पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माध्यमिक व प्राथमिक शाळांत भौतिक विकासाबरोबर गुणवत्ता, दर्जा उंचावण्याची संरचना, प्रक्रिया क्रियान्वित करणे, शिक्षक-प्राध्यापकांना विद्यार्थी गुणवत्तेस जबाबदार धरण्याची यंत्रणा/लेखापरीक्षण/बांधिलकी अनिवार्यता विकसित करणे असे मार्ग चोखाळावे लागतील. रिक्त पदपूर्ती, शिक्षक सेवक उच्चाटन, तासिका नियुक्ती संपविणे, बालवाडी ते विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय धोरणाचा अंगीकार, निरंतर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रमात काळानुरूप गतिमान बदल असे एकाच वेळी, बहुअंगी परिवर्तन व गुंतवणुकीचे धोरण शासनास अंगीकारावे लागेल. समाज प्रगल्भ, जागृत, शिक्षित झाल्याने पुढेच जावे लागेल. गडावरून उतरता येणार नाही, दोर कापलेले आहेत. हिरकणी बुरुजावर पहारा देत, 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' अशा निकराच्या, निर्वाणीच्या टोकावर, टकमकी बुरुजावर उभे वर्तमान शिक्षण विषमता पिऊ पाहणाऱ्या अगस्तीच्या प्रतीक्षेत आहे. आज मी या ओळी लिहितो आहे तो २०१५ चा शिक्षक दिन! यासारखे मुक्त शिक्षण चिंतन वर्तमानात दुसरे कोणते असू शकते? या तर अभिमन्यू बनू, अर्जुन बनू, चक्रव्यूह भेदू, मत्स्यभेद करू. सर्वांना समान गुणवत्ता व संधीचे सार्वत्रिक शिक्षण देऊ.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१३८