पान:Gangajal cropped.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ९९


डब्यात पेंगलेल्या इतर बायकाही माझ्याप्रमाणं चकित होऊन इकडेतिकडे बघत होत्या. किंकाळी कुठून आली कळलं नाही. एवढ्यात एक स्टेशनही येऊन गेलं. मला वाटलं, बाहेरच्या स्टेशनवरचीच एखादी किंकाळी ऐकू आलेली आहे. पण चालत्या गाडीत आणखी पाच-दहा मिनिटांनी परत तशीच किंकाळी ऐकू आली. ती माझ्या डब्यातून ऐकू येत होती. दुसरी किंकाळी ऐकू आली. मी उठून पाहिलं. त्या मघाशी पाहिलेल्या तरूण मुलीच्या मांडीवरील मूल किंकाळ्या फोडीत होतं. मला पहिल्यानं वाटलं त्यापेक्षा मूल बरंच मोठं होतं. सहा महिन्यांचं असेल. बाई आली तेव्हा जशी स्तब्ध बसली होती, तशीच बसली होती. मांडीवर मूल होतं. मुलाचे डोळे मिटलेले होते. मुठी वळलेल्या होत्या. किंकाळीनं तोंड वेडंवाकडं झालं होतं. पाहता-पाहता मुलाच्या मुठी सुटल्या. तोंड परत नीट सरळ झालं. बाईच्या तोंडावर कसलाच भाव नव्हता. बाकीच्या बायका 'काय झालं? काय झालं?' असं विचारीत होत्या. 'करतं असंच अधूनमधून,' असं तुटक उत्तर देऊन ती बाई स्वस्थ बसली.

 थोडा वेळ तिच्याभोवती उभं राहून जो-तो आपापल्या बाकावर बसला. मीही आपल्या बाकावर बसले. मुलाला काहीतरी मोठा आजार झाला होता, यात शंकाच नव्हती. काय झालं होतं, मला कळत नव्हतं. काही मदतही करिता येत नव्हती. मी स्वस्थ बसून राहिले. एवढ्यात आणखी एक किंकाळी ऐकू आली. पाहिलं तो बाई होती त्याच स्थितीत; तशीच पुतळ्याप्रमाणे नि:स्तब्ध. पण मला काही राहवेना. सबंध आगगाडीत खासच एखादा तरी डॉक्टर भेटेल, त्याला बोलावून मुलावर काही उपचार होतात का हे बघता येईल. असा विचार माझ्या मनात आला. मी उठले. एकामागून एक गाडीचे डबे शोधीत निघाले. शेवटी एका डब्यात डॉक्टर आढळला. त्याला घेऊन परत आले. त्या डॉक्टरबरोबर आगगाडीतला तिकीटतपासनीसही आमच्याबरोबर आला. आम्ही बायांच्या डब्यात शिरलो, तो लागोपाठ दोन किंकाळ्या ऐकू आल्या. आम्ही धावतच ती बाई होती तिथं पोहोचलो. आम्ही मुलाशी पोहोचेपर्यंत किंकाळ्या थांबल्या होत्या. डॉक्टरनं मुलाकडे पाहिलं व छातीला स्टेथॅस्कोप लावला. मूल मेलं होतं. कसलाच उपचार करण्याची शक्यता नव्हती.

 काही करता येणं शक्य नाही. म्हणून डॉक्टर परत गेला. तिकीट चेकर बाईजवळ उभा राहिला. त्यानं विचारलं, 'तुम्हांला कुठं जायचं आहे?" बाई