पान:Gangajal cropped.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४ / गंगाजल

ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळी तरी देवळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती असे वाटते. जुना काळ गेला, पण जुने संस्कार मनात रुजून आहेत. इथे पुण्यामध्ये ही नवीन वस्ती बांधणार्‍या लोकांना तमिळ म्हण काही माहीत नसणार, पण म्हणीच्या मागचा संस्कार मात्र त्यांच्या मनावर खासच आहे. "

 ‘आहे तरी काय हा संस्कार? त्याचे रूप काय?" परत प्रश्न आला.

 मी जरा विचारात पडले. माझी विद्वत्ता दाखवायची बरी संधी आली आहे, ह्याचीही जाणीव झाली. मी सांगू लागले :

 "गेल्या वर्षी मी एक जुने पुस्तक वाचीत होते. असेल तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील. संस्कृतामध्ये लिहिलेले. सर्व पुस्तक नगररचना व घराची रचना ह्यांबद्दल असल्यामळे मला नीटसे कळले नाही. पण त्यातल्या काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. नगररचनेसाठी पहिल्यांदा दिशा ठरवून एक चौकोन आखला. त्या चौकोनाच्या बाजूंचे बरोबर आठ भाग करून परत चौसष्ठ चौकोन आतमध्ये आखले व एकेका चौकोनाला एकेका देवतेचे नाव दिले. सर्वात मोठे देऊळ व त्याचे अंगण मध्यभागी होते. त्यानंतर राऊळ म्हणजे राजकुलाची राहण्याची जागा. नंतर राजाच्या सरदारांचे वगैरे मोठे वाडे असलेला रस्ता. नंतर अतिशय धनिक व्यापारी, हिर्‍या-मोत्यांचा व्यापार करणारे वगैरे गोष्टींपासून सुरूवात होऊन भाजीपाला विकणारे, मीठ-मसाला विकणारे अशा प्रकारच्या लोकांची दुकाने, मध्यमवर्गाची दुकाने, शहराच्या चौकोनाबाहेर अस्पृश्यांची घरे आणि त्यांच्यापासून दूर अंतरावर नगररचना करणाच्या स्थपतींची व सुतारांची घरे, असा एकंदर आराखडा दिलेला आहे.

 “नगरामध्ये कुठे काय आहे, हे सांगताना त्या चौकोनातील देवाच्या देवळाचा उल्लेख होई. म्हणजे बरोबर कोठच्या जागेबद्दल वर्णन आहे, हे निश्चित समजे. देवांचा व देवळांचा स्थाननिश्चितीसाठी अशा तर्‍हेने केलेला उपयोग मला नवीनच होता. पण एक गोष्ट लक्षात आली की, देव हे स्थापत्यशास्त्राने निर्माण केलेले नसून, आधीच अस्तित्वात असलेल्या देवांचा स्थाननिश्चितीसाठी ह्या ग्रंथकाराने फार हुषारीने उपयोग करून घेतला. ह्या पुस्तकामध्ये कोणाची घरे कुठे असावी, हे तर दिलेच आहे पण एकेका आळीतील घरांची उंची सारखी असावी, असे देऊन कोठच्या