पान:गांव-गाडा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तपासून अनेक उपयुक्त सूचना केल्या त्यांबद्दल मी त्यांचा फार आभारी आहें. उपरिनिर्दिष्ट सारस्वतांचा व माझा सर्वस्वीं एकाशय आहे असें नाहीं. त्यांचा व माझा अनेक बाबतींत मतभेद आहें. सबब पुस्तकांतील मजकुराची जबाबदारी पूर्णपणें माझी आहे. युरोपांतील संग्रामाच्या ऐन धांदलींत आर्यभूषण छापखाना पुस्तक छापण्याला सज्ज झाला ह्मणून त्याचीही प्रशंसा केली पाहिजे. तें छापतांना ज्या चुक्या राहिल्या त्यांतल्या ठळक चुकांचें शुद्धीपत्र जोडलें आहे.

 वाचकश्रेष्ठ ! इतकें निवेदन करून गांव-गाडा आपल्या पदरांत टाकतों, आणि सादरपणें अशी याचना करतों कीं, त्यांत जीं व्यंगें दिसतील ती कृपा करून मला खुलासेवार कळवावीत, म्हणजे द्वितीयावृत्ती काढण्याचा सुप्रसंग आला तर त्यांचा अगत्यपूर्वक विचार करीन. नियतकालिककर्त्यांना खाशी विनंती केली पाहिजे. ती ही कीं, ज्या अंकांत आभिप्राय प्रसिद्ध होईल तो अंक निदान त्यांतला अभिप्रायापुरता उतारा त्यांनीं मेहरबाननें मजकडे पाठवावा. कारण एक तर मी राहतों त्या खेडयाचे वस्तींत तीं सर्वच येतांत असें नाहीं; आणि दुसरें असें कीं, पुस्तक पाठविल्यापासून इतके दिवसांत इतक्याव्या अंकांत अभिप्राय येईलच अशी खात्री नसल्यामुळे तोंपर्यंत हावरेपणानें अथपासून इतिपर्यंत सर्व मजकूर चाळण्याची गरज पडणार नाही. प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकें वरीलपैकीं दुसरा मार्ग स्वीकारतात. पण आमच्याकडे नांवालौकिकाची अनेक नियतकालिकें दोहोंपैकी एकाचाही अवलंब करीत नसल्यामुळे ही खास विनंति नाइलाजानें करीत आहं. खेड्यांतल्या संभाविताकडे वाणगी ह्मणून खरवसासाठीं कोवळे दूध पाठविलें, तर तें भांडें रिकामें परत न करतां त्यांत कांहीं तरी तांदूळ, गहूं, बाजरी, ज्वारी घालून तें परत केलें पाहिजे अशी जुनाट रीत आहे; आणि ती नागरिकांनाही साजेल ! नमस्कार !!

 कर्जत, जि. नगर,

 आषाढ शु. १ शके १८३७     त्रिंबक नारायण आत्रे.

६ ]