पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कठीण होते. किंबहुना आपली गुणसूत्रेसुद्धा फार काळ त्यांचे अस्तित्वाचे सातत्य टिकवू शकत नाहीत. कारण त्यांची बाह्यजगतातील मूळ घटकांशी सतत देवाण- घेवाण चालूच असते. वंशशास्त्रानुसार आपली गुणसूत्रे मूळ नमुन्याप्रमाणे आयुष्यभर स्थिर राहत असली तरीसुद्धा आपण आपले कालानुसार बदलत जाणारे शारीरिक स्वरूप टाळू शकत नाही. जन्मतः बाल्य, नंतर तारुण्य व शेवटी वार्धक्य हे जे शारीरिक बदल कालानुसार घडत असतात ते कितीही इच्छा असली तरी आपण टाळू शकत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली गुणसूत्रे तीच असतात. मानवी जीवनाचे अमानवी, अनाकलनीय हे स्वरूप आहे. कारण काहीही असले तरी शेवटी मृत्यू अटळ असतो. आणि दररोज अनेक व वर्षभरात सर्व पेशी मरत असूनही आपली स्मृती मात्र नष्ट होत नाही, तसाच आपला 'अहं' ही शेवटच्या घटकेपर्यंत जिवंतच राहतो. याचा अर्थ काय ? शरीराचा जर दिनप्रतिदिन -हास होत असेल, तर या 'मी' चाही - हास व्हावयास पाहिजे. पण तसे होत नाही. तेव्हा आपली जाणीव, आपले ज्ञान ह्याच्या पलीकडे या -हासाचा उगम असावा. वर वर पाहता आपले केस, आपली नखे जशी दर क्षणाला दररोज वाढत असतात तसाच आपला देहही बदलत असतो, नवा होत असतो. आपला देह हा पंचमहाभूतांचा आहे असे आपण म्हणतो. तेच विज्ञान वेगळ्या स्वरूपात सांगत असते. आपला देह सतत वायू, पाणी, कार्बन वगैरे अणू बाहेरून घेतच असतो हे आपणास माहीत आहे. परंतु त्याहीपलीकडे जे दिसत नाही, अनाकलनीय आहे असेही काहीतरी घेत असतो, ज्याचा मूलस्रोत आपणास सापडत नाही. आपल्या शरीरातील हाडांमध्ये सापडणारा फॉस्फरस. तो आपल्या शरीराचा एक सूक्ष्मघटक बनला. हा पदार्थ याची उत्पत्ती ही सूर्यमाला तयार झाली त्या कालातील आहे. पंचमहाभूतांतील पृथ्वी हा एक घटक. या पृथ्वीच्या बाह्यांगात आज आढळणारे अनेक सूक्ष्म घटक हे विश्वाच्या उत्पत्तीपासून आले आहेत. असाच फॉस्फरस, तो शेवटी आपल्या देहाचा एक सूक्ष्म घटक बनला. तेव्हा खऱ्या अर्थाने शरीराला आखीव-रेखीव अशा परिसीमा सांगता येणार नाहीत. शारीरिक 'मी'पणा ह्याची उत्पत्ती सूर्यमालिकेत म्हणजे तारे, नक्षत्रे, चंद्र, सूर्य अशा विश्वातच झाली आहे. त्यामुळे आपली पाळेमुळे त्या नक्षत्रे व तारे यांच्याशी निगडीत आहेत.
 आपली नाती पृथ्वीवर सुद्धा इतर जीवमात्रांशी निगडीत आहेत. जीवाणूंमधील १५८