पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला असावा. औषधे देऊन गुण न आल्यामुळे शेवटी त्यांनी शल्यकर्म करण्याचा निर्णय घेतला.
 पोट उघडून पाहिल्यावर आत पू झाला आहे, तसेच एक बीजांडकोश बाद झाला असून दुसऱ्या बीजकोशाला गळू झाले आहे असे आढळले. तेव्हा पू साफ करून बीजांडकोशही काढून टाकण्यात आले. इस्पितळात असताना सौ. माणिकताईंना खोकला झाला. जखमेचे टाके तुटून त्यातून परत घाण बाहेर येण्यास सुरुवात झाली. तेव्हा परत ऑपरेशन करण्यात आले. वीस-पंचवीस दिवस इस्पितळात राहूनही स्थितीत काहीच सुधारणा होईना. शेवटी त्यांनी व त्यांचा मुलगा यांनी उमेशचे बालमित्र असलेल्या दुसऱ्या शल्यचिकित्सकांकडे ही केस नेली. पहिल्या इस्पितळात काहीच समाधानकारक चिकित्सा झालेली नसल्याने परत ऑपरेशन करावयाचे ठरले. अशी परत दोन ऑपरेशन्स झाली, तरीही बरे वाटेना. तेव्हा शेवटचे पाचवे ऑपरेशन करण्यात आले. त्या वेळी मोठ्या आतड्याचा काही भाग कुजला आहे असे आढळल्यावरून तो भाग काढून टाकावा लागला व नंतर मात्र हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली. जखमा पूर्ण बऱ्या होऊन त्यांचे सामान्य जीवन सुरू होण्यास एक वर्षापेक्षाही जास्त काळ जावा लागला. तिसन्या ऑपरेशननंतर त्या जगू शकतील असे काही माझे मन सांगत नव्हते. त्यामुळे मी नियमित प्रार्थना करत होतो. एक-दोन वेळा त्यांना भेटून आल्यावर तर मन फारच उदासीन झाले होते. त्यांची कन्या डॉ. राजश्री म्हैसूरहून मुद्दाम आली व आईच्या सेवेचा ताबा घेतला. त्यामुळे पुत्र व सुना यांना थोडा आराम मिळू लागला. परमेश्वरकृपेने त्या पूर्ण बऱ्या झाल्या.

 या कहाणीमधून दोन महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात. एक म्हणजे आधुनिक वैद्यक-शास्त्राची मर्यादा व त्यांचा वापर करणारांचा कारुण्यभाव. वैद्यकशास्त्र हा काही अंतिम शब्द निश्चित नाही. परंतु त्यात जे नवनवीन शोध लागत आहेत, यांत्रिक सहायक निर्माण होत आहेत, त्यामुळे निदान करण्यात खूपच मदत मिळू शकते. मग सौ. माणिकताईंना पाच पाच शस्त्रक्रिया व एक वर्ष मरणयातनांना का तोंड द्यावे लागले? याला ग्रहमान म्हणावयाचे की नशीब म्हणावयाचे? ग्रहमान व नशीब यापेक्षा अतिशय सशक्त अशी एक वाट आहे. ती म्हणजे निर्लेप-शुद्ध श्रद्धेची. सौ.

२११