पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/224

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बसून खेद व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. ज्या अनुयायांचे संरक्षण मी करू शकत नाही त्यांना लढा सुरू करा असा आशीर्वादही मी देऊ शकत नाही. म्हणून तुमच्या आंदोलनाला माझा आशीर्वाद नाही. यावर बिंदूंनी विचारले, मग तुमचे म्हणणे असे आहे काय की आम्ही आंदोलन सुरूच करू नये? यावर वल्लभभाई म्हणाले, असाही सल्ला मी देऊ शकत नाही. कारण जनतेचे आंदोलनच जर नसेल तर हैदराबाद भारतात कधीच येणार नाही. यासाठी तुम्ही लढा सुरू केलाच पाहिजे, अत्याचार सहन केलेच पाहिजेत. त्यावर बिंदू म्हणाले, आम्ही जाणीवपूर्वक सर्व अत्याचार सहन करायचे ठरविले आहे. तसे आम्ही अत्याचार सहन करतो. पण तुम्ही आम्हाला आशेचा एखादा शब्द तरी द्याल? की आम्ही नुसताच निराशेच्या वातावरणात लढा सुरू करावा? तेव्हा वल्लभभाई म्हणाले, मी जर जिवंत असेन (वल्लभभाई अत्यंत आजारी अवस्थेत होते.) तर मी तुम्हाला एक शब्द देतो. हा लढा एक वर्षभर संपणार नाही. किमान एक वर्ष तुम्हाला अत्याचार सहन करणे भाग आहे. पण हा लढा मी दोन वर्षे शिल्लक राहू देणार नाही. एक वर्ष तुम्हालाच सर्व भोगले पाहिजे. जास्तीत जास्त दोन वर्ष. दोन वर्षांच्या आंत म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणपन्नासच्या आत हा प्रश्न संपला नाही व तोवर मी जिवंत राहिलो तर तो सोडविण्याची हमी मी देतो. पंधरा ऑगस्ट अठेचाळीसपर्यंत हा प्रश्न का सुटणार नाही ते लक्षात घेण्याची जबाबदारी तुमची. आता लढा सुरू करायचा की नाही याचा निर्णय तुम्ही घ्या.

 हे ऐकून कार्यकर्ते परत आलेले होते. लढ्याचा जो ठराव स्वामी रामानंद तीर्थांनी मांडलेला आहे त्यावर बोलताना ते म्हणाले आहेत की एखाद्या फेरीमध्ये हा लढा संपेल असे कुणी मानू नये. कमीत कमी वर्षभर हा लढा चालणार आहे. हे लक्षात घेऊन वर्षभर अत्याचार सहन करायला तुम्ही तयार आहात का? तशी तयारी असेल तर मला सांगा. नाहीतर आपण हा ठराव पास करायला नको.

 मी बिंदूंना नंतर विचारले होते या सर्वांचा अर्थ काय? वल्लभभाई काय म्हणत होते? बिंदू म्हणाले, त्या वेळेस अर्थ कळला नव्हता. नंतर कळला. मी स्वामीजींनाही विचारले होते त्यांना वल्लभभाईंचे म्हणणे कळले होते का? स्वामीजीही म्हणाले, त्या वेळेस कळले नव्हते, नंतर कळले. त्या वेळेस अर्थ कळला नाही याविषयी तक्रार नाही. पण त्या पुढाऱ्यांना नंतर जो अर्थ कळला तो आपण समजून घेतला पाहिजे. वल्लभभाई असे सुचवीत होते की भारत स्वतंत्र झाल्यावरही लॉर्ड माऊंटबॅटन हेच गव्हर्नर जनरल

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२६