पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २४० ] चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळें कर्ज बुडण्याचा संभव फार कमी असतो. व्याजाचा दर फार हलका असतो. ज्या व्याजानें पेढीला दुस-याकडून कर्ज मिळतें किंवा जें व्याज त्यांना ठेवीबद्दल द्यावें लागतें त्यामध्यें पेढीच्या व्यवस्थेला लागणा-या खर्चाच्या मानानें थोडीशी वाढ करून व आकारणी करून शेतक-याकडून व्याज घेण्यांत येतें. कारण या पेढ्यांचा इतर पेढ्यांप्रमाणें मोठा नफा मिळविण्याचा हेतु नसतो. तर होतांहोईलतों हलक्या व्याजानें सभासदांना भांडवल मिळवून देणें हा त्यांचा मुख्य हेतु असतो. या सामान्य वर्णनावरून रफेसिनच्या सहकारी पतपेढ्यांची बरीच चांगली कल्पना वाचकांस होईल, अशी आशा आहे. वर सांगितलेंच आहे कीं, अशा त-हेची पहिली पेढी रफेसिननें १८४९ मध्यें स्थापिली. दुसरी १८५४ मध्यें स्थापिली व तिसरी १८६२ मध्यें स्थापिली. याच्यापुढें मात्र त्या पेढ्यांची वाढ फारच झपाट्यानें झाली व या सर्व पेढ्यांची विलक्षण भरभराट झाली, ती इतकी कीं, आपल्याजवळ जमलेल्या भांडवलाचें आतां काय् करावें याची त्यांना पंचाईत पडू लागली. या पेढ्यांच्या भरभराटीनें एकंदर देशांतील व्याजाचा दर कमी झाला व सर्वच शेतकरीवर्गाचें कल्याण झालें. स्काट्सडेलीच यानें कामगारांच्या पेढ्यांकडे लक्ष घातलें. या पेढींत सभासद होण्यास कांहीं एक प्रवेशफी द्यावी लागे व प्रत्येक सभासदानें पेढीचे कांहीं भाग घ्यावे लागत. बाकी नियम दोन्ही तऱ्हेच्या पेढ्यांचे सामान्यतः एकाच असत. स्काट्सडेलीचच्या पेढ्यांत कज फार वेळच्या मुदतीनें दिलें जात नसे. प्रत्येक वेळीं तीन महिन्यांची मुदत असे व विशेष कारणाकरितां ती वाढविली असे: परंतु सामान्यतः शेतक-यांच्या पेढ्यांपेक्षां या पुष्कळ कमी असे. दोन्ही प्रकारच्या पेढ्यांना सरकार पुष्कळ सवलती देत असे. यांना उत्पन्नावरील कर माफ असे; तसेंच स्टँपाची सूट असे व कर्ज वसूल करण्यास विशेष सवलती असत व केव्हां केव्हां सरकार फारच हलक्या व्याजानें अशा पेढ़यांना कर्ज देत असे.