पान:Gangajal cropped.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / ६५

सौदर्याचा उपयोग नोकरीत बढती मिळण्याकरिता कितपत करावा, की मुळीच करू नये, देवभक्ती करीत असतानाही आचारातील कडवटपणा किती ठेवावा, स्वत:च्या आचारावर कितपत बंधने घालावीत, कुटुंबियांच्या आवडी-निवडी, शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य यांना कितपत किंमत द्यावी, या सर्व गोष्टींना लिखित व त्यापेक्षा अधिक प्रमाणाने अलिखित मर्यादा असतात. ह्या मर्यादा समाजातील निरनिराळ्या व्यक्तींना, निरनिराळ्या असू शकतात. कुमारिकेच्या वागण्याचे नियम, सौभाग्यवतीच्या वागण्याचे नियम व विधवेच्या वागण्याचे नियम हे बऱ्याच वेळा निरनिराळे असतात. एवढेच नव्हे, तर एकाच तऱ्हेच्या नियमांची तीव्रताही निरनिराळी असू शकते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या वयांप्रमाणेही वागणुकीचे नियम निरनिराळे असतात व त्यांच्या अंमलबजावणीच्या कडकपणातही फरक पडतो.

 निरनिराळ्या वर्गातील जातींतील लोकांबद्दलचे नियम निरनिराळे असतात. सर्व तहेच्या लहानमोठ्या नियमांचे उल्लंघन निरनिराळ्या व्यक्तीकडून होत असते, व त्या व्यक्तींना बऱ्याचदा ह्या-नाही-त्या रूपात समाजाकडून धिक्कार, उपहास किंवा प्रत्यक्ष दंड अशा निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागतात. व्यवहारातील सर्वच नियम व त्यांबद्दल वाटणारी आस्था हा एका दृष्टीने संस्कृतीचा पाया आहे व दुसर्‍या दृष्टीने संस्कृतीचे कार्य आहे. समाज रचनेच्या मुळाशी असलेल्या सर्वचलहानमोठ्या नियमांना 'धर्म' ही संज्ञा देणे अयोग्य नाही. समाजधारणेचा पाया म्हणून, आणि समाजधारणा अव्याहत चालावी म्हणून जे काही लिखित आणि अलिखित नियम आहेत, त्या सर्वांना व्यापक अर्थाने 'धर्म' म्हणता येईल. त्याच व्यापक अर्थाने लग्नाच्या बायकोशी वागताना 'मी कोणत्याही समाजधर्माचे उल्लंघन करणार नाही.' अशी शपथ ‘धर्म च अर्थ च कामे च नातिचरामि' ह्या वाक्याने केलेली दिसते. ह्या वाक्यात ‘धर्म' याचा अर्थ वरील व्याख्येइतका व्यापक नसून आपण नेहमी ‘धर्म' हा शब्द जसा वापरतो, तसा संकुचित आहे. पण ‘अतिचर' म्हणजे काय, हा वादाचाविषय होतो; व समाज सारखा बदलत असल्याने समाजाची मूल्ये बदलत असतात; आणि आचार व अतिचार यांच्या मर्यादाही मागेपुढे होत असतात.

 समाजाच्या काही अवस्थांमध्ये आचार व अनाचार यांच्या मर्यादा