पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चालवायला किती अफाट प्रचंड खर्च येतो याची जाणीवही आपणाला नाही. वीस हजार भूमिगत कार्यकर्ते शस्त्रास्त्रानिशी नऊ महिने पोसायचे तर किती खर्च लागतो याचा हिशोब प्रत्येकाने थोडे गणित करून मनाशी करावा.

 आता मी जनतेच्या आंदोलनाचा निरोप घेऊन वाटाघाटीकडे वळतो. वाटाघाटीही महत्त्वाच्या आहेत. वाटाघाटीसाठी हैदराबादहून गेलेल्या निजामी शिष्टमंडळाचे अध्यक्ष निजामाचे पंतप्रधान छत्तारीचे नवाब होते आणि जनरल सेक्रेटरी नबाब अलियावर जंग होते. हे त्या वेळी पुढील पदे भूषवीत होते. घटना समितीचे सचिव, कायदे मंडळाचे सचिव, निजामाचे खास सल्लागार, निजामाचे रेसिडेंटच्या दरबारातील खास वकील, निजामाचे व्हाइसरॉयच्या दरबारातील खास वकील इ.इ. असे हे लोकविलक्षण कर्तृत्वाचे गृहस्थ त्या शिष्टमंडळाचे जनरल सेक्रेटरी होते. मोईन नबाबजंग एक सभासद. हिंदूंच्या वतीने पिंगल व्यंकटराम रेड्डी हे सभासद. या वाटाघाटी जून अठरापासून सुरू झाल्या. अठरा जूनलाच आमचा लढ्याचा ठराव, अठरा जूनलाच वाटाघाटीची पहिली फेरी. या वाटाघाटी ज्या चालल्या त्या हैदराबाद भारतात विलीन व्हावे या मुद्द्यावर चालल्या नाहीत तर आम्हाला वऱ्हाड द्या, आम्हाला रायलसीमा द्या, आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या या मुद्द्यावर चालल्या. या वाटाघाटी फसल्या आहेत हे तीन ऑगस्टला स्पष्ट झाले. तेव्हा माऊंटबॅटन यांनी निर्णय घेतला की हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत हैदराबादचा प्रश्न सुटू शकत नाही.

 एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. ती जनता आंदोलनाचाच भाग आहे फसलेल्या वाटाघाटी सोडून ती मध्येच सांगतो. आंदोलन सुरू होण्यापूर्वी संस्था काँग्रेसने काही कार्यकर्ते वल्लभभाईंच्या भेटीस पाठविले. जे पुढच्या कृतिसमितीचे अध्यक्ष होणार हे ठरलेले होते ते दिगंबरराव बिंदू यात होते. जे सत्याग्रह करून तुरुंगात जाऊन बसणार असे आधीच ठरलेले होते ते रामानंद तीर्थ यात होते. लढ्यात ठराव पास करण्याच्या आठ-दहा दिवस अगोदर ही मंडळी दिल्लीला जाऊन वल्लभभाईंना भेटली. पुढच्या अधिवेशनात ठराव पास करून आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असे त्यांनी वल्लभभाईना सांगितले. सरदार म्हणाले, मी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. याचे कारण असे की तुमचे आंदोलन सुरू झाल्यावर प्रचंड अत्याचार होतील आणि मी तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुमच्या सर्व जनतेला प्रचंड प्रमाणात अत्याचारांना तोंड द्यावे लागेल. आम्ही येथे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२५