पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकारमुक्ती व अध्यात्म : नातेगोते
___________________________

 सर्व प्रकारच्या विकारावर आहाराखेरीज योगाभ्यास व ध्यानधारणा हा सर्वसमावेशक उपाय आहे. याची वेगळी रूपे म्हणजे जप व मानसपूजा. इमेजरीचे प्रवर्तक पुढील उपाय सांगतात :
 प्रकार १ :

 प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित करून सर्व शरीराचा ताण नाहीसा करावा. (हे तत्त्व पूर्णपणे विपश्यनेचे आहे.) या वेळी प्रत्येक श्वासाचे वेळी हा श्वास माझा विकार बरा करणार आहे असे मनाला बजावावयाचे. त्याच वेळी कोणताही एक रंग असलेले धुके तुमच्या शिरोधारेतून निघून हळूहळू सर्व शरीरभर पसरत आहे व त्यामुळे संपूर्ण देह ताणविरहित होतो आहे, अशी कल्पना करावयाची. प्रत्येक श्वासाला मी श्वास घेतला आता माझे हातांना ऊब येत आहे, नंतर पायांना, याप्रमाणे हळूहळू सर्व शरीर उबदार होते आहे असे स्वतःला बजावावयाचे. या क्रियेमध्ये इतके एकरूप व्हावयाचे की बाह्यवस्तूंचे भान राहता कामा नये. शेवटी मान, डोके येथवर यावयाचे. या वेळी आपले हातापायाचे स्नायू, पोटाचे स्नायू, मानेचे स्नायू पूर्ण सैल झाल्याचा अनुभव येतो.

२८२