पान:Gangajal cropped.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३८ / गंगाजल



यांनतर विविध स्मृती चाळविल्या जातात. वेळोवेळी आपले आवडते महिने बदलत कसे गेले, हे सांगताना खांडेकर विविध महिन्यांची नावे घेतात. शेवटी श्रावणावर येऊन संयमाचे महत्त्व सांगून हा लघुनिबंध संपवितात. सहजगत्या घडलेल्या एका संवादापासून आपण आरंभ करतो आहो, असा लेखकाने कितीही जरी आविर्भाव केला, तरी वाचकांच्या दृष्टीने एक सत्य शिल्लक राहते. ते म्हणजे, काय सांगायचे हे लेखकाने आधी निश्चित केलेले होते; आणि नंतर ते कसे सांगायचे, याची रूपरेखा आखली होती. वाचताना जरी लघुनिबंधाचा आरंभ अप्रस्तुतापासून दिसत असला, व शेवट प्रस्तुतावर होत असला, तरी लेखकाच्या मनात मात्र प्रस्तुत आधीच निश्चित ठरलेले होते. नजरेसमोर प्रस्तुत ठेवून लेखक अनुरूप अप्रस्तुतापासून आरंभ करितो व मग एखादा कुशल खेळाडू समोरच्या गड्यासमोर चेंडू खेळवीत बसतो, त्याप्रमाणे लेखक वाचकाला खेळविण्याचा प्रयत्न करितो, आणि चटकन गोल मारून प्रस्तुत गाठतो. हाच प्रकार जर ललित-निबंध म्हणून येणार असेल, तर मग त्यातली गोडी फार वेळ टिकणे शक्य नव्हते. शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तो ललित निबंध फार वेळ वाङमयीन समाधान देणारा उरू शकत नव्हता. हा वैचारिक निबंधच होता. पण लहान मुलांना गोष्टीरूपाने नीतिबोध करावा, त्याप्रमाणे या लिखाणात आपली मते वाचकांच्या गळी उतरवावी, हा सौदा पटविण्यासाठी कुशल मध्यस्थाप्रमाणे लेखक अघळपघळ गोष्टी सांगत होते. ह्यात क्रीडा असली, आणि कौशल्य असले, तरी ते लेखकाचे होते. वाचकांच्या ख-या भुका यामुळे तृप्त होणे कठीण होते.

 खांडेकरांच्या ललित-निबंधाविषयी हे आणि यासारखे असे कितीही विवेचन मी केले तरी मराठी टीकाकार त्यामुळे रागावण्याचा संभव कमी आहे. कारण खांडेकर वाचकांचे नेहमीच आवडते आणि टीकाकारांचे तितकेच नावडते लेखक राहिले. पण जे खांडेकरांच्या लघुनिबंधाचे रूप आहे, तेच फडके यांच्याही गुजगोष्टीचे रूप आहे. फडक्यांनी कितीही जिव्हाळ्याने सांगण्याचा अभिनय केलेला असो, आणि कितीही रेखीवपणे त्यांनी त्याची मांडणी केली असो, त्या लिखाणाचे मूळ रूप तेच होते. फडक्यांचाही निबंध अप्रस्तुतापासून सुरू होई. तेथून वाचकांना भुलवीत- भुलवित प्रस्तुतापर्यंत फडके प्रवास करीत. शेवटच्या परिच्छेदात प्रस्तुत सांगून ते मोकळे होत. 'माणसाला जे मिळत नाही, ते हवे असते, मग ते