पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकाग्रता वाढू शकते. या विधानात आपल्याला ध्यानधारणेचा उपयोग सर्वांनाच सारखा का होत नाही याचे काही प्रमाणात उत्तर मिळते. अर्थात ही शक्ती वाढवण्यासाठी अष्टांगयोगाची बाह्यांगे व प्रत्याहार यांची प्रथम साधना न टाळता येण्यासारखी आहे हे स्पष्ट आहे. हे ज्या प्रमाणात साधते त्याच प्रमाणात ध्यानधारणा सफल होते. ध्यानधारणेमुळे मिळणाऱ्या यशाचा प्रारंभ व पूर्णत्वाने यशप्राप्ती या दोन घटनांमध्ये अनेक अस्थिर घटकांचे अंतर आहे. ते काही प्रमाणात समजून घेण्याचा आपण नंतर प्रयत्न करू. ते अस्थिर घटक आपण जाणत नसल्यामुळे ध्यानाचे नुसते कर्मकांड होते. मग यशाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे?
 प्रकार ४ : संगीत :
संगीताबद्दल आपण पूर्वीच समग्र विचार केला आहे. फक्त रुग्णाला मनापासून काय आवडते ही गोष्ट महत्त्वाची. कोणाला शास्त्रीय संगीत आवडेल. यातील ख्यालगायकी ही अतिशय शांत व अत्यंत मंद वेगाची असते. यातून गायक पुढे द्रुतमध्ये जातो. ज्यांना आवड आहे त्यांना निश्चित फायदा होईल. दुसरा प्रकार उपशास्त्रीय संगीत. असेच प्रकार नाट्यसंगीत, भावगीत वगैरे. प्रत्येक प्रकारात कदाचित वेगळी पण गोडी असतेच. भावभावनांना स्पर्शन जाणारे संगीत हेच उपयुक्त ठरेल.
 प्रकार ५ : इतर प्रकार:
 यापूर्वी जपजाप्य, प्रार्थना वगैरे हे खऱ्या अर्थाने ध्यानधारणेचीच निराळी रूपे आहेत, मानसपूजाही त्याचाच भाग.

 अनेक विकार तसे मारक आहेत. यासाठी वरील पद्धतींचा दुहेरी उपयोग होऊ शकेल. एक म्हणजे हा प्रतिबंधात्मक उपाय आहे व दुसरे म्हणजे विकार बरा करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. श्रद्धेने करावयाच्या कार्याला आपण धार्मिक विधी म्हणतो. कर्मकांड न करता केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे धर्मकृत्य किंवा विधी. धार्मिक विधीप्रमाणेच ध्यानधारणाविधी दैनंदिन कृत्य व्हावयास पाहिजे. पूजा केल्याशिवाय अन्नग्रहणच काय पण तोंडात पाणीही न घालणारे सश्रद्ध लोक पूर्वी होते. यात मनाची एकाग्रता - एकरूपता यावाटे मनाचे उन्नयन अपेक्षित असे. हे विधी दिनचर्येचा भाग झाले. ते श्रद्धेने पार पाडले तर विकार उद्भवणारच नाही

२८४