Jump to content

आत्माराम (समर्थ रामदास कृत)

विकिस्रोत कडून
(आत्माराम पासून पुनर्निर्देशित)

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत

आत्माराम

अर्थ-विवरणासह

"आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥" असे श्रीसद्गुरुनाथ श्रीसमर्थांच्या श्रीमुखातीलच शब्द आहेत. ते ह्या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्त्व दर्शविण्यास पुरेसे आहेत.

समास १ ला

त्यागनिरूपण

या समासात ओवी १-४ श्रीगणेश, ५-६ श्रीशारदा, ७-१० श्रीसद्गुरु, ११-१५ श्रीराम, १६-१७ संत आणि सज्जन श्रोते यांचे नमनपूर्वक मंगलाचरण असून ओवी १८-२४ विषयोपन्यास, ग्रंथ सांगण्याचे कारण दिले आहे. ओवी २५-२९ "तू कोण" ह्या मूलग्राही प्रश्नाने शिष्यास अंतर्मुख करून, "तुझे येथे काहीच नाही" असा निर्वाळा देऊन "मी" पण त्यागाचा उपदेश केला आहे. ओवी ३०-३५ त्यागाचेच जास्त सूक्ष्म विश्लेषण करून, "मला देण्याच्या निमित्ताने नाशिवंत तितके सर्व सोड, तरच स्वहित होणे शक्य" असे सांगून येथे लबाडीचा उपयोग नाही म्हणून स्पष्ट बजाविले आहे. ओवी ३६-३७ शिष्याने स्वामी आज्ञा मान्य केल्याचे पाहून आणि त्यास आश्वासून सद्गुरु अन्यत्र जाण्यास निघाल्याचे वर्णिले आहे. ३८-३९ पुढच्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जयास लटिका आळ आला । जो मायागौरीपासूनि जाला ।
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैचें ? ॥१॥

(कार्यारंभी विघ्नविनाशकाचे स्मरण करण्याचा प्रघात आहे. ग्रंथाच्या उद्देशानुसार येथे निर्गुणगणेशस्वरूपाचेच नमन करून मंगलाचरण केले आहे.) जिचे वेगळे अस्तित्वच मुळी दाखविता येत नाही अशा मायामय गौरीपासून उत्पन्न झाल्याचा ज्याच्यावर मिथ्याच आरोप करतात; परंतु विवेकपूर्ण पहाता जो उत्पन्न होणे शक्य नाही आणि म्हणूनच जो सतत रूपरहित आहे त्याला रूप - नावरूप कोठून बरे असणार? ॥१॥

तेथें स्तवनाचा विचार । न घडे निर्विकारीं विकार ॥
परी तयास नमस्कार । भावबळें माझा ॥२॥

निर्विकार स्वरूपात कसलाच-नावरूपाचाही विकार संभवत नसल्याने अशा या स्वरूपाच्या स्तवननमनाचा विचारच अशक्य; तथापि तन्मयत्वाच्या भावबलाने का होईना त्याला नमस्कार असो. ॥२॥

जयाचेनि वेदशास्त्रेंपुराणें । जयाचेनि नाना निरूपणें ॥
जयाचेनि स्वसुखा लाधणें । शब्दीं निशब्द ॥३॥

ज्या निर्विकार स्वरूपाच्या आधारावरच सगळे चारही वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे नाना निरुपणाच्या योगे आपले हे सुखस्वरूप कसे अनुभवावे हे "शब्दी निःशब्द" अर्थात नाशिवंत शब्दातील अविनाशी भावार्थ तेवढा ग्रहण करण्याच्या मार्गाने सांगतात, त्याला माझे नमन असो. ॥३॥

जें शब्दास आकळेना । जें शब्दावीण सहसा कळेना ॥
कळलें ऎसेंही घडेना । जिये स्वरूपीं ॥४॥

वेदादिकांनाही प्रत्यक्ष शब्दाने ज्याचे यथातथ्य वर्णन करता येत नाही; स्वानुभवी सद्‌गुरुच्या शब्दांशिवाय सहजी जे कळतहि नाही आणि श्रवणानंतरही "हे कळले आहे" असे द्वैतभावाने म्हणता येत नाही असे हे सर्व तऱ्हेने विलक्षण असे स्वरूप आहे; त्याला माझे नमन असो. ॥४॥

ऎसें सदा सर्वत्र संचलें । जे तर्का न वचे अनुमानलें ।।
तें जयेचेनि प्राप्त जालें । आपरूप आपणासी ॥५॥

वर वर्णिलेलें सर्वत्र परिपूर्ण असे आपले नित्य निजस्वरूप की जे बौद्धिक तर्काच्या कसल्याही कसरतीने जाणता येत नाही; ते सद्‌गुरुच्या स्वानुभवाच्या ज्या जाणिवेमुळे आपल्यालाही अकस्मात अनुभवता येते तिला नमन असो. ॥५॥

नमन तिचीया निजपदां । माया वाग्देवी शारदा ॥
जयेचेनि प्रवर्तती संवादा । संत माहानुभाव ॥६॥

त्या माया, सरस्वती, शारदा इ. नावांनी संबोधिल्या जाणाऱ्या जाणिवेच्या निजपदी नमस्कार असो. या जाणिवेने उत्स्फूर्त होऊन साक्षात्कारी श्रेष्ठ संत आत्मस्वरूपाच्या सुखसंवादास प्रवृत्त होतात. ॥६॥

आतां वंदीन सद्‌गुरुस्वामी । जेथे 'राहिले' तोचि मी ॥
आणी निवारलीं निजधामीं । पांचहि जेणें ॥७॥

सर्वही पंचभौतिक सृष्टीचे विवेकाने निवारण करून जे आपल्या निजस्वरूपी सदैव स्थित आहेत आणि जे माझेही स्वस्वरूप असल्याचे ज्यांच्या कृपेने मला आकलन झाले आहे; त्या माझ्या श्रीसद्‌गुरुस्वामींना आता वंदन करतो. ॥७॥

तया निजपदाकडें । आनंदे वृत्ति वावडे ॥
पद लाघलियां जडे । तद्रूप होउनि ॥८॥

श्रीसद्‌गुरुस्वामींच्या कृपेने जाणीव मोहरून, वर वर्णिलेल्या निजस्वरूपाकडे आनंदाने झेपावते आणि अशा सतताभ्यासाने अखेरीस तद्‌रूप होऊन तेथेच स्थिरावते. ॥८॥

स्वामीकृपेचा लोट आला । मज सरोवरी सामावला ॥
पूर्ण जालिया उचंबळला । अनुभव उद्‌गार ॥९॥

(सद्‌गुरुंच्या स्मरणाने सद्‌गदित होऊन श्रीसमर्थ कृतार्थोद्‌गार काढतात की) माझ्या सद्‌गुरुंच्या स्वानुभवकृपामृताचा जो हा अनिवार लोंढा आला तो मी रूपी या सरोवरात पूर्णपणे रिचवला गेला; इतका की ते आता काठोकाठ भरून वाहू लागले आहे. ॥९॥

माझे सद्‌गुरुकृपेचे बळ । मजमाजीं सांठवले तुंबळ ॥
तेणें बळें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥१०॥

माझ्या सद्‌गुरुंच्या कृपामृताच्या बळाने माझे अंतःकरण इतकें तुडुंब भरले आहे की, त्यातील स्वानंदामृत आता तुझ्यासाठी उचंबळू लागले आहे. ॥१०॥

आता नमस्कारीन राम । जो योगियांचे निजधाम ॥
विश्रांती पावे विश्राम । जये ठायीं ॥११॥

जो योग्यांचे-भक्तांचे निजनिरतिशय सच्चिदानंदस्वरूप आहे, जेथे परमसुखदायी स्वरूपानुभवाची विश्रांतीही विराम पावते; अशा श्रीरामरायाला आता मी नमस्कार करतो. ॥११॥

जो नांवरूपावेगळा । जो ये मायेहून निराळा ॥
जेथे जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥१२॥

जे नामरूपातीत आहे, जे मायेहून अलिप्त आहे कारण जेथे या मायेच्या मीपणाच्या जाणिवेचे सामर्थ्यही सर्वथैव विरून जाते असे माझ्या श्रीरामप्रभूचे सत्यस्वरूप आहे. ॥१२॥

जेथे भांबावला तर्क । जेथे पांगुळला विवेक ॥
तेथे शब्दांचे कौतुक । केंवि घडें? ॥१३॥

जेथे मनाचा तर्क कुंठित होतो, जेथे बुद्धीचा विवेकही लंगडा पडतो अशा मनबुद्धीअगोचर श्रीरामस्वरूपाच्या बाबतीत शब्दांच्या नुसत्या कसरतींचे ते काय बरे चालणार?

जयालागी योगी उदास । वनवासी फिरती तापस ॥
नाना साधनी सायास । जयाकारणें करितो ॥१४॥

ज्याच्या प्राप्तीसाठी योगी साधक अनासक्त होऊन निरंजन अशा वनात नाना कष्टकारक साधनादिकांनी युक्त अशी घोर तपश्चर्या करीत फिरतात ॥१४॥

ऎसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ॥
उपमाच नाहीं निरोपम । रूप जयाचें ॥१५॥

असा हा श्रीराम सर्वांचा केवळ आत्माच होय. कार्यदृष्टीने तो सगुण आहे तर आत्मदृष्टीने निर्गुण आणि तद्‌रूपतेने तर तो सगुणनिर्गुणातीत असा परिपूर्ण आहे. त्याचे रूप इतके परिपूर्ण असल्यामुळेच ते उपमेरहित आहे. ॥१५॥

आतां वंदीन संत सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ॥
माझीं वचनें पराकृतें । सांगेन तयापासीं ॥१६॥

आता मी कृपाळू संतांना आणि अंतःकरणातील भावाचे आकलन करणाऱ्या सज्जन श्रोत्यांना वंदन करतो. त्यांना ही माझी मराठी भाषेतील उत्स्फूर्त वचने मी सांगेन म्हणतो.

तयांचे वर्णावे स्वरूप । तरी ते स्वरूपाचेचि बाप ॥
जें वेदांसी सांगवेना रूप । ते जयांचेनि प्रगटें ॥१७॥

वेदवाणीही जेथे तोकडी पडते त्या स्वस्वरूपाच्या तत्त्वज्ञानाला ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांच्या कृपेनेच केवळ ते अनुभविता येणे शक्य होते त्या संतांचे वर्णन कोठवर करावे बरे. ॥१७॥

आतां शिष्या सावधान । ऎक सांगतो गुह्यज्ञान ॥
जेणें तुझे समाधान । आंगी बाणे ॥१८॥

शिष्या ! आतां सावध हो. गुह्यज्ञान गुह्यज्ञान म्हणून ज्याला म्हणतात ते आता सांगतो, दक्षतेने ऎक. यामुळे तुझ्या ठायी पूर्ण समाधान बाणेल. ॥१८॥

तुवां आशंका नाहीं घेतली । परंतु मज तुझी चिंता लागली ॥
कां जें तुझी भ्रांति फिटली । नाहींच अद्यापि ॥१९॥

तू शंका विचारली नाहीस हे खरे; परंतु मला तुझी चिंता लागली आहे. कारण स्वरूपज्ञानाविषयींची तुझी खोटी समजूत अजून समूळ निवारली गेल्याचे दिसत नाही. ॥१९॥

दासबोधींचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ॥
तया निरूपणेहि वृत्तीसी । पालट दिसेना ॥२०॥

'दासबोधाच्या' (एकवीस समासींच्या) तेराव्या समासात मीपण कसे निराधार आहे - हा तुझ्या कल्पनेचा खेळच तुला कसा नडतो आहे हे स्पष्टपणे सांगितले. तरीहि अद्यापि तुझ्या ह्या मीपणाच्या भावनेत बदल झालेला दिसून येत नाही आहे. ॥२०॥

म्हणोनि न पुसतां सांगणें । घडलें शिष्या तुजकारणें ॥
आतां तरी सोय धरणें । श्रवणमननाची ॥२१॥

म्हणून, विचारल्याशिवाय न सांगण्याचा शिष्ठदंडक (नापृष्ठस्य वक्तव्यम्) बाजूस सारून हे शिष्या ! तुझ्या हितासाठी हे सांगणे घडत आहे. बाळा ! आता तरी श्रवणमननाची कास धर बरे. ॥२१॥

चातकपक्षी वरीचा वरी । चंचु पसरून थेंबुटा धरी ॥
जीवन सकळही अव्हेरी । भूमंडळीचें ॥२२॥

पृथ्वीवरील जलाचा अव्हेर करून, ज्या आर्ततेने चोच पसरून चातकपक्षी पावसाचा सूक्ष्म थेंबही वाया न दवडिता वरच्या वर आत्मसात करतो ॥२२॥

तैसा शब्दवरुषाव होतां । असों नेदावी वेग्रता ॥
श्रवणपुटीं सामावितां । मनन करावें ॥२३॥

तशाच आर्ततेने एकही शब्द फुकट न दवडितां, सद्‌गुरूमुखांतून होणाऱ्या शब्दवर्षावाचें श्रवण करावें; इतर विषयांचे चिंतन त्या वेळी बिलकुल असू नये. इतकेच नव्हे तर मननाद्वारे त्यातील अर्थही आत्मसात करीत जावा. ॥२३॥

लागवेग जाणोन शब्दाचा । आवांका पाहावा मनाचा ॥
शब्दाआंतील गर्भाचा । सांटावा घ्यावा ॥२४॥

(हे मनन कसे करावे) सद्‌गुरुंच्या प्रत्येक शब्दाचा निरूपण विषयांशी संबंध काय, तो उच्चारतांना त्यांच्या मनांत हेतु कोणता आहे हे जाणून तो शब्द जो भाव दर्शवितो तो आत्मसात करावा. ॥२४॥

अरे तूं कोण कोणाचा । कोठून आलासी कैंचा ॥
ऎसा विचार पूर्वीचा ।घेई बापा ॥२५॥

बाळा ! तू आहेस कोण? कोणाचा आहेस? येथे आलास कोठून? कसा आलास? इ. प्रश्नांचा पूर्वीच सांगितलेला विचार आता तरी नीट करू बघू ! (जुन्या दासबोधात - २१ समासीत सांगितलेला. ओवी २०) ॥२५॥

अरे तां जन्मांतर घेतलें । काय मानितोसि आपुलें ॥
ऎसें तुवां विचारिलें । पाहिजे आतां ॥२६॥

'हे माझे' असे मानतोस तर अशी तुझी कितीतरी जन्म जन्मांतरे झाली आहेत. पूर्वीच्या जन्मांतील संबंध जर आता काही राहिला नाही तर या जन्मातलाही कितीसा बरे टिकणार आहे? अशा तऱ्हेचा विचार आता तू केला पाहिजेस. ॥२६॥

येथे तुझे कांहींच नाहीं । भुलला आहेस काई ॥
चुकोनी आलासी, जाई । जेथीचा तेथें ॥२७॥

अशा विचारानें तुला पटेल की येथे 'केवळ तुझेच' असे म्हणता येणारे काहीही नाही; तर मग याच्या मोहात विनाकारण का बरे गुंतला आहेस? आसक्तीच्या या चुकींमुळेच तू येथे आला आहेस. आता ही आसक्ती सोडून आपल्या मूळ ठिकाणी जा कसा ! ॥२७॥

तूं समर्थाचें लेकरूं । अभिमानानें घेतला संसारु ॥
अभिमान टाकितां, पैलपारु । पावशील बापा ॥२८॥

बाबारे ! परमेश्वरापासून तुझी उत्पत्ती असल्याने तूहिं तद्‌रूपच आहेस. परंतु हे विसरून जीवत्वाचा अभिमान घेतल्याने तू ह्या जन्ममृत्युरूपी भवसागरात अडकला आहेस. म्हणून हा अभिमान सोडताच तू याच्या पैलतीराला सहजींच पावशील; अर्थात मुक्त होशील बरे. ॥२८॥

ईश्वरापासून जालासि । परी तूं तयासी चुकलासी ॥
म्हणोनी हे दुःख भोगिसी । वेगळेपणें उत्कट ॥२९॥

ईश्वरापासून - त्याच्यामुळेच तर तुझी उत्पत्ती ! परंतु त्या आदिकारणाला तू विसरलास आणि 'मी जीव' म्हणून वेगळेपणा धरून बसल्याने हे या संसाराचे तीव्र दुःख तू भोगतो आहेस. ॥२९॥

त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥३०॥

मी-माझे ह्या अभिमानजनित सर्व लौकिक वैभवाचा त्याग करून, जर माझ्या शब्दांवर अंतःकरणपूर्वक विश्वास ठेवशील तर तुला मी जेथेल्या तेथे पोहोचते करीन; अर्थात स्वस्वरूपी मिळवीन. (येथे 'विश्वासणें' याचा भाव तेह सत्य मानून आचरणात आणणे असा आहे.) ॥३०॥

तुझे अढळपद गेलें । तुज मायेनें वेढां लाविलें ॥
तें जरी तुझें तुज दिधलें । तरी मज काय देसी ? ॥३१॥

तुला स्वस्वरूपाचे विस्मरण झाले असून, 'मी-माझे' या मायेत तू गुरफटला गेला आहेस. त्यामुळे आता तुला अप्राप्य वाटणारे तुझे ते मूळस्वरूप जर पुन्हा तुला मिळवून दिले तर तू मला काय देशील बरे? ॥३१॥

जितुकें काही नासोन जाईल । जें अशाश्वत असेल ॥
तुजसमागमें न येईल । तितुकेंच द्यावें मज ॥३२॥

ज्याचे रूपान्तर होत असेल, जे अस्थिर असेल, जे शाश्वत राहाणारे नसेल, मृत्युसमयी जे तुजबरोबर येणारे नसेल, तितकेच फक्त तू मला देऊन टाक. ॥३२॥

मजहि तें कायें करावें । परी तुजपासून टाकवावें ॥
तुंवां टाकिलें तरी न्यावें । तुज समागमें ॥३३॥

मला तरी तसले ते घेऊन काय करायचे आहे? केवळ तुझ्यापासून ते सुटावे हीच माझी इच्छा! म्हणून जर तू त्याचा त्याग केलास तर तुला मजबरोबर स्वरूपी न्यावे, स्थित करावे असे म्हणतो. ॥३३॥

अरे भूषण भिक्षेचें सांडिले । आणि राजपद प्राप्त जालें ॥
तरी तुझें काये गेलें । सांग बापा ॥३४॥

हे बघ ! भिकेवर जगणारे जीवन सुटून जर तुला अकस्मात राज्यपदच प्राप्त होत असेल तर त्यात तुझे काय नुकसान आहे बरें ? ॥३४॥

नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेसीं ॥
त्यामध्यें लालुच करीसी । तरी स्वहित न घडे ॥३५॥

म्हणून हे बघ ! जेवढे काही नाशिवंत असेल तेवढे सगळे मला देऊन टाक म्हणजे निसंदेह तुझे स्वरूप तुला प्राप्त होईल. मात्र त्यात यत्किंचितही लबाडी केलीस अर्थात या नाशिवंताबाबत जराही आसक्ती ठेवलीस तर तुझाच तोटा होईल; स्वरूप प्राप्ति होणार नाही हे पक्के लक्षात असू दे. ॥३५॥

तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ॥
आतां तूं आपुलें । कांहीं मानूं नको ॥३६॥

तेव्हा शिष्य म्हणाला की, 'महाराज ! आपण मागता ते नाशिवंत सर्वही दिले' त्यावर सद्‌गुरु म्हणतात की, 'तर मग तुला आत्मपद लाभले. यापुढे मी-माझे असे तू काहीही मानू नकोस. ॥३६॥

इतुकें स्वामी बोलिले । आज्ञा घेऊन निघाले ॥
तंव शिष्यें विनविलें । विनीत हो‌उनी ॥३७॥

वरीलप्रमाणे आश्वासून, सद्‌गुरु, "बरे तर आता आम्ही येतो" असे म्हणून जाण्यास निघाले तेव्हा शिष्याने नम्रतापूर्वक शरण जाऊन विनंती केली. ॥३७॥

आतां पुढिलीये समासीं । संवाद होईल उभयतांसी ॥
तेणें स्वानंदसिंधुसि । भरितें दाटें बळें ॥३८॥

आता गुरुशिष्यांचा जो सुखसंवाद होईल तो पुढच्या समासात सांगू. त्याच्या श्रवणाने स्वानंदाचा महासागर उचंबळून गर्जू लागेल. ॥३८॥

इतिश्री आत्माराम । रामदासी पूर्णकाम ॥
ऎका सावध, वर्म । सांगिजेल ॥३९॥

याप्रमाणे रामदासांना-मुमुक्षूंना पूर्णकाम करणारा अर्थात स्वरूप साक्षात्कार घडविणारा जो हा आत्माराम ग्रंथ त्यातील पहिला समास सांगून झाला. या साक्षात्काराचे वर्म आता पुढल्या समासात सांगण्यात येईल ते दक्षतेने ऎका. ॥३९॥

समास २ रा

मायानिरूपण

या समासात ओवी १-४ पूर्वसमासातल्या (१।३७) ओवींशी संबंधित शिष्यविनंती, ५-९ सद्‌गुरूंचे उत्तर असा सुखसंवाद असून, १०-१२ मायेचे प्रमुख लक्षण सांगून, १३-२० त्याचा विस्तार केला आहे. ओवी २१-२५ माया ही स्वतंत्र की परतंत्र याबाबत शिष्याची शंका आणि त्याच्या ज्ञातेपणाच्या प्रज्ञावादाची निर्भत्सना आहे. त्यामुळे शिष्यास संभ्रम निर्माण होऊन तो ओवी २६ मध्ये स्पष्ट खुलासा करण्याची विनंती करतो. ओवी २७-२९ त्याच्या शंकेचे पूर्ण निरसन, ३०-३८ मायेच्या कल्याणकारक बाजूंचे वर्णन, ३९-४१ सावधतेचा इशारा असून ओवी ४२-४३ मध्ये पुढच्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जय जय जी सच्चिदानंदा । जय जय जय जी आनंदकंदा ॥
जय जय जी निजबोधा । परमपुरुषा ॥१॥

(पहिल्या समासातील ३७ व्या ओवीप्रमाणे शिष्य विनवीत असून तो प्रार्थना करतो की,)

हे सच्चिदानंदा ! हे आनंदकंदा ! हे निजबोधा परमपुरुषा सद्‌गुरुनाथा ! आपला त्रिवार जयजयकार असो. ॥१॥

(श्रीगुरु तर जाण्यास निघाले आणि आपले समाधान तर झालेले नाही म्हणून त्यांनी थांबून आपल्याला सर्व पटवून द्यावे अन्यथा आपले कल्याण होणे अशक्य आहे ह्या जाणिवेने अत्यंत श्रद्धापूर्वक कळकळीने तो प्रार्थना करीत आहे. )

अनंत ब्रह्मांडाऎसी ढिसाळें । मायेनें रचिलीं विशाळें ॥
तें तुमचे कृपेचेनि बळें । विरतीं स्वानंदडोहीं ॥२॥

मायानिर्मित जी ही विशाल अनंत ब्रह्मांडे आहेत ती, हे सद्‌गुरुनाथ ! तुमच्या कृपाकटाक्षबळाने, स्वानंदाच्या डोहात जणू एखादे ठिसूळ मातीचे ढेकूळ पाण्यात विरावे त्याप्रमाणे विरून जातात, नामशेष होतात. मायेचे हे सर्व मोहकारक जाळे तुमच्या कृपेने क्षणार्धात नाहीसे होते. ॥२॥

आतां स्वामीनें जें कांहीं इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारलें ॥
शरणागत आपुलें । समर्थें उपेक्षूं नये ॥३॥

आपण माझ्याकडून ज्या काही त्यागाची अपेक्षा केली आहे तो कृपा करून पूर्ण करवून घेतली पाहिजे. महाराज ! मी आपणास शरण आलो आहे. आपण समर्थ आहात, माझी उपेक्षा करू नका हो !

नाशिवंत कायें म्यां टाकावें । तें मज स्वामीनें सांगावें ।
मज दातारें करावें । आपणाऎसें ॥४॥

जे नाशिवंत ते मी टाकावयाचे म्हणजे मी प्रत्यक्ष काय केले पाहिजे हे आपणच मला कृपापूर्वक समजावून द्यावे. आपल्या अलौकिक दातृत्वाने महाराज ! आपण मला आपल्या सारखेच सुखी करावे. ॥४॥

ऎकोन शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें ॥
अवधान देऊन घेणें । आनंदपद ॥५॥

अशी ही तळमळीची शिष्यविनंती ऎकून, सह्रदयतेने सद्‌गुरु म्हणतात, "बाळा ! सावध हो. माझ्यासारखे जर तुला व्हावयाचे असेल तर आता मी जे सांगतो त्याकडे अंतःकरणापासून लक्ष देऊन तू आपले स्वानंदपद ओळखून घे." ॥५॥

शिष्या बहू मन घाली । आतां बाष्कळता राहिली ॥
येथें वृत्ति चंचल केली । तरी बुडसी संदेहसागरीं ॥६॥

बाळा ! आता उच्छृंखलता सोडून, एकाग्र मनाने माझ्या बोलण्याकडेच पूर्ण लक्ष दे. या निरूपणाचे महत्त्व ओळख. या वेळी जर तू मन इतरत्र भटकू दिलेस तर मात्र तुझे निसंदेह समाधान होणार नाही आणि त्यामुळे शंकाकुशंकारूपी मोहसागरात बुडून तुझा नाश होईल. ॥६॥

अग्निसंगें लोहो पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ॥
मग परिसेसीं झगटतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥७॥

अग्नीमध्ये तापवून लाल झालेल्या कच्च्या लोखंडाच्या गोळ्याला घणाने ठोकले असता त्याचे मलिनत्व (गंज) नाहिसे होते; इतके की नंतर परिसाच्या नुसत्या स्पर्शानेही त्याचे लोखंडत्व समूळ जाऊन त्याचे सुवर्णात रूपांतर होते. ॥७॥

तयाचा मळ झडेना । आणि अभ्यांतर कळेना ॥
तरीं तें सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥८॥

वरीलप्रमाणे जर त्या गोळ्याचा मळ झडून गेला नाही तर त्याच्या आतले शुद्धत्वही स्पष्ट होणार नाही. अशा स्थितीत परिसाच्या स्पर्शानेही त्याचे लोखंडपण जाणार नाही. पूर्ववत्‌ तो गोळा मृत्तिकास्वरूप मलिनच राहणार. ॥८॥

म्हण‌उन नाशिवंत तितुका मळ । तुंवां तजावा अमंगळ ॥
तो गेलियां तूंच 'केवळ' । आहेस बापा ॥९॥

म्हणून सांगतो की बाळा । जितके काही नाशिवंत तितके सर्वच मलिन व मलिनत्व हे केव्हाहि अमंगलच, असे नीट उमजून तू त्याचा त्याग कर. हे सर्व मलिनत्व गेल्यावर जे उरेल तेच तुझे सत्य परब्रह्मस्वरूप होय बरे. ॥९॥

तरी नाशिवंत ते तूं जाण माया । माईक जाये विलया ॥
ते मायेचा विचार प्राणसखया । ऎक सांगतों ॥१०॥

वर जे नाशिवंत वा मलिन म्हणून सांगितले तीच माया होय. जे मायिक ते नष्ट होणारच. प्राणसख्या बाळा ! घाबरू नकोस. या मायेचा विचार तुला नीट समजेलसा सांगतो, ऎक. ॥१०॥

'अहं' ऎसे जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ॥
तये मायेपासून त्रिगुण । गुणापासून भूतें ॥११॥

'मी आहे' असे जे पहिले अस्पष्ट भान तेच मायेचे खरे रूप होय. हीच मूळमाया होय. हीच पुढे स्पष्ट होऊन सत्त्व, रज, तम अशी त्रिगुणात्मक महामाया झाली. तमोगुणापासून आकाशादि पंचमहाभूते क्रमाने निर्माण होऊन हीच माया अशाप्रकारे (३+५=८) अष्टधा प्रकृतिरूपाने विस्तार पावली आहे. ॥११॥

पृथ्वी आप तेज वायो आकाश । सृष्टी रचिली सावकास ॥
येथें दृश्य आणि अदृश्य । सकळ माया ॥१२॥

आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांपासून यथावकाश ही सारी सृष्टी उत्पन्न झाली; अर्थात ती पंचभौतिकच आहे. म्हणून यच्चावत्‌ सर्व दृश्य (पंचभौतिक) सृष्टि व अदृश्य (गुणमयी) सृष्टि ही त्या मूळमायेपासून असल्यामुळे मायामयच - नाशिवंत होय. ॥१२॥

येक माया दों ठायीं वाटली । प्रकृतीं आणि पुरुष जाली ॥
जैसी दों दिसांची बोली । येकचि परवा ॥१३॥

मुळात माया ही एकच; परंतु तीच अष्टधाप्रकृतिरूपाने व तिला अधिष्ठान अशा अहं संकल्पमय पुरुषरूपाने अर्थात शक्ती व शक्तिमान या दोन व्यावहारिक रूपात जणू विभागली गेली आहे. जसा 'परवा' या शब्दाने ऒळखिला जाणारा दिवस असतो एकच, परंतु भासतो मात्र दोन दिवसांची बेरीज म्हणून. ॥१३॥

माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान । माया ध्याता ध्येय ध्यान ॥
माया हेंचि समाधान । योगियाचें ॥१४॥

(मायेची व्यावहारिक रूपे दोनच काय पण तीन अथवा अधिकही असू शकतात हे येथे स्पष्ट करतात.) ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अथवा ध्याता, ध्येय, ध्यान इ. त्रिपुटीला प्रथम 'अहं' पणाची मूळ जाणीवच कारण असल्याने हा सर्व मायेचाच विस्तार होय. तद्वतच कर्मयोग्याचे कर्मतृप्तीचे समाधान हेहि अनेकविध अशा मायेचेच रूप होय. ॥१४॥

माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ॥
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥१५॥

तसेच ज्ञानयोग्याची 'सच्चिदानंद, आनंदाचा गाभा, निजबोध' इ. शब्दानीं ओळखिली जाणारी स्थिती ही ही जाणीवमयच असल्याने मायेचेच एक रूप होय. ॥१५॥

आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥
रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥

इतकेंच काय; परंतु नामरूपातीत अशी आत्मा अथवा ब्रह्म अथवा स्वरूप अशा शब्दांनी लक्षित केली जाणारी, एकमेवाद्वितीय अवस्था हीहि स्वसंवेद्य अशा त्या जाणिवेनें युक्त - अत्यंत सूक्ष्मतेने का होईना असल्याने मायासमच होय. अरूप असे म्हणने रूप सापेक्षच असल्याने रूप अथवा अरूप, द्वैत अथवा अद्वैत असे म्हणणे हा सर्व मायेचाच विस्तार होय. ॥१६॥

जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचाचि विस्तार ॥
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥१७॥

आता उपाधीच्या दॄष्टीने भिन्न समजल्या जाणाऱ्या जीव, शिव अथवा ईश्वर ह्या स्थितीही जाणिवेच्याच न्यूनाधिकतेवर अवलंबून असल्याने, त्या सर्व त्या मायेचाच विस्तार होय. तात्पर्य या सर्व विश्वाचे भान करून देणारी दृश्य विश्वरूप आणि त्याचे भरणपोषण करणारी अदृश्य विश्वंभर शक्ती ही केवळ मायाच होय. ॥१७॥

माया मनास चाळक । माया बुधीस व्यापक ॥
माया येकीं अनेक । ऎसें बोलणें ॥१८॥

मनास संकल्प-विकल्परूपाने चंचल करणारी, बुद्धीस व्यापून निश्चय करणारी ही मायाच होय. केवळ एकमेवाद्वितीय अशा परब्रह्मस्वरूपात असे हे अनेकत्वांचे खेळ दाखविणारी ही मायाच होय. म्हणूनच हा सर्व खेळ मिथ्या होय असे संतांचे सांगणे आहे. ॥१८॥

माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ॥
माया दृश्यास दाखवी । नेत्रीं रिघोनियां ॥१९॥

ही ईशशक्ती माया, ही जाणीव तद्‌रूप अशा देहाची हालचाल करविते, वाणीने शब्द बोलविते, नेत्रांवाटे दृश्य दाखविते. तात्पर्य, सर्व इंद्रियांना तत्तद्विषयी प्रेरिते. (हा देह मायानिर्मित असल्याने त्याला तद्‌रूप म्हटले आहे.)

मायेनेंचि माया चाले । मायेनेंचि माया बोले ॥
मायेनेंचि माया हाले । वायोरूपें ॥२०॥

आता जास्त काय सांगावे बरे ! चालणे, बोलणे, हालणे इ. सर्व देहव्यापार होतात ते तिच्याच प्रेरणेने आणि ज्याकरवी होतात तो देहही मायानिर्मितच. तात्पर्य मायाच मायेकरवी हे सर्व काही करविते. वायूचे वाहणे हे जसे वायूमुळेच शक्य होते व त्याच्यामुळेच कळते; तद्वत माया(१) आपल्या मायेने(२) ही सर्व माया(३) करते. ॥२०॥ (१ - मूळ जाणीव, २ - शक्तीने, ३ - हे सर्व कार्य)

तों शिष्य म्हणे जी ताता । माया चाले स्वरूपसत्ता ॥
अरे ! सत्ता तेचि तत्त्वतां । माया जाण ॥२१॥

सावध असलेला शिष्य योग्य समयीं दक्षतेनें त्वरित आक्षेप घेतो की, "महाराज ! आपण म्हणता की, मायेला मायेचाच आधार; परंतु शास्त्रात तर मायेला स्वरूप सत्तेचा आधार सांगितला आहे, हे कसे?" त्यावर सद्‌गुरु स्पष्ट करतात की, "अरे बाबा ! सत्ता म्हणजे काय ते सांग पाहू. सत्ता म्हणजे "आहे" पण, हीहि एक शक्तीच की नाही? हे तरी कळले कशामुळे मायेमुळेच ना? म्हणून वर (ओवी ११) सांगितल्याप्रमाणे आहेपणाची जाणीव - ही स्वरूप सत्ता - ही मायाच होय." ॥२१॥

तरी मायेने स्व‌इछ्या (स्व‌इच्छा) असावें । आणि स्वरूपसत्तेनें नसावें ॥
मनास आलें तैसें करावें । हें केंवि घडे? ॥२२॥

वरील खुलासा नीट समजला नसल्याने शिष्य परत म्हणतो की, "महाराज ! तर मग याचा अर्थ माया स्वेच्छेने वागते असा होतो. स्वरूपसत्तेच्या आधाराने माया नसून ती स्वतंत्र ठरते आणि तिनें वाटेल तो धुडगुस घालावा असे आपल्या बोलण्याने ठरू पाहाते. हा अनवस्थप्रसंग कसा शक्य आहे बरे?" ॥२२॥

खऱ्यावरी लटिकें चौताळलें । लटिकें मर्यादेनें राहिलें ॥
ते तुंवां गर्भांधाने देखिलें । हें अघटित वार्ता ॥२३॥

शिष्याचें शब्द पांडित्य खोडून काढण्यासाठी सद्‌गुरु उपरोधाने म्हणतात की, "वाहवा ! बरा ज्ञातेपणा दाखविलास बाबा ! सत्यस्वरूपावर मूलतःच मिथ्या असणाऱ्या मायेने म्हणे आवरण घातले ! अथवा ती मर्यादेत वागू लागली ! आणि हा खेळ पाहिला कोणी? तर गर्भापासून स्वरूपज्ञान नसलेल्या तू गर्भान्धाने ! खरोखर ही बातमी विलक्षणच होय !! ॥२३॥ (लटिकें = मूलतः मिथ्या, खोटे; अघटित = न घडणारे, विलक्षण)

तैसी माया हें नाथिलि । आणि स्वरूपसत्तेनें चालिली ॥
ते तुंवां गर्भांधाने देखिली । हे वार्ता सांगसी ॥२४॥

तुला माया म्हणजे काय तेच अजून कळले नाही आणि मारे प्रज्ञावादाच्या गप्पा मारतोस की माया ही मुळीच मिथ्या असल्याने स्वतंत्र नव्हे. ती स्वरूप सत्तेच्या आधाराने चालते. आता या तुझ्या गर्भान्धाच्या देखणेपणाला म्हणावे तरी काय बाबा !! ॥२४॥

जें जालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ॥
ऎसे हे ज्ञातेपणे बोलतां । तुज लाज नाहीं ॥२५॥

जी माया (या मा सा माया) कधी वेगळेपणाने झालीच नाही, पृथकत्वाने ती कधी (शक्तिशक्तिमतेरभेदः) असणेच शक्य नाही; तिच्यावर म्हणे दुसऱ्याची सत्ता आहे आणि ती ही कोणाची तर म्हणे निर्विकार निर्गुण परब्रह्माची !! जी नाही ती आहे असे म्हणतोस आणि जे निर्विकार तेथे सत्तेचा विकार प्रतिपादन करतोस ! ह्या तुझ्या ज्ञातेपणाची तुला लाज कशी वाटत नाही रे? ॥२५॥

सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥
तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥

या भडिमाराने गोंधळलेला शिष्य अगतिक होऊन विचारतो की, "गुरुराजा ! सर्व काही मायाच होय असे आपणच मागे (ओवी १६-१७) सांगितलेत आणि आता तर म्हणता आहात की ती झालीच नाही ! महाराज, मला हे कोडे काही उमगत नाही. मी समजावे तरी काय ते कृपा करून स्पष्टपणे सांगा. ॥२६॥

अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥
तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥

अरे बाबा ! जे जे मनाला कळते, अनुभविता येते ते ते सर्वही मायिक - मिथ्या असे समजून तुझ्याच अनुभवाने मनाला समजणारे सर्व काही तू सोडले पाहिजेस. ॥२७॥

सकळहि माया परी नाथिलि । स्वरूपीं तों नाही राहिली ॥
येवं आहे नाही हे बोली । माया जाण ॥२८॥

मनाला भासणारे सर्व काही मायाच होय; परंतु स्वस्वरूपी जेथे मनच उरत नाही तेथे ही माया राहाणार कशी बरें? म्हणून ती मिथ्या होय. तात्पर्य माया आहे व माया नाही या दोन्ही कल्पना मायेमुळेच शक्य असल्याने त्या मायामयच होत. (अनिर्वचनीय माया) ॥२८॥

येवं सांगतो तें ऎकावें । माईक मायेतें जाणावें ॥
आतां मनन करावें । सावध होऊनी ॥२९॥

म्हणून मी सांगतो ते नीट ऎकून समजून घे. माया ही मायिक आहे म्हणजे पाहिले तर दिसणारी, न पाहिले तर नसणारी, एवंच अनिर्वचनीय आहे हे आता स्पष्ट झाले, तुझा आक्षेप (ओवी २१) संपला, आता आपण परत मुख्य निरूपणाकडे वळू या. नीट सावधतेनें मनन कर हं ! ॥२९॥

मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माया नासे ॥
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरुपाचा ॥३०॥

(२०व्या ओवीतला ओघ परत सुरु झाला आहे) मायेमुळे म्हणजे मीपणाच्या जाणिवेमुळे माया अर्थात ही सर्व दृश्यादृश्य सृष्टी दिसते. ही जाणीव नसता म्हणजे मायेमुळेच ती नष्ट होते. परमसुखमय अशा स्वस्वरूपाची प्राप्ति जी आता व्हावयाची तीही या जाणिवेच्या अभावानेंच अर्थात मायेमुळेच एरवी ते तर नित्यप्राप्तच आहे. ॥३०॥

माया भवसिंधूचें तारूं । माया पाववी पैलतारू ॥
मायेवीण उद्धारुं । प्राणीयास नाहीं ॥३१॥

या भवसागरात तरून जाऊन त्याच्या पैलतीराला पोहोचण्यासाठी अर्थात मुक्त होण्यासाठी ही माया (आपल्या ब्रह्मत्वाची जाणीव) जणु एक नावच होय. या मायेवाचून प्राणीमात्रांचा उद्धार होणे शक्यच नाही. माया केवळ बंधनात्मकच आहे असे नव्हे तर या दृष्टिकोनातून ती उपकारकही ठरते. ॥३१॥ (तारूं = नाव, होडी)

मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ॥
मायेकरितां जीवनमुक्त । होती स्वानुभवें ॥३२॥

या मूळ जाणिवेमुळेच सर्व निर्मिती असल्याने देवभक्तांचा प्रेमसोहळा, ज्ञानी व त्यांची विरक्तता इ. सर्व विविधतः तिच्यामुळेच संभवते. मायेमुळेच अनुभव येणे शक्य होत असल्याने मीपणविरहित स्वरूपानुभवाने विलसणारे जीवन्मुक्तहि मायेमुळेच होत असते असे म्हणावे लागते. ॥३२॥

मायेकरितां वेदश्रुति । मायेकरितां नाना वित्पत्ति ॥
मायेकरिता होती । मूढ ते विवेकी ॥३३॥

द्रष्ट्या ऋषींना वेदश्रुतीचें ज्ञान मायेमुळेच - या जाणिवेमुळेच - उत्स्फूर्त झाले. तिच्यामुळेच नानातऱ्हेची शास्त्रव्युत्पत्ति पंडितांना होऊ शकते. जडबुद्धीच्याहि लोकांना या मायेच्या कृपेनेच आत्मानात्मविवेक शक्य होतो. ॥३३॥ (वित्पत्ति = व्युत्पत्ति, पारंगतता)

माया परमार्थाचे अंजन । मायेकरितां जोडे निधान ॥
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥३४॥

या मायारूपी अंजनाने परमार्थ दिसू लागतो, त्याचे आकलन होते. स्वस्वरूपाचा अमूल्य गुप्त ठेवा मायेमुळेच गवसणे शक्य होते. कारण तिला भिऊन परंतु तिच्याच आधाराने साधक स्वरूपसुखाच्या प्राप्तीविषयी साक्षेपी, दक्ष होतो. ॥३४॥ (निधान - गुप्त ठेवा, अंजन = एरवी जे न दिसणारे ते दाखविणारे औषध)

मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ॥
मायेकरितां विघडे । प्रपंचभान ॥३५॥

'मी जीव' ही विपरीत भावना मूळ जाणिवेने नष्ट होऊन, प्रपंचाविषयीच्या आस्तिक्यबुद्धीची अर्थात 'मी माझे' या आसक्तीची घडी विस्कटते, नष्ट होते. या प्रमाणे सर्व बंध निर्मूल होत असल्याने मायेमुळेच स्वहित साधते हे आता स्पष्ट झाले. ॥३५॥ (भ्रांति = एक असून दुसरेच आहेसे वाटणे)

मायेवीण ज्ञान कैचें । माया जीवन सकळ जीवांचे ॥
मायेवीण साधकांचें । कार्य न चलें ॥३६॥

जाणिवेच्या अभावी ज्ञान कोठले? प्राणिमात्रांचा सर्व व्यवहार जाणिवेवरच आधारलेला असल्याने तेच जगण्याचे खरे साधन होय. तद्वतच साधकाचे ध्येयसिद्धिचे कार्य सिद्ध करण्याचे कर्मही या जाणिवेशिवाय होणार नाही. ॥३६॥ (जीवन = जगण्याचे साधन)

मायेवीण परमार्थ जोडे । हें ऎसें कईच न घडे ॥
मायेवीण सहसा नातुडे । गुज योगियांचे ॥३७॥

माया - जाणीव नसती तर परमार्थ प्राप्ति होणे कधीहि शक्य झाले नसते. योगी - स्वानुभवी यांच्या अंतःकरणातील निज तृप्तीचा शब्दाने पूर्णतया प्रगट करता न येणारा, गुह्य भावहि माया नसती तर मुमुक्षूंना कधीहि लाभला नसता. ॥३७॥

माया योगियांची माउली । जेथील तेथें नेऊन घाली ॥
कृपाळूपणें नाथिलि । आपण होये ॥३८॥

हिचा उपकार किती म्हणून सांगावा बरे ! ऎक्यतेचा योग साधु इच्छिणाऱ्या आम्हा योगियांची ही केवळ माउलीच होय ! हिच्याच कृपेने स्वरूपप्राप्ति शक्य होते. ही नष्ट झाल्यावाचून स्वरूप प्राप्ति नाही आणि हिला नष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न हिचेच - मीपणाचे - बळ वाढवित असतो. म्हणून (स्वरूपप्राप्तिसाठी) कृपाळूपणानें ही स्वतःच नाहीशी होऊन साधकाचा विवेकमार्ग मोकळा करून देते. ॥३८॥ (नाथिली = नाहीशी, मिथ्या)

सकळ मायेचें स्वरूप जालें । त्यांत तुझेंहि स्वरूप आलें ॥
हें इतुकेंहि आपुलें । नको मानूं सर्वथा ॥३९॥

याप्रमाणे हे मायेचे वर्णन झाले. त्यातच तुझेही रूप - तुझे मीपण - आले. तुझ्या ध्यानात आलेच असेल की, हे सर्व शाश्वत टिकणारे नाही. म्हणून आता तू याला आपले कधीच मानू नकोस. ॥३९॥

आतां सांगतों तुज खूण । तुंवां नाशिवंत केलें मदार्पण ॥
आतां करीसी आळकेपण । तरी मज शब्द नाहीं ॥४०॥

आता वर्म सांगतो ते नीट ऎक. वचन दिल्याप्रमाणे हे सर्व नाशिवंत मला अर्पण करण्याच्या मिषाने, तू पूर्वीच टाकिले आहेस. आता याचा जरासा सुद्धा अभिलाष धरशील तर मग मात्र तुला स्वरूपप्राप्ति करून देण्याविषयी मी जबाबदार राहणार नाही हे ध्यानात ठेव. ॥४०॥ (आळकेपण = अभिलाष)

संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ॥
म्हणोनि संगनिःसंगातीत । हो‌उनी राहे ॥४१॥

शारीरिक वा मानसिक कसलेहि साहचर्य नाशिवंतच होय. निःसंग हा शब्दही शाश्वत नाही. म्हणून तू आता संग आणि निःसंग या दोहोंपासून अलिप्त राहा, त्यांचा अभिलाष धरू नकोस. ॥४१॥ (संग = साहचर्य)

आतां पुढील निरूपण । आदरें करावें श्रवण ॥
संगातीत होइजेल ते खूण । सांगिजेल पुढें ॥४२॥

संगातीत व्हायचे कसे त्याचे वर्म आता पुढल्या समासात सांगू. ते श्रद्धापूर्वक लक्ष देऊन श्रवण कर. ॥४२॥

इति श्रीआत्माराम । रामदासीं विश्रामधाम ॥
योगी पावती विश्राम । जये ठाई ॥४३॥

याप्रमाणे रामदास्यांचे - मुमुक्षूंचे - केवळ माहेरघरच असलेल्या या आत्माराम ग्रंथाचा दुसरा समास सांगून झाला. येथे योग्यांना सुद्धा पूर्ण समाधान लाभेल. ॥४३॥ (विश्रामधाम = विश्रांतीचे माहेरघर, विश्राम = पूर्ण समाधान, तृप्ति)

समास दुसरा संपूर्ण

समास ३ रा

ब्रह्मनिरूपण

या समासात ओवी १-६ पूर्वसमासातल्या (२।४२) ओवींशी संबंधित संगनिःसंगातीत होण्याची खूण सांगून, ७-१५ आत्मस्वरूप कसे बृहत्, निर्मल, परिपूर्ण, दूर-जवळ, आत-बाहेर, अचल, अदाह्य, अक्लेद्य, अस्तेय, कल्पांतीहि अक्षुण्ण आहे याचे सूक्ष्म निरूपण आहे. ओवी १७-२१ पुन्हा मायावर्णन करून, २२-२६ अहंकाराचा पराक्रम सांगितला आहे. ओवी २७-३३ मायातीत कसे व्हावे याचे वर्म सांगून, ३४ मध्ये प्रत्यक्ष स्वरूपनिर्देष आहे. ओवी ३५ मध्ये त्याच्या प्राप्तिसाठी साधनाची आवश्यकता आहे असे प्रतिपादून ३६ मध्ये पुढल्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

संग तितुका नाशिवंत । सांडून राहावें निवांत ॥
येकपणाचाहि अंत । जालियां समाधान ॥१॥

(दुसऱ्या समासातील ४२ व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे संगातीत होण्याचा मार्ग सांगतात.) जेव्हढा म्हणून संग आहे - ज्याची ज्याची मनाला ओढ लागते - तो सर्व मायिक अथवा नाशिवंत असल्याने त्याचा त्याग करून शांत राहावे. अशा प्रकारे एकांताचा अनुभव घेता घेता त्या एकटेपणाच्या जाणिवेचाहि लय झाला म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होते. ॥१॥ (बाह्यसंग हाहि मनामुळेच होत असल्याने त्याचे निराळे वर्णन येथे केलेले नाही आहे.)

येकपणाचा उमस । काढितां, त्रिपुटी सावकास ॥
होत आहे, म्हणोनी व्यास । येकपणाचा नसो ॥२॥

या एकत्वाचा केवळ 'अहं' या प्रत्ययाचा जो आवेग असतो त्याचे मुद्दाम निराकरण करू गेले असता, कर्ता, कार्य व क्रिया अशी त्रिपुटी नकळत उत्पन्न होते. तात्पर्य मी पणा काढू गेले असता उलट मी पणच वाढत जाते. म्हणून उत्तम मार्ग म्हणजे मीपणाच्या वृत्तीचा ध्यासच लागू नये. तिची जाणीवच होऊ नये. ॥२॥ (उमस = आवेग, स्फूर्ति; सावकास = स अवकाश = काही काळाने, सहजच, नकळत)

तो मी आत्मा ऎसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं ॥
उन्मनी अवस्थेचा प्रांतु । तें स्वरूप तुझें ॥३॥

शिष्य म्हणतो, "याला उपाय म्हणजे अहं ब्रह्मास्मि - तो आत्मा मीच होय - ही जाणीव". तर याला सद्‌गुरु सांगतात, "ही ही जाणीवच असल्याने नाशिवंतच होय. ती सुद्धा तू सोडली पाहिजेस. ब्रह्मत्वाच्या अनुभवाच्या वेळी, अत्यंत सूक्ष्म का होईना, जाणीव ही असतेच, तिच्यावाचून अनुभव येणेच शक्य नाही. तिचाहि निःशेष लय झाल्यावर जी निरालंब, मनातीत, अवर्णनीय अशी परमशांत स्थिती उरते, तेच तुझे सत्यस्वरूप होय. ॥३॥ (हेतू = जाणीव, उन्मनी = मनातीत, प्रांत = स्थिती)

ऎसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामध्यें आला ॥
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥४॥

एवढेच नव्हे तर या मनातीत निरतिशय शान्तीचाहि जो अनुभव येतो तो अर्थातच जाणिवेच्या सूक्ष्मतम अस्तित्वामुळेच, जाणिवेच्याहि जाणिवेनेच. हा कितीहि सुखमय वाटत असला तरी तोही नाशिवंतच होय. । हा अनुभवाचा रसास्वादहि ज्याला समजला तो अनुभवातीत असा आत्मा होय आणि तूच तो आहेस. ॥४॥

हेंहि न घडे बोलणें । आतां पाऱ्हेरा किती देणें ॥
वेद शास्त्रें पुराणें । तेंहि नासोनि जाती ॥५॥

बाळा ! या अनुभवातीत आत्मरामाची ओळख शब्दांनी ती किती करून देऊ बरें । वेद, शास्त्रे, पुराणें, जी याच्या वर्णनाकरिताचा अस्तित्वात आली, तीही शेवटी, याचे वर्णन करता करता थकून गप्प बसली. त्यांनाहि या स्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन शब्दांनी पूर्णतया करता आले नाही. ॥५॥ (पाऱ्हेरा = शाब्दिक ओळख)

ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ॥
ये मायेचा स्पर्श जाला । नाहींच तयासी ॥६॥

अध्यात्मिक ग्रंथ जितके काही या स्वरूपाबाबत सांगतात तें सर्व केवळ दोषमात्रच होय. शाखाचंद्रन्यायाप्रमाणे आत्मस्वरूप त्याहून वेगळे रहाते. असल्या वर्णनाने ते प्रत्यक्ष दाखविता येत नसून केवळ लक्षित मात्र होते. तात्पर्य ग्रंथांची ही शाब्दिक माया, ते मायातीत असल्याने त्याला स्पर्शू शकत नाही. ॥६॥ (स्पर्श करणे = हेच ते म्हणून बोट ठेवून प्रत्यक्ष दाखविणे)

स्वरूप निर्मळ आणि निघोंट । स्वरूप सेवटचा सेवट ॥
जिकडे पहावें तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥७॥

स्वरूप मलरहित - जाणिवेला न कळणारे - असले तरी ते परिपूर्ण घनदाट आहे. सर्व दृश्यादृश्य व्यवहाराचा शेवट जाणिवेत होतो व या जाणिवेचाहि शेवट - अंत झाल्याने अनुभवातीत असा अनुभव येतो. याप्रमाणे संहारणीने म्हणजे व्यतिरेकाने त्याचा एकदा साक्षात्कार झाल्यानंतर उभारणीने म्हणजे अन्वयाने पाहू जाता जिकडे तिकडे सर्वत्र सर्वदा तेच ते एकमेव भरलेले आहे हे प्रत्यक्ष स्पष्ट होते. ॥७॥ (अहं स्फूर्ति हाच मल, निर्घोट = घनदाट, ओतप्रोत, परिपूर्ण सन्मुख होणे = स्पष्ट होणे)

जें बहु दुरीचा दुरी । जे निकटचि जवळीं अंतरीं ॥
दुरी आणि अभ्यांतरीं । संदेहचि नाहीं ॥८॥

त्या स्वरूपाचे अस्तित्व इतके परिपूर्ण आहे की अत्यंत दूरवर वा अतिशय जवळहि तेच ते असल्याची जाणीव स्पष्ट होते; इतकेच काय तर या जाणिवेचेहि स्वरूप मूलतः तेच ते असल्याने जेथे जेथे आतबाहेर, कुठेहि पाहू तेथे तेथे एकमेव केवळ त्याचाच साक्षात्कार निस्संदेहाने होत असतो. मीपणाचा मळ गेल्यावर ही जाणीव इतकी मृदु, सूक्ष्मतम पारदर्शक होते की आतबाहेर प्रत्येक अणूरेणूतून त्याचाच साक्षात्कार होतो; इतका की आपणही पूर्णतः तेच ते असल्याचा निःशंक स्वानुभव येतो. ॥८॥

जें सकळांपरीस मोठें । जेथें हें सकळही आटे॥
अकस्मात येकसरें तुटे । मूळ मायेचें ॥९॥

सर्वत्र एकमेव त्याचेंच दर्शन होत असल्याने, मग 'मी तो सर्व' अशी नेहमीची सकळपणाची - अनेकत्वाची - भिन्न भावनाहि नाश पावते. दुसरे म्हणून दाखविता येणारे काहीच नाहे हे आता पटल्याने एकत्वाची जाणीवहि शेवटी विरून जाते. त्यामुळे मायेंचे मूळ अशी जी अहं प्रत्यग्वृत्ति तीही अकस्मात विरून जाते. ॥९॥ (आटे = विरते)

जे सकळाहून मृद कोंवळे । जें सकळांहून अत्यंत जवळे ॥
जें सकळांमध्यें, परी निराळें । अलिप्तपणें ॥१०॥

जर स्वरूपाचा अनुभवच इतका सूक्ष्मतर, प्रसन्नमय, कोंवळा, लुसलुशीत, हवाहवासा, सुखद वाटतो; तर ते स्वरूप त्याहून किती तरी सूक्ष्मतम, आल्हादायक असेल बरे ! या स्वानुभवाहुनहि ते अतिशय जवळ आहे, इतके की ते प्रत्यक्ष आपणच आहोत ! या सकळ सृष्टीमध्येहि तेच ते आहे; परंतु या सकळपणाचा, अनेकत्वाच्या भावनेचा मात्र त्याला स्पर्श होत नाही. अर्थात अनेकत्वापासून ते अलिप्त आहे. ॥१०॥ (मृद = प्रसन्नमय, सूक्ष्म, सुखद)

जें हाले ना चाले । जे बोले ना डोले ॥
आवघें आपणचि संचलें । येकलें येकटचि तें ॥११॥

'येथे आहे, तेथे नाही' अशी स्थिती नसलेले, परिपूर्ण असे ते स्वरूप असल्याने त्यात यत्किंचतहि हालचाल संभवत नाही. त्यात दुसरेपणाची भावनाच नसल्याने सांगणे - वागणेहि घडत नाही. सर्वत्र तेच ते एकमेव, एकत्वहि गिळून, त्याच्यातच तन्मयतेने समरसून विरजत आहे. ॥११॥ (संचले = परिपूर्ण समरसले)

जें आकाशासबाह्य भरलें । आणि आकाश जेथें मुरालें ॥
आकाश मुरोनिया उरलें । येकजिनसी आपण ॥१२॥

पंचमहाभूतात अती सूक्ष्म म्हणूनच सर्वात व्यापक असे जे आकाशतत्त्व, त्याच्याहि अंतर्बाह्य, त्याहूनहि अत्यंत सूक्ष्म असे ते स्वरूप भरलेले आहे. आकाशही जेथे आकाशत्वाने - वेगळेपणाने राहू शकत नाही असे हे स्वरूप असल्याने, सर्वत्र केवळ तेच ते एकटे एकच विराजमान आहे. ॥१२॥

जें जळे ना ढळे । अग्निमध्यें न जळे ॥
जे चळत्यामध्यें, परी न कळे । उदकीं बुडेना ॥१३॥

वायू चलनवलन करतो; पण त्यातले अस्तित्व मात्र जे स्वरूप, ते काही चळतवळत नाही. अग्नी इतरांस जाळून स्वतःहि विझतो; परंतु त्यातले स्वरूपभूत अस्तित्व मात्र जळत-विझत नाही. जलात असूनही ते अस्तित्व स्वरूप जलमय होत नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीत्वाच्या विकारी पदार्थातही तेच असते परंतु त्याला - त्या अस्तित्वाला धक्का लागत नाही. तात्पर्य, सर्वहि पंचमहाभूतात हे अस्तित्वस्वरूप ओतप्रोत भरलेले असूनही त्यांच्या गुणांपासून पूर्णपणे अलिप्त आहे. ॥१३॥ (चळत्यामध्यें = विकारी पदार्थांत)

जयास कोणीच नेईना । चोरूं जाता चोरवेना ॥
कल्पांत जाला तरी वेंचेना । अनुमात्र ॥१४॥

केवळ अस्तित्वमय असे स्वरूप असल्याने, त्यास कोणीच नेऊ वा चोरू शकत नाही; कारण कर्त्यात वस्तूत व वस्तूच्या अभावातहि अस्तित्व हे असतेच. त्यामुळे कल्पांती महाप्रलयात सर्वांचाहि नाश झाला तरी या अस्तित्वात अणुमात्रहि कमी अधिक होणे शक्य नाही. ॥१४॥

जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये । जेथे आकार भस्मोनी जाये ॥
सांगितले ते साकार होये । म्हणोनि सांगणे न घडे ॥१५॥

ज्ञानरूपी डोळा इतर सर्व पाहू शकेल पण त्याचे स्वतःचे अस्तित्व मात्र त्याला उमगत नाही. कारण येथे रूप आणि त्याचे ज्ञान, ही दोन्ही शिल्लक रहात नाहीत. ज्याचें वर्णन म्हणून करता येते ते सर्व साकार अर्थात नाशिवंत होय. तात्पर्य, या अविनाशी निराकारस्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन पूर्णपणे करता येत नाही. ॥१५॥

ऎसें जरी न बोलावें । तरी म्यां काये करावें ॥
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥१६॥

निर्विकार निर्गुण अशा आत्मस्वरूपाबाबत बोलताना मला अशी सुकृतदर्शनी परस्परविरोधी वाटणारी भाषा बोलावी लागते. पण काय करणार? जर बोललोच नाही तर तुला तरी त्याचे आकलन कसे बरे होणार? ॥१६॥

अरे बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते ॥
अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥१७॥

अरे बाळा ! शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे हे खरेच; परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात तुझ्या अनुभवाला येऊ शकेल आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच आपले सत्यस्वरूप होय. ॥१७॥

मायारूप मूळ तयाचें । शोधीन म्हणता समाधान कैचें ॥
'मज लाभ झाला'या सुखाचें । मूळ तुटे ॥१८॥

कारण की त्या अनुभवाचे रूपहि मायामयच असणार. अनुभव, अनुभाव्य, अनुभविता अशी त्रिपुटी तेथे उत्पन्न होत असल्याने या अनुभवाच्या मागे लागण्यात - त्याच्या संशोधनात - शाश्वत समाधान कसे मिळणार बरे? म्हणून निरपेक्ष, शाश्वत समाधानाच्या प्राप्तीसाठी वरील त्रिपुटीमय अनुभाव्य सुखाचे मूळ तोडलेच पाहिजे, त्याचाहि त्याग केला पाहिजे. ॥१८॥ (मूळ तोडणे = नाश करणे)

'अहंब्रह्मास्मि' हा गाथा । आला देहबुधीचिया माथा ।
देहबुधीनें परमार्था । कानकोंडे होईजे ॥१९॥

'मी ब्रह्म आहे' हा अनुभव; जरी याचे कितीहि गोडवे गाइले तरी मीपणावरच आधारित असल्याने, तेथे हा अत्यंत सूक्ष्म असा जाणीवमय महाकारणदेहहि आहेच. कशीहि झाली तरी ही देहबुद्धीच - अहंकारच - या 'अहं' काराने खऱ्या स्वरूपप्राप्तीस मात्र मुकावे लागते. ॥१९॥ (कानकोंडे होणे = मुकावे लागणे)

देहबुधी हे टाकावी । हेहि मायेची उठाठेवी ॥
म्हणोनी काय अंगीकारावी ? । अंगीकारूं नये ॥२०॥

या अहंकारास टाकण्याची धडपड हाहि त्या अहंकाराचाच एक भाग. तात्पर्य, उपाय करू गेल्यास अपायच होणे शक्य. कारण हा सर्व मायेचाच खेळ होय. आता जर तू असे म्हणशील की अहंबुद्धी सोडूच नये तर असे मात्र नव्हे. हिच्या आहारी कधीहि न जाणेच योग्य होय. ॥२०॥

मायेच्या बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ॥
मायाचि गोंवी, आणि बंधन । तोडी, तेही माया ॥२१॥

पूर्वीच (समास २।३६) सांगितल्याप्रमाणे या मायेच्या कृपेनेच ब्रह्मज्ञ होणे शक्य आहे आणि ज्ञानान्त समाधानहि अर्थातच तिच्यामुळेच होणार. म्हणून बंधनात (मी-माझे) गुंतविणारी मायाच आणि बंधन तोडणारीहि (मी ब्रह्म) मायाच. ॥२१॥

माया आपणास आपण गोंवी । आपणास आपण वेढां लावी ॥
प्राणी दुखवती जीवीं । अभिमानें करूनि ॥२२॥

पूर्वी (समास २।२०) सांगितल्यानुसार मायाच मायेकरवी सर्व काही करीत असते. ही माया (ममत्व) स्वतःस गुंतवून घेते व ममत्वानेच हळूहळू ममत्वाचे वेढे वाढत जातात. असे असून 'मी बद्ध झालो' अशा तऱ्हेचे दुःख जे सर्व प्राण्यांना होते त्यास कारण या ममत्वाचा अभिमान ते घेतात हेच होय. ॥२२॥

जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मागोन आणिती ॥
खेळों बैसता वांटून घेती । आपुल्याला ॥२३॥

सारीपाटाचा खेळ खेळताना कोणाच्या तरी सोंगट्या मागून आणून प्रत्येक भिडू 'माझ्या ह्या' म्हणून वाटून घेऊन, नंतर खेळावयास बसतात. ॥२३॥

नसताचि अभिमान मायां । सारी मरता परम वेथा ॥
डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥२४॥

या 'माझ्याच' सोंगट्या असा खोटा अभिमान धरून (खेळाडू) खेळात सोंगटी मेल्याने फार दुःखी होतात, किंवा जिंकून हर्षाने फुलतात. इतकेच नव्हे तर आपापल्या डावाच्या वेळेस सोंगटी जिंकावी म्हणून इरेस पडतात. ॥२४॥

फांसयास दे दे म्हणती । येक ते चिरडी येती ॥
क्रोधां पेटल्या घेती । जीव येकमेकाचा ॥२५॥

(ते खेळाडू) इरेस पडून, जिंकण्यास पाहिजे असलेले दान निर्जीव फाश्यांकडे मागतात. ते न पडले तर चिडतात. इर्षेने संतप्त होऊन कधी कधी एकमेकांचा जीवही घेतात. तात्पर्य ज्या मुळातच आपल्या नाहीत, त्या सोंगट्या आपल्याच आहेत असा खोटाच अभिमान घेतल्याने त्यांना सुखदुःख , चिडाचीड, हाणामारी इ. सर्व भोगावे लागते. ॥२५॥

तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ॥
अभिमान वाहाती शिरीं । देहपांग प्रपंचाचा ॥२६॥

त्याचप्रमाणे या संसारखेळातील, मायेच्या सोंगट्याच जशा अशा स्त्री, पुत्र, कन्या इ. 'माझ्या माझ्या' म्हणून (खोटा अभिमान धरून), त्यांची जबाबदारी स्वीकारून या व्यवहारातले सुखदुःख बहुतेकजण भोगीत असतात. ॥२६॥ (देहपांग = सुखदुःखादि भोग)

येवं इतुकी वेढा लाविली । ते माया खेळे येकली ॥
ते मायेनेंच वारिली । पाहिजे माया ॥२७॥

याप्रमाणे सर्वजण या ममतेत - मायेत गुरफटले गेले आहेत. प्रपंचाचा हा सर्व खेळ ती मायाच एकटी खेळत आहे; असा विवेक करून, तिचे (अहंममतेचे) निराकारण मायेनेच (अहंब्रह्मास्मि जाणिवेनेच) केले पाहिजे. तिच्या एका अविष्काराचे निर्मूलन तिच्याच दुसऱ्या अविष्काराने, काट्यानेच काटा काढतात त्याप्रमाणे केले पाहिजे. ॥२७॥

ते माया तोडितां आधीक जडे । म्हणोनी धरिती ते वेडे ॥
धरिता सोडितां ते नातुडे । वर्म कळल्यावांचुनि ॥२८॥

हे ममत्व (माया) तोडू जाता, 'मी तोडली' असे मी पण (मायाच) वाढत जाते, उपायाचा अपायच होतो. तात्पर्य, मायेचा अंगीकार वा त्याग करणे हे तिचे वर्म (रूप) कळल्यावाचून शक्य नाही. असे जरी असले तरी जे हिच्यातच (मायेतच) जास्त जास्त गुरफटत जातील ते वेडेच होत. ॥२८॥

जैसें चक्रविहूचे उगवणें । बाहेर येउनी आंत जाणें ॥
कां भीतरीं जाउनी येणें । अकस्मात बाहेरी ॥२९॥

ज्याप्रमाणे चक्रव्यूहाला फोडावयाचे असल्यास बाहेरून आत जाणे व आतून बाहेर येणे अशा चक्राकारच फेऱ्या विलक्षण गतीने कराव्या लागतात. ॥२९॥

कां त्या कोबाडीयांच्या कडीया । गुंतगुंतोनी उगवाव्या ॥
तैसी जाण हे माया । गुंतोनि उगवावी ॥३०॥

ज्याप्रमाणे कड्यांच्या गुंतावळ्यातील कड्या परत परत एकमेकांत गुंतवून सोडवाव्या लागतात, त्याचप्रमाणे या मायेतून सुटण्यासाठी तिच्यात आधी गुंतणे जरूर आहे. तात्पर्य, मायेचे वर्म कळण्यासाठी तिचा अनुभव घेणे आवश्यक आहे. ॥३०॥

माया झाडितां कैसी झाडावी । तोडून कैसी टाकावी ॥
येथें विचारें पाहावी । नाथिलीच हे ॥३१॥

माया हा काही एखादा पदार्थ नव्हे की तिला झाडून दूर सारता येईल किंवा तोडून फोडून टाकून देता येईल. हे शक्य नाही कारण 'माया आपुली कल्पना' म्हणून विवेकाने तिच्याकडे पाहिले तर मात्र ही वितळून जाईल, न असलेली अशीच आढळेल. ॥३१॥ (नाथिली = न असणारी, मिथ्या)

बहू नाटकी हे माया । मीपणें न जाये विलया ॥
विवेकें पाहतां देहीं या । ठावोचि नाहीं ॥३२॥

ही माया अतिशय लाघवी आहे. अहंकाराने प्रयत्न करूनहि तिचा नाश होणार नाही. कारण अहंकार (मीपण) हीहि मायाच ! मात्र विवेकाने पाहिले असता आपल्या देहात मीपण नावाच्या एकाही वस्तूचा (मायेचा) ठावठिकाणा सापडत नाही. 'या मा सा माया !' जी नाही तिचा मागमूस तरी कसा लावावा बरे ! ॥३२॥

वर्म हेंचि माया माईक । याचा करावा विवेक ॥
विवेक केलियां, अनेक । येकीं मुरे ॥३३॥

माया ही मायिकमात्र आहे. कल्पना ही केव्हाहि काल्पनिकच होय. हेच तिचे वर्म होय. आत्मानात्माविवेकाने अनेकविध भासणारी ही माया एकत्वात अर्थात स्वरूपात विलीन होते. ॥३३॥

येकीं अनेक आटलें । येकपण अनेकासवें गेलें ॥
उपरी जें निःसंग उरलें । तेंचि स्वरूप तुझें ॥३४॥

एकत्व व अनेकत्व ह्या कल्पना परस्परसापेक्ष होत. जेथे कल्पनाच विराम पावली तेथे हे अनेकत्व व ते ज्यात मुरते ते एकत्वहि शिल्लक उरत नाही. 'कल्पनेने कल्पना सरे !' अहं या कल्पनेचा मूळ विवेकहि जेव्हा झालेला नसतो तेव्हा जे निःसंग निर्विकार असे उरते तेच तुझे स्वरूप होय. ॥३४॥

तुझे स्वरूप तुजचि न कळे । तें जया साधनें आकळे ॥
तें साधन ऎक, सोहळे । भोगिसी स्वानंदाचे ॥३५॥

असे नुसते म्हटल्याने काही तुला स्वरूपाचे आकलन झाले नाही, खरे ना हे? बाबा रे ! त्याला साधन पाहिजे. ज्या साधनाने स्वरूपप्राप्तीच्या स्वानंदाचे सोहळे तू भोगू शकशील ते साधन सांगतो, ऎक ! ॥३५॥

इति श्रीआत्माराम । सांगेल पुढील साधनवर्म ॥
जेणें भिन्नत्वाचा भ्रम । तुटोन जायें ॥३६॥

याप्रमाणे या आत्माराम ग्रंथाचा तिसरा समास सांगून झाला. ज्यायोगे भिनत्त्वाचा भ्रम नष्ट होईल ते साधन आता पुढल्या समासात सांगण्यात येईल. ॥३६॥

समास तिसरा संपूर्ण

समास ४ था

साधननिरूपण

या समासात ओवी १-६ पूर्वसमासातल्या (३-३५) ओवींशी संबंधित मुख्य साधन म्हणजे श्रवण मनन निदिध्यासाने आत्मनिवेदन हे सांगून, ओवी ७ मध्ये ग्रंथ कोणते ऎकावे, वाचावे हे स्पष्ट केले आहे. ओवी ८ मध्ये शिष्याची साधनाविषयीची अनास्था असून, ओवी ९-१३ मध्ये त्याची ही भ्रांति फेडली आहे. त्यामुळे 'काहीच नाही !' अशी शून्यत्वाची कल्पना बळावू नये म्हणून दक्षतेने ओवी १४-१५ त शून्यत्वखंडण केले आहे. ओवी १६-१७ शून्यत्व का निर्माण होते ते सांगून १८-१९ अंतर्बाह्य दृश्य हे स्वरूप नसल्याचे स्पष्ट केले आहे. ओवी २०-२८ उपासनेविषयी शिष्याची शंका असून, २९ अखेर तिचे निरसण आहे. पुनरपि ओवी ३१-३१ अंतर्दृश्याचे निराकरण करून ३४ अखेर उपासनेचे महत्त्व पटवून दिले आहे. ओवी ३५ मध्ये शिष्याचा अनुभव विचारून ३६ मध्ये पुढल्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जें सकळ साधनांचें सार । जेणें पाविजें पैलपार ॥
जेणें साधने अपार । साधक ते सीध जाले ॥१॥

(तिसऱ्या समासातील ३६ व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे आता मुख्य साधन सांगतात) सर्वहि साधनात श्रेष्ठ असे जे साधन की ज्याच्या योगाने भवसागर निश्चितपणे तरून जाता येतो आणि ज्यामुळे अगणित साधक आजपावेतो सिद्ध म्हणजेच मुक्त झालेही आहेत, ते साधन सांगतो, ऎक. ॥१॥

तें हे जाण रे श्रवण । करावे अध्यात्मनिरूपण ॥
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥२॥

ते साधन म्हणजे अध्यात्मनिरूपणाचे अत्यादराने, अंतःकरणपूर्वक श्रवण करावे. त्याचे मन नाहिसे होईतो मनन करणे अर्थात शोध घेणे आणि अशा वेळी जी उन्मनी स्थिती होते ती निदिध्यासाने (सतत अभ्यासाने) दृढ करणे हेच होय. यामुळेच समाधान प्राप्ति होते. ॥२॥

संत सज्जन महानुभावीं । परमार्थचर्चा करीत जावी ॥
हईगई सर्वथा न करावी । ज्ञातेपणेंकरूनी ॥३॥

संत सज्जन अशा श्रेष्ठ, स्वानुभव्यांच्या संगतीत आदराने अध्यात्मचर्चा नित्य श्रवण करीत जावी. 'मी ज्ञाता आहे' या केवळ शाब्दिक अशा शास्त्रभिमानाने श्रवणाची कधीहि टाळाटाळ करू नये. ॥३॥ (महानुभावी = महाअनुभवी, स्वानुभवी)

परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि आहे तत्त्वतां ॥
दिवसंदिवस शुधता । वृत्तीस होये नीच नवी ॥४॥

अशा परमार्थ चर्चेचा नित्य व्यासंग केला असता, दिवसानुदिवस वृत्ती शुद्ध, निर्मल होत जाते. हाच मुख्यतः असल्या चर्चेचा लाभ होय. ॥४॥ (उठाठेवी = व्यासंग, नीच नवी = नित्यनूतन)

श्रवण आणि मनन । या ऎसें नाहीं साधन ॥
म्हणोनी हें नित्य नूतन । केलें पाहिजे ॥५॥

अंतःकरणपूर्वक श्रवणमनन यासारखे साधन नाही. नकळतच मलिन होणारी वृत्ति यामुळे त्वरित निर्मल होते. म्हणून हे श्रवणमननाचे साधन नित्यनेमाने केले पाहिजे. नाविन्याविषयी जी उत्सुकता असते तसल्या आदराने हे केले पाहिजे. रोज तेच ते असे समजून कंटाळता कामा नये. ॥५॥

जैसे ग्रंथीं बोलिलें । तैसेंचि स्वयें पाहिजे जालें ॥
येथें क्रियेच्या माथां आलें । निश्चितार्थे ॥६॥

श्रवणात ग्रंथातील जसे निरूपण आपण ऎकतो, तसेच आपण स्वतः झाले पाहिजे. ते निरूपण अंगी बाणले पाहीजे. तसे होण्यासाठी क्रियेची म्हणजे साधनांची वा प्रयत्नांची आवश्यकता निस्संशय आहेच आहे. ॥६॥

जे ग्रंथी जो विचार । वृत्ती होये तदाकार ॥
म्हणोनी निरूपण सार । भक्ति ज्ञान वैराग्य ॥७॥

ग्रंथातील निरूपणाने श्रोत्यांची वृत्ति संस्कारित होत होत, तदाकार बनत असते, म्हणून विषयांचे वर्णनात्मक लौकिक साहित्य कामाचे नसून, भक्तिज्ञान वैराग्यवर्धक श्रेष्ठ अध्यात्मनिरूपणाचे ग्रंथच श्रवण करीत जावे. ॥७॥

तो शिष्य म्हणे स्वामी सर्वथा । सत्य करावी प्रतिज्ञा ॥
नाशिवंत घेऊन, साधनां । वरपडें न करावें ॥८॥

तोंच शिष्याने नम्रतेने हटकले की, "महाराज ! आपण सर्व जाणतच आहात. मागील आपली प्रतिज्ञा (१।३५-३६) आपण सत्य करावी. मजकडून अपेक्षिलेले नाशिवंत सर्व घेऊन, आता मला साधनाच्या कचाटीत कृपा करून अडकवू नका." ॥८॥

अरे शिष्या चित द्यावें । नाशिवंत तूंवा वोळखावें ॥
सांधन न लगे करावें । प्रतिज्ञाच आहे ॥९॥

अरे बाळा ! नीट लक्षपूर्वक ऎक. साधन करावे लागणार नाही. माझी ती प्रतिज्ञा मला मान्यच आहे ! परंतु त्यासाठी तू नाशिवंताला नीट ओळखले पाहिजेस. नुसत्या शब्दाने 'नाशिवंत' दिले (१।३६) असे बोलून भागणार नाही, तर तू प्रत्यक्ष सोडले पाहिजेस. ॥९॥ (चीत = चित्त)

प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऎसें बोलतो हा कोण ॥
नाशिवंत केले मदार्पण । त्याहिमध्यें तो आला ॥१०॥

बाबारे ! 'प्रतिज्ञा खरी करावी' असे बोलणारा हा आता कोण उरला आहे बरें? जरे सर्वहि नाशिवंत तू मला अर्पण केलेस तर त्यात पूर्वीच (२-३९) सांगितल्याप्रमाणे, हे बोलणारा तूहि आलासच. ॥१०॥

तूं म्हणसी जें दिधलें । तरी देयास कोण उरलें ॥
जे उरलें तें झुरलें । मजकडे ॥११॥

आताहि जे 'नाशिवंत आपणास दिले' असे तू म्हणतोस त्यातून ते देणारा हा तुझा 'मी' निराळा कसा उरला बरे? जे उरले असे वाटेल ते सर्व जाणिवेच्या प्रांतात असल्याने, नाशिवंतच असून, ते तर मदार्पण झालेले आहे. तात्पर्य, आता हे बोलणारा कोणी शिल्लक उरतच नाही. ॥११॥

तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कां रे चोरिसी ॥
नाशिवंत देता चकचकीसी । फट रे पढतमूर्खा ! ॥१२॥

याप्रमाणे तू तर नाशिवंतातच आलास; तर मग हे सर्व नाशिवंत देताना स्वतःला - तुझ्या मी ला - का बरे असे लपवून ठेवतोस? प्रतिज्ञा करूनहि तुझ्यासह सर्व नाशिवंत देण्यास आता का असा कचरतोस? पूर्वी (२-४०) नीट समजविले असताही एखाद्या पढतमूर्खाप्रमाणे वागतोस? धिक्कार असो तुझा ! ॥१२॥ (चकचकणें = कचरणे, का कू करणे)

शिष्य विचारून बोले । स्वामी कांहींच नाहीं उरलें ॥
अरे 'नाहीं' बोलणेंहि आलें । नाशिवंतामध्यें ॥१३॥

या भडिमाराने अंतर्मुख होऊन, जरासा विचार करून शिष्य कबूल करतो की, "महाराज ! आपले म्हणने मला पटले. नाशिवंत ते सर्व दिल्यावर बाकी खरोखर काहीच (ते देणारा मी सुद्धा) उरले नाही. " ही नाहीपणाची जाणीव (हे शून्यत्व) घालविण्यासाठी सद्‌गुरु त्वरितच उद्‌गारले की "अरे शहाण्या ! काहीच उरले नाही हे बोलणेहि नाशिवंतामध्येच आले की रे !" ॥१३॥

आहे म्हणतां द्या कांहीं । नाहीं शब्द गेला तोही ॥
नाहीं नाहीं म्हणतां कांहीं । उपजलें कीं ॥१४॥

'उरले आहे' असे वाटले तर ते मला दिले पाहिजेस, नसेल तर 'नाही' हा शब्दहि त्या नाशिवंतासवें अगोदरच दिला गेलेला आहे ! 'नाही, काहीच उरले नाही' असे आता म्हणताना काही तरी राहतेच की रे ! आणि ते म्हणजे 'नाहीच नाही' असे वाटणारी जी ही नाहीपणाची - शून्यत्वाची जाणीव, तिचा जाणणारा कोणीतरी. ॥१४॥

येथें सुन्याचा निरास आला । आत्मा सदोदित संचला ॥
पाहों जातां साधकाला । ठावचि नाहीं ॥१५॥

याप्रमाणे शून्यत्वाचा जाणता हा असतोच या खुलाशाने शून्यत्वाचे निराकरण झाले. शून्य हे खरोखरी शून्य नसते हे स्पष्ट झाले. शिष्याला अगोदरच 'मीही नाही' हे पटलेले आहे. शून्यत्वाचा निरास तर झालाच आणि आत्मस्वरूप तर सदोदित सर्वत्र विराजमान असल्याचे पूर्वीच (३-७ते१४) स्पष्ट झालेले असल्याने, आता 'हा साधक' असे वेगळेपणाने दाखविण्याला वावच उरला नाही. ॥१५॥

अभिन्नज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होतां धन्य ॥
वेगळेपणे वृत्तिसून्य । पावती प्राणी ॥१६॥

म्हणून वेगळेपण सोडून जो स्वरूपी पूर्णपणे एकवटला तोच खरा ज्ञानी होय. साधकपणाचे भिन्नत्व जाऊन जो साध्यच - स्वरूपच होईल तोच खरोखर धन्य होय. तात्पर्य, जो स्वतःला विसरून केवळ स्वरूपच होईल तोच खरा ! अन्यथा वर (१४) सांगितल्याप्रमाणे वेगळेपणाने राहू जाता 'काही नाही' या शून्यत्वाच्या भावनेत मात्र तो अडकून पडेल, फसेल. ॥१६॥

वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ॥
'आत्माहि दिसेसा नाहीं' मता- । वरपडे होती प्राणी ॥१७॥

अशा रितीने भिन्नत्वाने साधन करू गेले तर मोक्ष - ऎक्यता केव्हाहि प्राप्त होणार नाही; परंतु शून्यत्वात मात्र फसावे लागेल. आत्मा हा काही दृश्य पदार्थ नव्हे म्हणून वेगळेपणे त्याची प्राप्ति केव्हाहि शक्य नाही. परंतु यामुळेच असे फसलेले लोक आत्मा वगैरे काही नाही असे शून्यमताचे अट्टाहासाने प्रतिपादन करतात. ॥१७॥

आपुलिया डोळा जें देखिलें । तें पंचभूतांमध्यें आलें ॥
ऎसें जाणोनी दृढ धरिलें । ते नाडले प्राणी ॥१८

(अथवा काहीजण प्रकाश, बिंदु, नाद, प्रणव, साक्षित्व इ. अंतर्दृश्यालाच - आध्यात्मिक खुणांनाच स्वरूप मानून बसतात. म्हणून स्पष्ट सांगतात की,) जे ज्ञानदृष्टीला कळते - ज्याचे म्हणून दर्शन होते ते सर्व पंचभौतिकच होय. मग ते अती सूक्ष्म तन्मात्रामय का असेना. ते काही शाश्वत स्वरूप नव्हे. असे असूनही तेच स्वरूप (अंतिम सत्य) म्हणून जे अट्टाहासाने मानतात, ते पूर्णपणे बुडाले, फसले असेच म्हणावे लागते. ॥१८॥ (डोळा = अंतर्दृष्टि)

जो पंचभूतांचा दास । तयास मायेमध्यें वास ॥
भोगी नीच नव्या सावकास । पुनरावृत्ती ॥१९॥

मग जे केवळ पंचभौतिक दृश्यांचे, या प्रपंचाचे दास झाले असतील; तर त्यांचे जीवन केवळ मायामयच होय. त्यामुळे त्यांना नित्य नवी पुनरावृत्ती भोगावीच लागणार. त्यांना जन्ममरण परंपरा वा सुखदुःखादि द्वंद्वे सुटणार नाहीत. ॥१९॥

तों शिष्यें विनंती केली । म्हणे आशंका उद्‌भवली ॥
पंचभूतांची सेवा केली । बहुतेकीं ॥२०॥

पंचभौतिकांची ही निंदा ऎकून शिष्याने विनंती पृच्छा केली की, "महाराज ! मला एक शंका आली आहे. कृपया तिचे समाधान करावे. बहुतेकांनी पंचमहाभूतांचीच - देवदेवतांचीच सेवा उपासना केलेली आहे, आणि - ॥२०॥

सकळ सृष्टीमध्ये जन । साधु संत आणि सज्जन ॥
करिती भूतांचे भजन । धातुपाषाणमूर्ती ॥२१॥

आजपावेतो जे साधू, संत, सज्जन या जगात झाले त्यांनी तर या देवदेवतांच्या धातुपाषाणादिक मूर्तींचेच म्हणजेच जड (दृश्य) पंचभौतिकांचे भजनपूजन केलेले आहे. इतकेच नव्हे तर - ॥२१॥

जे कोणी नित्यमुक्त जाले । तेहीं धातुपूजन केलें ॥
तरी ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाहीं ? ॥२२॥

जे जीवन्मुक्त म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनीही पंचमहाभूतांचीच उपासना केलेली आहे. आपण तर पंचमहाभूतांची उपासना करणाऱ्यांना पुनरावृत्ती घडते (१९) असे म्हणता; तर मग ह्या महापुरुषांना पुनरावृत्ती घडली की मोक्ष मिळाला? ॥२२॥

ऎसा शिष्याचा अंतर्भाव । जाणॊनि आनंदला गुरुराव ॥
म्हणे सीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥२३॥

शिष्याच्या मनातील भाव ऒळखून, उपासनेविषयी त्याचे प्रेम जाणून; सद्‌गुरु आनंदित झाले. शुष्क ज्ञानाचा उपयोग तो काय? सूक्ष्माहंकार घालविण्यासाठी समर्पणासारखे साधन दुसरे नसल्याने शिष्याची ओढ बघून त्यांना विश्वास वाटला की, हा आता लवकरच स्वानुभवारूढ होऊ शकेल. ॥२३॥

ऎसें विचारूनिया मनीं । कृपादृष्टीं न्याहाळूनि ॥
शिष्याप्रती सुवचनीं । स्वामी बोलते जाले ॥२४॥

असा विचार करून, आपल्या कृतार्थ करणाऱ्या कृपादृष्टीने शिष्याला अवलोकून, श्रीसद्‌गुरु प्रेमळवाणीने त्याच्याशी पुढे बोलू लागले. ॥२४॥

प्राणी देह सोडून जाती । परी वासनात्मक शरीरें उरती ॥
तेणें पुनरावृत्ती भोगिती । वासना उरलिया ॥२५॥

प्राण्यांचे जीव स्थूलदेह सोडल्यानंतरहि, वासना उरल्याने सूक्ष्म देहाने असतात; व त्या अतृप्त वासनांच्या तृप्तीसाठी पुनरपि योग्य तो स्थूलदेह ते धारण करतात. याप्रमाणे स्थूलातून सूक्ष्म व त्यातून परत स्थूल अशा त्यांच्या पुनरावृत्ती, वासनेमुळे होतच असतात. ॥२५॥

मूळ या स्थूलदेहाचें । लिंगदेह वासनात्मक साचें ॥
राहाणें तया लिंगदेहाचें । अज्ञानदेहीं ॥२६॥

याप्रमाणे स्थूलदेहाला - या दृश्य शरीराला - कारण हा वासनामय लिंगदेहच - अदृश्य सूक्ष्म शरीर - होय. हे दोन्ही आकारात्मक असतात. वासना अज्ञानामुळे संभवते; म्हणून या सूक्ष्म देहाचें राहण्याचे ठिकाण त्याचें कारण - अज्ञानरूपी देह म्हणजेच कारणशरीर होय. ॥२६॥

कारण देह तोचि अज्ञान । आणि 'तो मी आत्मा' ऎसें ज्ञान ॥
तया नांव माहाकारण- । देह बोलिजे ॥२७॥

जे अज्ञान तोच कारणदेह आणि 'तो आत्मा मीच आहे' असे जे ज्ञान म्हणजे जे अज्ञानरूपी कारणाचेहि कारण, त्यालाच महाकारणदेह असे म्हणतात. हे दोन्ही वृत्यात्मक असतात. ॥२७॥ (ज्ञान आणि अज्ञान । दोन्ही वृत्तिरूपें समान ॥ --- दासबोध)

तरी मनाचा थारा तुटला । म्हणजे भवसिंधु आटला ॥
प्राणी निश्चितार्थे सुटला । पुनरावृत्तीपासुनी ॥२८॥

ज्ञान व अज्ञान या वृत्तीच असल्याने, वृत्तीला आधारभूत जे मन तेच जर नाहिसे झाले तर परत वृत्ति उत्पन्न होणार नाहीत आणि अर्थातच मग पुनरावृत्तीपासून तो सुटला - मुक्त झाला हे निश्चित होय. ॥२८॥ (मनाचा थारा = मनाचा आधार)

हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ॥
निःसंग आणि निर्मळ । आत्मा होईजें स्वयें ॥२९॥

ममतेरहित निःसंग व मीपणाविरहित निर्मल असे आत्मस्वरूप स्वतः आपणच आहोत असे अनुभवणे हेच तू विचारलेल्या (ओवी २० ते २२) भक्तीचे फळ होय. या भजनपूजनामुळे जन्ममरणरूपी संसृतीचे मूळ जो अहंकार तोच नष्ट होतो. ॥२९॥

संगातीत म्हणिजे मोक्ष । तेथे कैचें देखणे लक्ष ॥
लक्ष आणि अलक्ष । या दोहींस ठाव नाहीं ॥३०॥

'मी - माझे' या ओढीतून सुटणें, संगातीत होणे, म्हणजेच मोक्ष होय. जेथे 'मी' च नाही तेथे तो लक्ष्य ते कसले ठेवणार वा पाहाणार ते काय? तात्पर्य, दृश्य जे लक्ष्य व त्याचा अलक्ष्य - अदृष्ट द्रष्टा या दोन्हींसहि या मुक्तस्वरूपी वावच नाही. ॥३०॥

आत्मा म्हणोनी देखणीयास मिठी । घालू जातां मोक्षाची तुटी ॥
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥३१॥

असे असल्याने आत्मा म्हणून जर अंतर्खुणांनाच (ओवी १८) मानले तर दृश्य व द्रष्टा हे दोन्ही तेथे असल्याने मोक्ष अशक्य होतो हे आता स्पष्टच झाले. म्हणून ही सर्व मतमतांतरे सोडून लगबगीने आत्मनिवेदन करावे. अर्थात मीपण निःशेष नाहीसे करावे. ॥३१॥ (देखणें - अतर्दृश्य (Mystic signs)

प्राप्त जाले अद्वैतज्ञान । अभिन्नपणें जे विज्ञान ॥
तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथे मी-तूंपण नाहीं ॥३२॥

'मी तेच आहे' (अहं ब्रह्मास्मि) असे अद्वैतज्ञान प्राप्त झाल्यावर, 'मी' व 'ते' हे अतिसूक्ष्म भिन्नत्वहि जाऊन एकत्वाचा अनुभव आला म्हणजे ज्ञानाचे विज्ञान झाले, यालाच आत्मनिवेदन असे म्हणतात. येथे मीपण (ते समर्पित झाल्याने) व तू पण (द्रष्टा मीपणच नसल्याने) दोन्हीहि असू शकत नाहीत. ॥३२॥ (ज्ञान होणे - जाणीव होणे. विज्ञान होणें - अनुभव येणे)

ऎसी स्थिती जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ॥
जाणोनि भक्ति केली, दासाची । आवडी देवास अत्यंत ॥३३॥

ज्याला अशी आत्मनिवेदित स्थिती प्राप्त झाली त्याला पुनरावृत्ती ती कोठली? तू ज्यांच्याबाबत विचारले होतेस (ओवी २०-२२) त्यांनी 'मी तोच आहे" या भावनेने भक्ति केली म्हणून ते मुक्तच होत. अशा ज्ञानी भक्तांची श्रीप्रभूस अत्यंत आवडी प्रीति असते. ॥३३॥

पूर्वी दासत्व होतें केलें । त्याचें स्वामीत्व प्राप्त जालें ॥
आणि तयाचें महत्त्व रक्षिलें । तरी थोर उपकार कीं ॥३४॥

स्वानुभवहि असाच आहे. त्याच भावनेने मीसुद्धा पूर्वी दास्यत्व - पांचभौतिकाची सेवा केली म्हणून तर आज स्वामित्व स्वरूप स्थितीचा अधिकार पाप्त झालेले दिसते आहे. म्हणून जर त्या भक्तीचे माहात्म्य आम्ही राखले तर त्यात बिघडले कुठे? एकतर कृतज्ञता व दुसरा तुम्हा साधकांवर मार्गदर्शनाचा उपकार अनायासे होतोच कीं !!

आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार घेणें ॥
आणि मजपाशी सांगणे । अनुभव आपुला ॥३५॥

बरें, हे बोलणे आतां राहू दे. तू नाशिवंताबाबत नीट विचार कर आणि ते सर्वहि तू टाकले आहेस किंवा नाही याचा निवाडा घे. नीट विचार करून तुझा अनुभव तू मला सांग. ॥३५॥

आतां पुढिलीये समासीं । शिष्य सांगेल अनुभवासी ॥
दृढ करूनिया तयासी । सांगती स्वामी ॥३६॥

आता पुढल्या समासात, शिष्य विचार करून आपला अनुभव सांगेल. तो ऎकून, दृढतेसाठी सद्‌गुरु आणखीही विवेचन करतील. ॥३६॥

इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ॥
ऎका सावध वर्म । आत्मज्ञानाचें ॥३७॥

याप्रमाणे रामदास्यांना - मुमुक्षूंना पूर्णकाम करणारा, स्वरूप साक्षात्कार घडविणारा - जो आत्माराम ग्रंथ त्यातील चवथा समास सांगून झाला. आत्मज्ञानाचे वर्म, जे आता पुढे सांगण्यात येईल, ते लक्षपूर्वक ऎका. ॥३७॥

समास ४ था संपूर्ण

समास ५ वा

स्वानुभवनिरूपण

या समासात ओवी १-६ मध्ये पूर्वसमासातल्या (४/३५-३६) ओव्यांशी संबधित असा आपला अनुभव शिष्य निवेदन करीत असून, ७-१८ सद्‌गुरुचे उपसंहारात्मक विवेचन आहे; त्यातील १४-१५ ओव्यांत बंध व मोक्ष यांचे वर्म सांगितले आहे. ओव्या १९ ते २२ शिष्याच्या प्रशंसेपर उद्‌गारपूर्वक दृढतेसाठी परत उपदेश असून, २३ मध्ये शिष्य पूर्ण साक्षात्कारी झाल्याची सद्‌गुरुंची ग्वाही आहे. ओवी २४-२५ गुरुशिष्य ऎक्याचा सोहळा असून, २६ मध्ये जो कोणी असा शरण निस्संदेह होईल त्यास मोक्षप्राप्ति निश्चित होईल असे ग्रंथमाहात्म्यपर आश्वासन असून, ओवी २७-२८ ग्रंथ समाप्ति आहे.

जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा ॥
सार्थक जालें जी दातारा । तुमच्या कॄपाकटाक्षें ॥१॥

(चवथ्या समासातील ३५-३६ ओव्यांत म्हटल्याप्रमाणे कृतार्थ झालेला शिष्य श्रीगुरुचरणी आता स्वानुभव निवेदन करीत आहे.) हे अनंतकोटीब्रह्मांडनायका, सद्‌गुरुनाथा ! स्वामीराजा ! मायबापा ! आपला जयजयकार असो. भिन्नत्वाच्या भावनेमुळे अनाथ झालेल्या आम्हा जीवांचे आपण प्रत्यक्ष माहेरच - पूर्ण विश्रांतीचे आश्रयस्थानच आहात ! आपल्या कृपावलोकनाने, हे ज्ञानदातारा ! मी धन्य झालो आहे. माझ्या जीविताचे सार्थक झाले. ॥१॥

या मनाचेनि संगति । जन्म घेतले पुनरावृत्ती ॥
माया माईक असोन, भ्रांती । वरपडा जालों होतों ॥२॥

महाराज ! या मनाच्या संगतीने, त्याच्या ऒढीने आजपावेतो अनेक की हो जन्म घेतले ! मिनरूपी (मी - माझे) ही माया केवळ माझीच कल्पना असूनहि, ही खरी असून मला बंधनकारक आहे या भ्रांतीने मी भुललो के हो होतो ! ॥२॥

जी मी मानवी किंकर । येकायेकीं जालों विश्वंभर ॥
संदेह तुटला थोर । यातायातीचा ॥३॥

दयाळा ! केवढे आश्चर्य हे ! किंकर्तव्यमूढ असा एक तुच्छ मानवी जीव मनाचा दास होतो मी आजपावेतो ! परंतु आपल्या कृपेने तत्क्षणीच विश्वहि ज्यापुढे तुच्छ असा विश्वव्यापी, महानाहूनहि महान, परब्रह्म परमेश्वरस्वरूप झालो की हो ! पूर्णत्वाविषयीचा माझा सर्व संदेह आता पार नाहीसा झाला व त्यामुळे सर्व प्रकारच्या त्रासाचा घोरहि कायमचा मिटला. ॥३॥ (यातायात = त्रास)

मी संसारींहून सुटलों । पैलपार पावलों ॥
मीच सकळ विस्तारलों । सर्वांभूतीं ॥४॥

स्वामिराजा ! दुरतिक्रम अशा जन्ममरणाच्या या संसृतीपासून मी आता कायमचाच मुक्त झालो. चिंतेच्या या दुस्तर महासागराला ओलांडून - पार करून - आता मी सुखी झालो; कारण सर्व चराचरात स्वरूपतः मीच व्यापून असल्याचा विलक्षण अनुभव आपल्या कृपेने मला आला आहे. ॥४॥

मी करून अकर्ता । मी परेहून पर्ता ॥
मजमध्यें वार्ता । मीपणाची नाहीं ॥५॥

गुरुनाथा ! 'मी' जाणिवेचाहि जाणता आहे असा अनुभव आल्याने, तनमनाने हे सर्व कर्म करीत असूनही, स्वरूपतः मी अकर्ताच आहे ! मी हा आत्माराम इतका परिपूर्ण आहे की,..... पण काय करू? येथे मीपणाची तर वार्ताच - मागमूसहि - नाहि, त्यामुळे हा स्वानुभव आता महाराज ! आपल्याला सांगू तरी कसा हो? ॥५॥

ऎसें जें निजबीज । गाळीव मीपणाचा फुंज ॥
तो मुरलियां सहज । सीधचि आदिअंती ॥६॥

सर्व अनर्थाचे बीज जो 'मीच ब्रह्म' असा अतिसूक्ष्म ज्ञानगंड तोही आता आपल्या कृपेने दयाळा, निशेःष विरून गेला. त्यामुळे या अहंकारभ्रांतीच्या पूर्वीचे, निरतिशय, निर्विकल्प, निर्विकार असे जे आत्मस्वरूप ते आता जसेच्या तसेच अक्षुण्ण, विलसत आहे. ॥६॥ (गाळीव = गाळलेला, अतिसूक्ष्म)

ऎसा शिष्याचा संकल्पु । जाणोनि बोले भवरिपु ॥
संसारसर्प भग्नदर्पु । केला जेणें ॥७॥

संसृतिमूळ जो 'अहं' रूपी सर्प त्याचा गर्व नष्ट करणारे, त्यास नामोहरम करणारे, जन्ममृत्युचे कट्टर वैरीच जणु असे श्रीसद्‌गुरुनाथ आपल्या कॄतार्थ शिष्याचा वरील प्रमाणे अंतर्भाव जाणून, प्रशंसेने धन्योद्‌गार काढू लागले. ॥७॥

जें स्वामीच्य ह्र्दई होतें । तें शिष्यासी बाणलें अवचितें ॥
जैसें सामर्थ्ये परीसातें । लोहो आंगी बाणे ॥८॥

ज्याप्रमाणे परिसाच्या सामर्थ्यानें तुच्छ लोखंडास सुवर्णाचे दिव्यत्व येते त्याचप्रमाणे या श्रीसद्‌गुरुच्या अमृतमय प्रवचनाच्या अंतःस्पर्शाने त्यांच्यात नित्य विराजमान असलेला निजनिरतिशय शांतीच्या केवलत्वाचा अवर्णनीय भाव अकस्मात्‌ शिष्याच्या ह्रदयात उदित झाला, स्मृतीत जागृत झाला. आपण तेच आहोत याची सनातन संवेदना जागृत होऊन ठसावली. ॥८॥

स्वामीपरीसाचा स्पर्श होतां । शिष्य परीसचि जाला तत्त्वतां ॥
गुरुशिष्याची ऎक्यता । जाली स्वानुभवें ॥९॥

परिसामुळे लोखंडास सुवर्णत्व येते खरे; परंतु परिसत्व मात्र त्यास प्राप्त होत नाही. तसे येथे नसून, सद्‌गुरुरूपी परिसाच्या अंतःस्पर्शाने शिष्यहि परिसच, सद्‌गुरुरूपच झाला. स्वानुभवैक्याने गुरुशिष्य दोघेहि स्वरूपीं तत्त्वतः एकरूपच, अभिन्नच झाले. ॥९॥

गुज स्वामीच्या ह्रदईचें । शिष्यास वर्म तयाचें ॥
प्राप्त जालें योगियांचें । निजबीज ॥१०॥

शब्दाने कधीहि प्रगट न करता येणारा केवल ब्रह्मत्वाचा सद्‌गुरुच्या ठायी विलसणारा अद्वितीय भाव, त्याचे वर्म उमजल्याने, शिष्यास अकस्मात प्राप्त झाला. ऎक्यतेचा योग साधणाऱ्या योग्यांचे जे अत्यंत गहन असे स्वरूपभूतच कैवल्यपद ते आता त्यास प्राप्त झाले, आपण तेच आहोत हे पूर्णपणे (त्याच्या मनीं) ठसले. ॥१०॥

बहुता जन्मांच्या सेवटीं । जाली स्वरूपेसीं भेटी ॥
येका भावार्थासाठीं । परब्रह्म जोडलें ॥११॥

त्यामुळे आता पुनर्जन्म संपलाच. पूर्वीच्या अनेक जन्माच्या शेवटी अर्थात या जन्मी शिष्यास स्वरूपप्राप्ति झाली आणि तीही एका भावबळानेच केवळ ! 'तत्त्वमसि' या सद्‌गुरुवचनावर अंतःकरणपूर्वक श्रद्धा-भाव ठेवल्याने त्यास सच्चिदानंद परब्रह्मपदाची प्राप्ति होऊ शकली. तो स्वतःच ते असल्याचा जगावेगळा अनुभव आला. ॥११॥

जो वेदशास्त्रांचा गर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ॥
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्‌भावें ॥१२॥

सर्व वेदशास्त्रांची प्रवृत्ति त्यांच्या अंतरीचा गुह्यभाव असे जे स्वयंपूर्ण निर्गुण निरतिशयानंद परमात्मास्वरूप; ते प्रगट करण्यासाठीच असते. तरीहि त्यांच्या (वेदांच्या) केवळ अभ्यासाने त्याची (परमात्म्याची) प्राप्ति मात्र होत नाही. सद्‌गुरुवचनांवर असलेल्या श्रद्धेच्या भावबळाने मात्र त्याची प्राप्ति पूर्णपणे-पूर्ण ऎक्याने त्या शिष्यास झाली. ॥१२॥ (येकसरां - एकसराने, अखंड, पूर्णपणे.)

जे ब्रह्मादिकांचें माहेर । अनंत सुखाचे भांडार ॥
जेणे हा दुर्गम संसार । सुखरूप होये ॥१३॥

असे हे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप, सृष्टीचे नियामक असे सर्व श्रेष्ठ ब्रह्मा आदि देवतांचेहि विश्रांतीचे केवळ माहेरघरच होय. सुखाच्या भावनेलाहि जन्म देणारे असे हे अविनाशी, अवीट स्वात्मसुखाचे भांडारच होय. एरवी दुरतिक्रम वाटणारा हा संसृतीचा महासागर, त्या स्वरूपाच्या प्राप्तिमुळे सुखपूर्वक क्षणात तरून जाता येतो. ॥१३॥

ऎसें जयास ज्ञान जालें । तयाचें बंधन तुटलें ॥
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥१४॥

असा ज्याला स्वरूपसाक्षात्कार झाला त्याचे सर्व बंधन तुटलें, तो मुक्त झाला. हे बंधन वास्तविक नसून केवळ काल्पनिकच असल्याने, खरे पाहता कोणालाच ते नाही. परंतु अज्ञानाने 'मी जीव मज बंधन' या अविवेकाच्या भ्रांतीने, या जीवांनी आपल्याला संसारात दृढ बांधून घेतले आहे. ॥१४॥

संदेह हेचिं बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ॥
निःसंदेही समाधान । होये आपैसें ॥१५॥

आपल्या ब्रह्मत्वाविषयी दृढ विश्वास नसणे हेच खरे बंधन होय; कारण यामुळेच पुढे मी-ममता-संसार ही बंधपरंपरा निर्माण होते. हा अविश्वास पूर्णपणे नष्ट होणे हेच खरे ज्ञान होय. नुसते शाब्दिक ज्ञान तृप्तिकारक नसते. तात्पर्य, श्रीगुरुकृपेने हा विश्वास दृढ बाणला की मग साहजिकच या निजनिरतिशय तृप्तीचे समाधान प्राप्त होते. ॥१५॥

प्राणीयास माया सुटेना । अभिमानें त्रिपुटी तुटेना ॥
वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥१६॥

सद्‌गुरुंच्या 'तत्त्वमसि' या अमृतवचनांवर दृढविश्वास एवढेच मोक्षाचे सोपे कारण असूनही काय करावे पहा! या जिवांना 'मी - माझे' ही आसक्ती सुटत नाही. मी कर्ता या अभिमानामुळे कर्ता, कर्म, क्रिया ही त्रिपुटी व अर्थातच पुढील सर्वहि अनर्थ परंपरा काही केल्या त्यांना सोडवत नाही. तात्पर्य, त्यांची वृत्ति या अभिमानाने मलिन झाल्यानेच स्वस्वरूपाकडे स्फूर्तिरूपाने ती झेपावू शकत नाही. ॥१६॥

जे मायाजाळीं पडिलें । ते ईश्वरासी चुकले ॥
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनी ॥१७॥

जे जीव या अहंममतारूपी मायेच्या जाळ्यात सापडले ते अर्थातच त्यात जास्त जास्तच गुरफटत गेले. उत्तरोत्तर नवनव्या वासनांच्या बंधनांनी जखडतच गेले. त्यामुळे ते आपल्या ईशत्वापासून - आत्मस्वरूपापासून जणु च्युत म्हणजे पतित झाले, आपल्या निर्बंध स्वरूपाला विसरले. ॥१७॥

जयाचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त जालें ॥
तयाचें बंधन तुटलें । निःसंगपणें ॥१८॥

ज्याचे दैव - दिव्यत्वाची जाणीव उदयाला येते अर्थात हे सर्व दुःख भोगण्यासाठी काही आपण नसून आपण कॊणीतरी महान असायला पाहिजे व ते आपण कोण ही जिज्ञासा ज्याच्या ठायी जागृत होते तो तिच्या तृप्तीसाठी श्रीगुरुंना शरण जातो व त्यांच्या कृपेने तो खरा कोण याचे ज जान त्याला प्राप्त होते. या ज्ञानाचाही संग सुटल्यावर, पूर्णपणे मीपणाविरहित झाल्यावर त्याचे सर्व बंधन आपोआपच नष्ट होते. ॥१८॥ (दिव्यते इति देवः, तस्य कारणं दैवम्)

सर्वसाक्षी तुर्या अवस्था । तयेचाहि तूं जाणता ॥
म्हणोनी तुज निःसंगता । सहजचि आली ॥१९॥

सामान्यतः जाणीव तीन प्रकारची दिसून येते. १) जागृत, ज्ञानमय २) स्वप्न, मूढत्व (शून्यत्व) मय ३) सुषुप्त - अज्ञानमय. या तिन्ही प्रकारच्या जाणिवेला जाणणारी जी शुद्धसत्त्वमय जाणीव ती चवथी म्हणून तिला तुर्या असे म्हणतात. ही सर्व काही जाणते म्हणून सर्वसाक्षिणी असते. ही अशी आहे असे जाणणारा तूच स्वतः असल्याने तुला - तुझ्या स्वरूपाला निःसंगता साहजिकच आहे आणि म्हणूनच आता तुला कसलेच बंधन उरले नाही. ॥१९॥

आपणासी तूं जाणसी । तरी ही नव्हेसी ॥
तूंपणाची कायेसी । मात स्वरूपीं ॥२०॥

आता तू स्वतःला निःसंग आत्माराम म्हणून ओळखलेस; तरी पण हे जाणणारा तुझा तूपणा (मी पण) काही तो आत्माराम नव्हे ! तुझ्या त्या आत्मस्वरूपी या जाणत्या तूपणाची - तुझ्या जाणत्या मीपणाची मातब्बरी ती काय? ॥२०॥

जाणता आणि वस्तु । दोनी निमाल्या उर्वरीतु ॥
तूंपणाची मातु । सहजचि वाव ॥२१॥

जाणणारा आणि जाणली जाणारी परब्रह्मवस्तु - ज्ञेयस्वरूप - या दोहीचेंहि प्रथम वेगळेसे वाटणारे भान मावळल्यानंतर, जे जाणिवेतीत असे निरतिशय निर्विकल्प शिल्लक रहाते तेथे या तूपणाचे तुझ्या मीपणाचे अस्तित्व यत्किंचितही नाही हे ओघानेच सहज स्पष्ट होते. ॥२१॥

आतां असो शब्दपाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ॥
कां जें नाशिवंत सकळ । मदार्पण केलें ॥२२॥

आतां शब्दवडंबर पुरे झालें । मीपणासुद्धा सर्वहि नाशिवंत, मला अर्पण करण्याच्या मिषाने, तू निःशेष टाकिलेस. त्यामुळे आता पुनर्जन्माचे कारण संपले, आता तू मुक्त झालास. ॥२२॥

जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत, राहिलें ॥
तुझे तुज प्राप्त जालें । अक्षईपद ॥२३॥

आब्रह्म जे जे काही तुझ्या जाणिवेत आले ते ते सगळे नाशिवंतच असे समजून त्याचा तू खरोखरच त्याग केलास. आता राहिले ते केवळ सर्वातीत अविनाशी निर्विकल्प असे स्वरूपच फक्त ते तूच असल्याने, माझ्या वचनाप्रमाणे तुला आता ते प्राप्तच झालेले आहे. ॥२३॥

ऎसें बोले मोक्षपाणी । ऎकोन शिष्य लोटांगणी ॥
निःसंदेह स्वरूपमिळणीं । दोघे येकचि जाले ॥२४॥

मोक्ष देणे हे केवळ ज्यांच्याच हाती आहे, ज्यांच्या कृपाकटाक्षानेच केवळ स्वानुभवप्राप्ति होऊ शकते असे स्वानुभवसम्राट सद्‌गुरुमहाराज आपल्या सच्छिष्याची निजप्राप्ति बघून प्रसन्नतेने वरीलप्रमाणे (ओवी २३) उद्‌गारते झाले. हे ऎकताच तो कृतार्थ शिष्य न-मनपूर्वक सद्‌गुरुचरणावर पडला, लोटला. सापेक्ष अशा शिष्यत्व व गुरुत्व या दोन्ही उपाधी आता संपल्यामुळे स्वस्वरूपी दोघेहि केवळ एकच झाले ! या दोघांचाही स्वानुभव आता निःसंदिग्धपणे एकच ठरला. ॥२४॥

ऎसा कृपाळु स्वामीराव । आदिपुरुष देवाधिदेव ॥
शिष्यास निजपदीं ठाव । ऎक्यरुपें दिधला ॥२५॥

असे अहेतुक (स. १/१९) कॄपाळु श्रीसद्‌गुरुनाथ, की जे प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपच होत, त्यांनी त्या शिष्याला त्याचे शिष्यत्व - लघुत्व घालवून स्वात्मपदी स्वस्वरूपी अखंड अभिन्नतेने आसरा दिला. तात्पर्य, आपली आत्मस्थिति त्यासहि बाणवून दिली. ॥२५॥

जो शिष्य स्वामीस शरण गेला । आणि संदेहावेगळा जाला ॥
तेणें जन्म सार्थक केला । जो देवांसी दुल्लभु ॥२६॥

याप्रमाणे जो शिष्य सद्‌गुरुंना शरण जाऊन, त्यांच्या कृपेने स्वरूपाविषयी निःशंक झाला त्यानेच केवळ हा देवदुर्लभ मानव जन्म, मोक्षप्राप्तीमुळे सार्थक केला असे म्हणावे लागेल. ॥२६॥

ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें । बोलताती अपारें ॥
परी अर्थासी कारण, येरें । येरा चाड नाहीं ॥२७॥

शिष्टरूढीनुसार ग्रंथाचे शेवटी महात्म्यवर्णन इ. पुष्कळ स्तुतिवचने असतात. सद्‌गुरु श्रीसमर्थ म्हणतात की या स्तुतीचा उपयोग तो किती? खरे हित ग्रंथातील भावार्थ बाणल्यानेच होणार. त्याचे विवरण तर पूर्वीच झालेले आहे; म्हणून आता शाब्दिक पाल्हाळाची गरज नाही. ॥२७॥

इति श्री आत्माराम । रामदासीं पूर्णकाम ॥
निःसंदेह जालें अंतर्याम । सद्‌गुरुचरणीं ॥२८॥

याप्रमाणे रामदास्यांना - मुमुक्षूंना पूर्णकाम करणाऱ्या ह्या श्री आत्माराम ग्रंथातील शेवटचा ५ वा समास सांगून झाला. निस्संदेहाने निर्मल झालेले अंतःकरण श्रीसमर्थसद्‌गुरुनाथचरणी समर्पित झाले, स्वरूपस्थित झाले. ॥२८॥

समास ५ वा संपूर्ण
(एकंदर ओव्या १८३)

॥ श्रीसद्‌गुरुनाथार्पणमस्तु ॥

सौजन्य:
लेखक: श्री. भास्करबुवा रामदासी