सदस्य:बालाजी मदन इंगळे

Page contents not supported in other languages.
विकिस्रोत कडून
  • कंदुरी*

परहस्ते एकदाच निरोप गेला तरी शंभर टक्के उपस्थिती असणारा खेड्या-पाड्यातील एकमेव कार्यक्रम म्हणजे कंदुरी..! गावात एखादे लग्न उचलून असेल तर आधि सगळ्यांना सन्मानाने पत्रिका दिली जाते. लग्नाला यायचं म्हणून आग्रहाने सांगितले जाते. लग्नादिवशी वरमाई आणि वरबाप्पा सकाळी-सकाळी प्रत्येक घरात लग्नाला चला म्हणून फिरतात. आग्रह करतात. तेव्हा कुठे घरातील एखादा सदस्य यायला तयार होतो. पण कंदुरीचा निरोप दुसर्‍याच माणसाकडून मिळालेला असला तरी ज्यांना निरोप गेला ती सगळी माणसे अगदी वेळेवर उपस्थित राहतात. विशेष म्हणजे अगदी उत्साहाने सहभागी होतात. चार दिवस आधी गावभर चर्चा असते. लग्न आणि इतर कार्यामध्ये लोकांना काम करा म्हणून सांगावे लागते. पण कंदुरीच्या कामात लोक स्वतःहून काम करायला, मदत करायला पुढे येतात. इतर कार्यक्रम आणि कंदुरीमध्ये असा काय फरक आहे की लोक कंदुरीलाच प्राधान्य देतात...? एकच कारण आहे आणि ते म्हणजे मटन आणि मद्य..! रोजच्या आपल्या कष्टमय जीवनात तीच - तीच कामे करून लोक कंटाळलेली असतात. तसेच खेड्या-पाड्यातील मांसाहार करणारी जी माणसे आहेत त्यांना नियमित मांसाहार करायला मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात मटन आणि दारू या गोष्टी एकत्र आणि त्याही फुकट कधीतरीच मिळतात. म्हणून कंदुरीमध्ये लोक उत्साहाने सहभागी होतात. कोणत्यातरी देवीला, लक्ष्मीला किंवा पिराला नवस बोललेला असतो. तो नवस पूर्ण करण्यासाठी मग त्यांच्या नावाने बकरे कापले जातात. गावातील लोकांना, आप्तेष्टांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. याला कंदुरी म्हणतात. ज्या देवीच्या नावाने कंदुरी करायची ती देवी किंवा पिर बाबा हे डोंगरावर किंवा माळावर वसलेले असतात. ज्या घरात कंदुरी आहे त्या घरात आठ दिवसापासूनच कंदुरीची तयारी चालते. सगळ्यात आधी जनावराच्या बाजारातून बकरे आणले जाते. घरातल्या पोरांना मग वेगवेगळा पाला आणून बकर्याला चारण्याचे काम मिळते. आणि अतिशय उत्साहाने ती हे काम करत असतात. मोठी माणसे मसाला, तिखट यांच्या तयारीला लागतात. घरातील स्त्रिया पीठ, ताट-वाटी, तांदूळ यांच्या तयारीला लागतात. कंदुरीचे स्थळ जवळ असेल तर एखादे टमटम केले जाते. दूर असेल तर एखादा टेम्पो सांगितला जातो. निमंत्रण द्यायला घरोघरी जावे लागत नाही. कारण घरी बकरे आणलेले दिसल्यापासून ठराविक माणसे घराकडे या ना त्या निमित्ताने घराकडे चकरा मारत असतात. चलतीवर निरोप दिला तरी भागते. कंदुरीचा दिवस उजाडतो. सकाळी लवकरच टेम्पो घरासमोर येऊन थांबतो. न बोलावताच माणसे पटापट जमा होतात. जळणासहित सगळे साहित्य टेम्पोत चढवले जाते. माणसे टेम्पोत बसतात. पाण्यासाठी घेतलेल्या रिकाम्या घागरी टेम्पोच्या मागच्या फाळक्याला दोरीने बांधल्या जातात. घागरी मागे लोंबकळतात. रस्त्याने जाणारे टमटम किंवा टेम्पोला अशा लोंबकळणार्या घागरी दिसल्या की ती कंदुरीरीची गाडी आहे असे कोणाला सांगावे लागत नाही. गाड्यांना लोंबकळणार्या घागरी या कंदुरीच्या सिम्बाॅल आहेत. बरीच माणसे दुचाकीवर कंदुरीला येतात. कारण वाटेत थांबत थांबत जरा घुटके घेत घेत त्यांना यायचे असते. कंदुरी करणाऱ्याची परिस्थिती जरा चांगली असली की मग तोच घुटक्याची सोय करतो. टेम्पोतच घुटक्याचे बाॅक्स घेतले जातात. गाडी कंदुरीच्या ठिकाणी आली की सगळेजण पटापटा आपापल्या कामाला लागतात. एखादा आचारी सोबत आणलेला असतो. तो तीन दगडाची चूल मांडून चूल पेटवतो. बाया भाकरी करायला बसतात. कोणी कांदा, लिंबू चिरायला घेतात. कोणी पूजेच्या तयारीला लागतात. तिकडे झाडाला उलटे लटकवून बकर्याला सोलण्याचे काम सुरू असते. घुटका घेणारे माणसे आपापले पार्सल घेऊन जवळपासच्या झाडाखाली निवांत बैठक मारतात. उरलेली माणसे, बाया, पोरं झाडाखाली टाकलेल्या चवाळ्यावर बसून जेवण तयार व्हायची वाट बघत बसतात. पूजा वगैरे सर्व होऊन जेवण तयार व्हायला बराच वेळ लागतो. सकाळी निघताना काय खाल्लं न खाल्लं करून माणसे आलेली असतात. जेवणाची वेळ होऊन गेलेली असते.खूप भूक लागलेली असते. मटनाचा फोडणी दिलेला मस्त वास तोंडात पाणी आणतो आणि पोटात आणखीनच खोल खड्डा पाडतो. दूर झाडाखाली बसलेल्यांचे घुटक्याचे पार्सल संपलेले असते. दुचाकीवरून येणारे सर्वजण तोल सांभाळत डोंगर चढून आलेले असतात. सगळ्यांचे लक्ष कंदुरी करणाऱ्या मालकाकडे असते. कधी ' या ' म्हणतील याकडेच सगळ्यांच्या नजरा असतात. देवीला नैवेद्य चढवला जातो. नातेवाईक कंदुरी करणाऱ्याला कपडे करतात. भूक लागून लागून शेवटच्या टप्प्यात येते. मग ' या बसा ' असे म्हटले जाते. मग सगळे जेवणावर तुटून पडतात. खायचे खूप असते. चवही मस्त असते. पण चार चार बोट्याच वाट्याला येतात. त्यात तिखट लागलेले असते. तरी भूक लागल्यामुळे तीन-चार भाकरी सहज जातात. जेवण झाल्यावर अर्धा तास तोंड तिखटाने भगभग करत असते. तरी जेवणाचे समाधान असते. जेवणे संपत आले तरी पट्टीचे पिणारे आणि घुटके घेत बसलेलेच असतात. त्यांना शेवटी ऊठवून जेवू घालावे लागते. कोणाला तर जेवायला जाग्यावरुन उठताच येत नाही. मग त्यांची सोय जाग्यावरच करावी लागते. काहींना जाग्यावर दिले तरी जेवता येत नाही. जाग्यावरच ते झोपी जातात. अजून बायांचे जेवणे व्हायचे असतात. मटन न खाणार्‍याला साध्या आमटीची सोय केलेली असते. पण आमटीवाल्याकडे कोणी लक्ष देत नाही.अजून निघायला वेळ असतो. म्हणून क्षमतेपेक्षा जास्त जेवलेली माणसे झाडाखाली लवंडतात. कंदुरीच्या मटनाला मसाला कमी असला तरी एक वेगळीच पण भारी चव असते. अशी चव घरी किंवा हाॅटेलात येत नाही. म्हणून तर माणसे कंदुरी खायला मरतात. सगळ्यांचे जेवणे झाले आणि ऊन उतरले की कंदुरीची चव जिभेवर घोळवत माणसे गावाकडे परततात.

-  बालाजी मदन इंगळे 
-  9881 823 833.