पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डी. एन्. ए. वृक्षवल्ली घेतात व त्यामुळे त्यावर काही गाठी निर्माण होऊ शकतात. म्हणजे गुणसूत्रातील डी. एन्. ए. याची विभागणी, देवाणघेवाण ही जीवाणू व वृक्षात होऊ शकते. तेव्हा अनेक गोष्टींची निरनिराळ्या प्राणीमात्रांत देवाणघेवाण होत असल्यामुळे त्यांच्यांत अभेद्य भिंती नाहीत. मग त्यांच्यांत मूलभूत फरक उरत नाही. आकार वेगळे घटक सारखे व त्यांची देवाणघेवाणही होऊ शकते. आपण म्हणतो परमेश्वर हा सर्वत्र आहे, प्राण्यांत आहे, मानवांत आहे. वृक्षवल्लीत आहे. यामुळे सर्व प्राणीमात्र समान आहेत, त्यांच्यांत बंधुत्वाचे नाते आहे. ते या अर्थाने सत्य आहे. आता विषाणू म्हटले की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. त्याच्याशी संबंध म्हणजे अनेक रोगांना निमंत्रण. परंतु हार्वर्डचा जीवशास्त्रज्ञ बर्नार्ड डेव्हिसचे असे निश्चित स्वरूपाचे मत आहे की, व्हायरस हा मूलतः न्युक्लिक ॲसिडची निरनिराळ्या जीवांत अदलाबदल करण्यासाठी निर्माण झाला व उत्क्रांत झाला. डेव्हिस म्हणतो की, "हे समजण्यास कठीण नाही की सर्व प्राणीमात्रांतील डी. एन्. ए. ची एक साखळी आहे व ह्या साखळीमुळेच डी. एन्.एं.ची अधूनमधून गाठभेट होत असते. यामुळेच विषाणू हे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सूक्ष्मजीव, हे सर्व जीवमात्रांची / प्राणीमात्रांची एकमेकांशी संबंधाची जी साखळी आहे त्यातील एक सहभागी आहेत." निसर्गाची जी साखळी आहे ती आपण जाणतोच. त्यातील एक दुवा तुटला तरी त्याचे दुष्परिणाम घडतात. हे निरनिराळे दुवे जोडून, त्यांची एक साखळी बनवून त्यांचे नातेसंबंधनिर्मिती ह्या विषाणूंच्यामुळे झालेली आहे, म्हणजे अणूपासून सूक्ष्मजीव व नंतर शरीरधारक मनुष्य व प्राणी ह्यांचे जे आपणास अस्तित्व आढळते, त्यांत कोणीही स्वतंत्र वा वेगळा नसून त्यांची एक साखळी आहे. मनुष्य हा एखाद्या बेटासारखा एकटा नाही.
 हे नीट ध्यानात घेतले की एक गोष्ट स्पष्ट होते की ज्याप्रमाणे आपल्या शरीराच्या अणूंचे एकमेकांशी संबंध, सुसंवाद हे जरूर आहे तसे त्यांचा बाह्य जगताशी संपर्कही त्यांच्या आरोग्यासाठी - अस्तित्वासाठी जरूर असतो. यामुळेच आपण आपली प्रकृती उत्कृष्ट स्थितीत तेव्हाच ठेवू शकू, जेव्हा मानवा मानवांतील निरोगी संबंध हे बहराला येत राहतील. येथे जातिजमाती, लिंग, लहान-मोठा असे आपणच निर्माण केलेले गंभीर भेद अस्तित्वात असू शकत नाहीत. आपल्या शरीरातील अणू फक्त आपल्या देहापुरते मर्यादित असू शकत नाहीत तसेच एकमेकांशी दृढतर संबंध १५९