पान:Gangajal cropped.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ८६

 भाषांमधील नात्यांचे शब्द माझ्याजवळ जमले होते. वंशावळीही खूप होत्या. पण द्राविड कुटुंबरचनेचे सूत्र काही लक्षात येत नव्हते. गोळा केलेली माहिती शक्य तितक्या मुद्देसूदपणे मांडून ‘अमक्या-अमक्या गोष्टीमागील सूत्र काही उमजत नाही,' म्हणून लेख लिहिला. तो प्रसिद्ध झाला, पण मनाचे काही समाधान होत नव्हते. असे महिनेच्या-महिने गेले. असमाधान, सूक्ष्म रुखरूख हा एक स्थायी भाव होऊन बसला होता. पण वरवर मात्र मन आणि शरीरही इतर कामांत व्यग्र होती. एक दिवस मी सकाळी उठले, ती द्राविड कुटुंबरचनेचे उलगडलेले सूत्र घेऊनच. माझा पूर्वीचा लेख काढून त्यात उल्लेखिलेल्या सर्व गोष्टी डोळ्यांखाली घातल्या. आता कशी सार्‍या विसंगतींना संगती लागत होती; एखादेही टोक विनासंदर्भ अधांतरी लोंबत राहिलेले नव्हते. जे विचार करकरूनही समजत नव्हते, ते विनासायास हाती आले तरी कसे? असे काही झाले म्हणजे मला एका ओळीची आठवण होते. "नायमात्मा प्रवचनेन लभ्यः, न मेधया, न बहुना श्रुतेन। यमेवैष वृणुते तेन लभ्यः...।।" हा आत्मा आहे ना, तो प्रवचनाने मिळत नाही, बुद्धीने हाती लागत नाही, पुष्कळ पढून गवसत नाही. तो स्वत: होऊन ज्याला निवडतो, त्यालाच तो मिळतो. ही ओळ मनात आली की, कॉलेजात शिकलेला इंदुमतीस्वयंवराचा सर्ग आठवतो व डोळ्यांपुढे चित्र उभे राहते ते स्वयंवराचे. किती राजकुमार बिचारे जिवाचा आटापिटा करीत होते, पण तिने ज्याला माळ घातली, त्यालाच ती मिळाली. तस्सा खट हा आत्मा आहे. म्हणजे काय खटपटच करू नये? कोणी म्हणतात, ह्या वाक्यात परमेश्वरी कृपेचे सूत्र गोवलेले आहे. ईश्वर म्हणतात ना, तो तपश्चर्येने लाभत नाही, त्याची कृपा व्हावी लागते!

 अगदीच ह्याच त-हेने एक दिवस एकदम मला ज्ञान झाले की, मी एकटी आहे.

 ध्यानी-मनी नसता डोक्यात जो प्रकाश पडतो, त्याला कृपा म्हणता येईल का? ज्ञानाचा हा झोत मलातरी विजेच्या लोळासारखा वाटला. मी त्यात भाजून निघाले, तडफडले. वरून जिवंत होते, तरी आतून मेल्यासारखी झाले. एकटे असणे ही गोष्ट काय एवढी भयंकर आहे? जगाच्या गलबल्याने कंटाळून एकटे असावे, असे वाटत नाही का कधी? मनस्वी राग आला, म्हणजे नाही का आपण होऊनच माणूस जगापासून दूर होण्याचा प्रयत्न करीत?