पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्बाचित कबिता तसलिमा नसरीन अनुवाद - मृणालिनी गडकरी प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे प्रकाशन - २००० पृष्ठे - ११३, किंमत - रु. ७०/-



निर्बाचित कबिता

 परवा पुस्तकांच्या शोधात तसलिमा नसरिनचा काव्यसंग्रह “निर्वाचित कविता' हाती आला. माझ्याकडे तिची सर्व पुस्तके तिच्या सहीने भेट मिळालेली आहेत. पण याच एका पुस्तकावर मात्र तिने स्वहस्ताक्षरात 'with love' अशी मोहर उठवलेली आहे. याचा इतकाच अर्थ आहे की, ते तिचे आवडते पुस्तक आहे, बाकी काही नाही. 'निर्बाचित' शब्द बंगाली. मराठीत त्याचा अर्थ होतो 'निवडक'. सन १९८० च्या सुमारास त्या कविता लिहू लागल्या. १९८२-१९९३ या दशकात त्यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यांचे समग्र साहित्य म्हणजे स्त्रीत्वाचा घेतलेला शोध होय! तशाच कविताही! काहींना त्या पुरुषविरोधी वाटतात. वाटतं त्या सतत पुरुषास आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आजवर पुरुषाने स्त्रीस वस्तू, पशू, उपभोगाचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले आहे. तिची कविता स्त्रीस मनुष्य बनवण्याची विनवणी नसून मागणी आहे. तो जोगवा खचितच नाही. असेल तर अन्यायाला फोडलेली वाचा आहे. नि ती स्त्री हक्काचा जाहीरनामा आहे. तो पुरुषी मानसिकतेविरुद्ध स्त्रीने पुकारलेला जिहाद आहे. 'निर्बाचित कबिता' (१९९३) शिवाय 'निर्बासित बाहिरे अंतर' (१९८९), 'आमार किछु आय असे ना'

वाचावे असे काही/१५६