पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकतो, रोगनिवारण सोपे करू शकतो. हीच आजची आपली खरी गरज आहे. आपल्यापुरती हीच सिद्धी आहे. हाच मूळ हेतू या पुस्तकाच्या लिखाणामागे आहे.
विपश्यना :
 श्री. सत्यनारायण गोएंका ही आधुनिक काळातील योगी व्यक्ती म्हटले तर त्यात फारसे आश्चर्य वाटू नये. श्री. पांडुरंगशास्त्री आठवले हेही असेच आधुनिक योगी. श्री. गोएंका यांनी विपश्यना विश्व विद्यापीठ ही संस्था इगतपुरीत सुरू करून बौद्ध संप्रदायातील 'विपश्यना' म्हणजेच 'ध्यान धारणा' या मार्गे समाजाचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली व आज त्याला प्रचंड वृक्षाचे रूप आलेले आहे. हेच कार्य पांडुरंगशास्त्री आठवले हे 'स्वाध्यायावाटे' करत आहेत. येथे आपण विपश्यनेविषयीच विचार करणार आहोत. गौतम बुद्धांचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ या वर्षी झाला. राजपुत्र असूनही जीवनातील दुःखे, व्याधी, मृत्यू या सर्वांच्या हिडीस दर्शनाने त्यांना जीवनाचा अर्थ शोधण्याची ओढ लागली. पत्नी, पुत्र, राज्य यांचा त्याग करून अनेक वर्षे सायास सोसूनही त्यांना ह्या दुःखांचे निवारण करण्याचा मार्ग सापडेना. शरीराला नाना प्रकारचे क्लेश देऊन श्रमणपरंपरेनुसार ते प्रयत्न करत राहिले. उपास-तापास करून देह अस्थिपंजर झाला. एक दिवस तर भोवळही आली. तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की शरीराचे फाजील लाड करणे जेवढे चूक तेवढेच अतिक्लेश देणे हेही चूकच. त्याऐवजी मध्यम मार्ग पाहिजे. तेव्हा ते स्वतःला मध्यममार्गी म्हणू लागले. अखेर त्या विमनस्क स्थितीत अखंड चिंतन करीत ते गयेजवळील नैरंजन वनात आले व बोधिवृक्षाखाली चिंतन करत बसले. यातूनच त्यांना प्रकाश दिसला व ते बुद्ध झाले. याच पंथाचे म्हणा किंवा धर्माचे म्हणा जे तत्त्वज्ञान त्याला बौद्ध दर्शन म्हणतात. विपश्यना हा त्याअंतर्गत एक भाग.

 ही साधना वरवर पाहता अतिशय सोपी परंतु अमलात आणावयास मनाचा फार मोठा निग्रह लागतो. विपश्यना विद्यापीठातर्फे दहा दहा दिवसांची शिबिरे भरविण्यात येतात. विपश्यनेला पूर्ण शांतता आवश्यक असते. हे दहा दिवस साधक किंवा शिबिरार्थी म्हणा संपूर्ण मौन पाळतो. मौन पाळणे किती कठीण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव पहिल्याच दिवशी येतो. हळूहळू त्याची सवय होते व पुढे त्याचे

२६४