋषिमुनींची हीच धारणा होती. जैन धर्मीय तर अहिंसावादी, सर्व प्राण्यांवर प्रेम करणारेच होते. मुंगीलाही धक्का लावू नये ही त्यांची धारणा. साधी गोष्ट घ्या. मध मिळवताना पूर्वी काही मधमाश्या मरत. यामुळे 'मध खाणे' हे त्यांच्या धर्मात बसत नाही. भुकेल्यांना अन्न द्या ही माणुसकी. पण मुंग्यांना सुद्धा साखर द्या असे म्हणणे म्हणजे सर्व प्राणीमात्रांची समानता मान्य करणे आहे. मानव भुकेला असेल तर करुणेने त्याला अन्न द्या, हाच भाव, हाच नियम मुंगीसारख्या सूक्ष्म जीवालाही लागू करणे हे उन्नत मनाचे लक्षण. भारतातील सर्व धर्मीयांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ही श्रद्धा होती. ही भावना ख्रिस्तपूर्व हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती.

 प्रो. व्हाईटची अशी दृढ भावना आहे की, आधुनिक विज्ञान व शास्त्रे आपल्या परिसरनाशाच्या गंभीर समस्येला किंबहुना या आणीबाणीच्या कालाला रोखू शकणार नाहीत. मानव व प्राणी यांच्या मनोभावनांची देवाणघेवाण, समज हीच आज मानव सर्वनाशाच्या कड्यावर उभा आहे त्याला वाचवू शकेल. असे सर्व अभ्यास हेच सांगतात की तीच परिस्थिती मानवाच्या आरोग्याला हितकारक आहे. दिलीप राजा सिंहाला सांगतो की, तू भुकेसाठी त्या कामधेनूला खाऊ नकोस, मला खा. ही प्राणीमात्रांवरील प्रेमाची, त्यांच्या संकटात सहभागी होण्याची उच्च मानसिक अवस्था. विज्ञान कितीही पुढे गेले तरी अशी उन्नत मनाची स्थिती त्याला कधीही निर्माण करता येणार नाही. प्रो. व्हाईट कोठल्याही धर्माला श्रेष्ठ किंवा निष्ठ मानत नाही व त्यामुळे धर्म बदलण्याचाही सल्ला देत नाही. तो म्हणतो की, "आपल्या स्थानिक मूलाधार असणाऱ्या संकल्पनांत बदल झाला पाहिजे. निसर्गाकडे पाहण्याची फक्त वैज्ञानिक किंवा बौद्धिक दृष्टी अपुरी आहे. त्याला निश्चितपणे धर्म व परमार्थ यांच्या विचारांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे." हीच शिकवण

४१