पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीच वाटत नाही. शिबिरार्थी साधकांना त्या काळात आलेले अनुभव नंतर सांगितले जातात. पातंजल योगसूत्रांत ध्यानासाठी धारणेची जरुरी सांगितलेली आहे. ही धारणा म्हणजे कोणतीही अशी गोष्ट, जिची प्रतिमा ध्यानकालात सतत मनश्चक्षूंसमोर राहिली पाहिजे. मग ती देवाची मूर्ती, श्लोक, वृक्ष किंबहुना काहीही, यावर मन केंद्रित करावयाचे. मन पूर्णपणे केंद्रित झाले की तेच ध्यान होते. विपश्यनेत धारणा म्हणजे आपला श्वास. यावरच सर्व मन केंद्रित करावयाचे असते. सुरुवातीस पाच-दहा मिनिटेसुद्धा अनेकांना याचा त्रास होतो. याला कारण असते आपली जीवनशैली. आराम या कल्पनेपायी आपल्याला जेवायला टेबलखुर्ची, अभ्यास-लिखाण यांसाठी टेबलखुर्ची, दिवाणखान्यात सोफा यामुळे खाली बसणे होतच नाही. मलविसर्जनासाठी सुद्धा कमोड हवा असतो. वृद्धापकाळी हे ठीक आहे कारण वयोमानानुसार क्षीणत्व आलेले असते. परंतु अगदी ५-१० वर्षाच्या बालकांनाही खाली बसता येत नाही. काही जण वयाच्या ८० व्या वर्षीही वज्रासन, सुखासन, पद्मासन घालू शकतात याला कारण त्या सांध्यांना सतत त्याची सवय होते. अवयव न वापरल्यास तो क्षीणच होत जातो. विपश्यनेत प्रथम आपण आसन शिकतो व सवयीने पुढे म्हणू तेवढा वेळ आपल्याला बसता येते. पुढे प्रत्यक्ष साधना करताना स्वतःच्या मनाचे सामर्थ्य वाढल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. यातूनच एकाग्रता, चिकाटी व संवेदनशीलतेचा लाभ होत असतो. यातील मौन म्हणजे बर्हिमुखतेपासून अंतर्मुखतेकडे होणारा प्रवास. विपश्यना हा शब्द वि + पश्य यापासून आलेला आहे. वि म्हणजे विशिष्ट श्रेयस्कर व पश्य म्हणजे पाहणे. अशी ही अतीत विद्या आहे. यालाच शुद्ध धर्म असेही म्हटले जाते.

 धर्म म्हणजे काय? याचा खरा अर्थ काय? लौकिक अर्थाने आज हिन्दू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध यांना आपण धर्म म्हणतो. परंतु हे आहेत संप्रदाय, पंथ. या सर्वांच्या पारमार्थिक गाभ्याला आपण धर्म म्हणावयास पाहिजे. आपल्या तत्त्वज्ञानात धर्म याची सोपी व्याख्या सांगितलेली आहे. 'धारयति इति धर्मः।' किंवा 'धारणात् धर्मः ।' सर्वांना एकत्र ठेवणारा, मनाने जोडणारा तो धर्म, जेव्हा पंथ, जात, देश, काल यापलीकडे जाऊन जीवनपद्धतीतील सर्व मानता, खऱ्या माणुसकीचा स्पर्श यांचा अंतर्भाव होतो, तेव्हाच तो धर्म होतो. धर्म हा वैश्विक आहे. धर्माची दहा लक्षणे सांगितली गेलेली आहेत.

२६५