पान:Yugant.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/१३१
 

त्याची पूर्ण जाणीव होण्याच्या आतच तो संपतो. जे घडत जाते, ते तसे घडेल, असे त्या प्रसंगात सापडलेल्या व्यक्तींच्या स्वप्नीही नव्हते. जे घडले, ते मात्र महाभारताच्या कथावस्तूच्या दृष्टीने अती महत्त्वाचे, कथेची धार वाढवणारे, कथेत काही निराळाच अर्थ भरणारे असे होते.
 द्रोण आपल्या शिष्यांची करामत दाखवीत होता. बाहेरच्या राजपुत्रांना आमंत्रण नव्हते. अशावेळी कर्ण आगंतुकपणे आत का शिरला असावा? कर्ण आपले कौशल्य दाखवण्यासाठी रंगात जाणार, ही कल्पनाही अधिरथाला नव्हती. ह्या क्षत्रियसभेत जाऊन आपले कौशल्य दाखवावे, म्हणजे खूष होऊन कदाचित आपला क्षत्रिय बाप किंवा क्षत्रिय आई आपला स्वीकार करतील, अशी कर्णाची आशा असावी. आपले कौशल्य दाखवून आपण अर्जुनापेक्षाही वरचे आहोत, अशी वाहवा सर्वांकडून मिळवून त्याला थांबता आले असते. एवढ्याने त्याचा कार्यभाग साधला असता, पण काही कारण नसता त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धास पाचारण केले.
 ह्या अनुषंगाने परत एकदा वयाचा प्रश्न येतो. ह्या प्रसंगी धर्म सोळा-सतरा वर्षांचा असेल, तर अर्जुन जेमतेम चौदा-पंधरा वर्षांचा असणार. धर्म अठराचा धरला, तरी अर्जुन पंधरा-सोळाचा असणार. कर्ण कुंतीला कुवारपणी झालेला म्हणजे निदान वर्ष-दोन वर्ष तरी धर्मापेक्षा मोठा, म्हणजे अर्जुनापेक्षा कमीत-कमी चार वर्षे वडील , वीस बावीस वर्षांचा. ह्या वयात पंधरा व वीस हे अंतर शरीराच्या वाढीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे असे आहे. पंधरा वर्षाचा मुलगा कुमार, तर वीस वर्षांचा तरुण. उंची, रुंदी, बळ सर्वच शारीरिक दृष्टींनी वरचढ. आपली कला दाखवावी हे ठीक; पण पोराशी द्वंद्व मागणे हे वीराला शोभणारे असे वाटत नाही. शाच्या चरित्रात हाच स्वभावदोष दोन-तीनदा खटकतो
 आवेशाच्या भरात क्षणिक रागाला बळी पडून तो नको ते करून जायचा. उतावळेपणा हा एक प्रकारे क्षत्रियांचा धर्मच; पण त्या