पान:Gangajal cropped.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ११

सोसवेनासा काही भार शिरी पडला की मला हरी आठवतो. मी एकटी आहे, काहीतरी प्रसंगाला तोंड द्यायचे आहे,काहीतरी सहन करायचे आहे, अशी अवस्था आली की मी देवाकडे धाव घेते. आर्त आणि अर्थार्थी ह्या भक्तांच्या दोन पायऱ्यांपलीकडे मी गेलेच नाही. तेव्हा ‘आता झाली का आठवण?’ ह्याऐवजी खरोखर ‘आता का आठवण झाली?' असा प्रश्न पाहिजे होता.

 दार परत उघडले गेले. बाहेर लोक अजून उभे होते. तो आत माझ्याजवळ आला. “उद्या गेलीस, तर नाही का चालणार?"

 “नाही. बरीच कामं खोळंबली आहेत. मला आजच गेलं पाहिजे."

 ‘‘मी ह्या मंडळींबरोबर जरा शेतावर जाऊन येतो आहे. मला यायला उशीर होईल. मी येईन तो तू गेलेली असशील. जपून जा. फार दमलेली दिसतेस?" त्याने वात्सल्याने माझ्या तोंडावरून हात फिरविला व तो गेला.

 माझ्या मनात आले,भक्ताने विठोबाशी सर्व नाती जोडलेली आहेत. पण त्याला मुलगा किंवा मुलगी केलेले नाही. आईबाप, भाऊ, बहीण सर्व काही तो आहे.मग मुलगा का बरे नाही? एखादी जनी असे का बरे म्हणत नाही?...

 पंढरीचा विठूराया । जसा पोरगा पोटीचा
 मज आधार काठीचा । म्हातारीला
 विठूराया पाठीवरी । हात फिरवी मायेने
 पुसे लेकाच्या परीने । बये फार भागलीस

 ...पण छे! जनी काय, किंवा तुकाराम काय, विठूला मुलगा म्हणणे शक्यच नव्हते. मला वाटते, कोणाही भक्ताने देवाला आपले मूल कल्पिलेले नाही. कारण कुटुंबातल्या सर्व उपमा व त्या नात्यांचे कितीही दृष्टान्त दिले, तरी ज्या दृष्टांन्तात देवाकडे लहानपणा येईल, असे दृष्टान्त नाहीत. जिवलग हे नाते बरोबरीचे, पण त्या नात्यातही देव नेहमीच पुरुष असतो व भक्त बाई वा बुवा कोणीही असो, बाईचीच भूमिका पार पाडतो. वऱ्हाडच्या एका प्रसिद्ध सन्तांनी विठ्ठलाच्या नावे गळ्यात काळी पोत व हातात चुडा भरला होता ‘मधुरा'- भक्ती ह्या नावाखाली जी भक्ती येते, तीत पुरुषभक्त स्वत:ला राधाच समजतात. जी जी नाती कल्पिली आहेत, त्या सर्वात हिंदू रूढीप्रमाणे वरचढ समजली जाणारी नाती विठोबाला जडविली आहेत.बाळकृष्ण पूजेत असतो, पण विठोबाला कोणी लेक म्हणाल्याचे आठवत नाही. कृष्णाला मूल म्हणायचा अधिकार फक्त यशोदेचा, आपल्या पोटचा गोळा मारायला