पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुनर्वसनाच्या अद्यतन कार्यक्रमाचा (जपानसारखा) आपण येत्या ५० वर्षांत तरी विचार करू शकू का? ज्या देशात कुटुंबाधारित सामाजिक सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नसते, त्या देशाचं बाल्य नेहमीच संकटग्रस्त असते', हे समाजशास्त्रीय तत्त्व आहे. त्याकडे डोळेझाक म्हणजे इतर विकासकामांवर केलेला खर्च वाया घालवल्यातच जमा असतो, याचं भान जोवर इथल्या राजकीय इच्छाशक्तीस येणार नाही तोवर इथली वंचित बालके वा-यावर वाढणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
वंचित महिलांचा विजनवास

 बालविवाहामुळे कोवळ्या वयात गर्भप्राप्ती, परिणामी प्रसूत माता व बालकमृत्यू प्रमाणात वाढ इत्यादी प्रश्न कायद्याच्या अकार्यक्षम अंमलबजावणीचे फलित होय. हुंडाबळीचे प्रमाण याच कारणामुळे आहे. पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळे स्त्रियांना येणारे वैधव्य, बाहेरख्याली पुरुष वृत्तीमुळे स्त्रियांच्या परित्यक्ततेत वाढ इत्यादींमुळे महिलांचे जीवन अस्थिर व धोकादायक बनत चालले आहे. घटस्फोटित महिलांची संख्या वाढण्याची पूर्वीची पुरुषकेंद्रित कारणे आहेतच. त्यात नवशिक्षित, नोकरी करणा-या, कमावत्या स्त्रियांचा अहंकार व अधिकार भावनेने वाढलेली संख्या या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यास पुरेशी आहे. पूर्वी गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा इ.मुळे वेश्या, देवदासी, तृतीयपंथी निर्माण होत. आता विशेषतः महानगरामध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रचलित वेश्यावस्तींशिवाय स्वतंत्र, स्वगृही वा स्थलांतरित पद्धतीने वेश्या व्यवसायाचे वाढते लोण; अल्पवयीन वेश्यांची बाजारातील वाढती मागणी, त्यामुळे अल्पवयीन वेश्यांच्या प्रमाणात वाढ यासारखे ऐरणीवरचे प्रश्न आपल्या चिंता व चिंतनाचा विषय होत नाहीत. त्यांच्या प्रतिबंध व नियंत्रणाचा कुठला कार्यक्रम आपण राबवितो? पोलिसांच्या धाडी या किती प्रासंगिक दिखाऊ असतात हे लहान मुलेही सांगू शकतील. भिक्षेकरी, वेड्या, रस्ता-प्लॅटफार्मवरील निराधार स्त्रियांवर सर्रास होणारे बलात्कार कोणते सामाजिक अभय सिद्ध करतात? एड्सग्रस्त, अपंग, बंदीजन, महिलांची काय कमी दुरवस्था आहे? ना उपचार, ना संरक्षण ना सुविधा. घरातील गर्या स्त्रिया जिथे जीव मुठीत घेऊन जगतात तिथे वंचित स्त्रियांचा वनवास काय वर्णावा? कुमारी मातांचे प्रमाण कमी झाले का? कामकरी, नोकरी करणा-या शिकणाच्या स्त्रियांचे कार्यालय, कारखाने, शेतमळे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींमधील लैंगिक शोषण व त्रास केवळ कायदा करून कसा संपेल? यासाठी शिक्षण व समाजधारणेत लिंगभेदातीत मानवी समाजनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित व्हायला

मराठी वंचित साहित्य/२४