पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपयोग असतो."
 हा अभ्यास अप्रत्यक्षपणे हे ठामपणे सांगतो की, स्त्री-पुरुषांचे प्रेम म्हणजे फक्त लैंगिक ओढ नाही. त्याग, सुख-दुःखांत वाटणी, सहवासाची ओढ हे घटक प्रेम ह्या शब्दात प्रामुख्याने अनुस्यूत आहेत. पत्नीपासून ह्या गोष्टी मिळत नसतील तर विकारांना खतपाणीच मिळते. शरीराची प्रतिकारशक्तीच हळूहळू नष्ट होऊ लागते. ह्याच गोष्टीचा उपसिद्धांत म्हणजे पुरुष जे प्रेम पत्नीकडून अपेक्षितो, तेवढेच प्रेम त्यानेही पत्नीला दिले पाहिजे. प्रेम पेरले तरच ते उगवते (Love begets Love). कवी माधव ज्युलीअन यांची कविता सुप्रसिद्ध आहे. "प्रेम लाभे प्रेमळांना - त्याग त्याची ही कसोटी. " समाजाचे काही रीतिरिवाज असतात, काही बंधने असतात. सामाजिक नियम पाळले तर समाज तुमचा साहाय्यकर्ता बनतो, तुला मनःशांती मिळते. तशीच मनःशांती जवळच्या नातेवाइकांकडूनही मिळते व त्यामुळे आरोग्य उत्तम राहते. असा एक अभ्यास कॅलिफोर्नियाच्या अलमेडा या कौंटीमध्ये करण्यात आला. ४७०० स्त्री-पुरुषांची नऊ वर्षे पाहणी केली गेली. यातून जे निष्कर्ष काढले गेले ते असे - पुरुषांमधील मृत्यूचे प्रमाण हे जे अविवाहित होते त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते. तसेच ज्या लोकांना मित्र कमी होते, नातेवाईकही फारसे नव्हते अशा लोकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. परंतु स्त्रियांचे बाबत मात्र थोडा वेगळा अनुभव आला. लग्नसंबंधाचा - पतिपत्नीसंबंधापेक्षा मैत्री, चर्चची मेंबरशिप म्हणजे वृत्ती अध्यात्माकडे ओढ घेणारी आणि नेहमी आपल्या मैत्रिणींच्या गटात आनंदात वेळ घालविणाऱ्या स्त्रियांचे बाबत मात्र मृत्यूचे प्रमाणे कमीच होते. अशीच पाहणी १९६३ साली 'यंग' यांनी केली होती. त्यांना असे आढळले की, ज्या पुरुषांची पत्नी निवर्तली होती त्यांच्यांत मृत्यूचे प्रमाण मोठे होते. आपल्याकडे भारतात सुद्धा पती मृत्यू पडला तर स्त्रीला पुन्हा विवाहाची परवानगी नसे. त्यांचे केशवपन होत असे. या स्त्रिया अत्यंत धार्मिक वृत्तीच्या, नित्यनेमाने पूजाअर्चा करणाऱ्या, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणाऱ्या असत. त्या वृद्ध होऊन निजधामास जात. येथे त्यांच्या धार्मिक भावना, आपला भार ईश्वरावर टाकून आलेल्या सर्व संकटांना त्या खंबीरपणे तोंड देत. याचा अर्थ असा आहे की प्रेम आणि भक्ती या भावना आरोग्याला उपकारक आहेत. आज वृद्ध लोकांना पत्नी वारल्यावर मोठ्या मानसिक ताणांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी विधवा समवयस्क पुरुषाबरोबर विवाह १५२