पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२०: शतपत्रे

हात फिरवू व यजमानाची स्तुती करू असे त्यांचे मनात येते, परंतु त्यांस वाटत नाही की, आपण फुकट खाण्याची इच्छा करितो, तशी फुकट खाण्यायोग्य लोकांची चाकरी कोणती करितो ? धर्म कोणास शिकवतो ? व कोणती विद्या वाढवितो ? जसा एखादा अमीर असतो, त्यांस वाटते की, गुलामांनी सर्व प्रकारे सेवा करावी, तद्वत् ब्राह्मणांस वाटते की, आम्ही मोठे आहो. आमची सेवा सर्व लोकांनी करावी, आम्हाकरिता शेते पिकवावी, आम्हाकरिता घरे बांधावी, अन्नछत्र घातले, तरी तेथे फक्त आम्हा ब्राह्मण जातीस मात्र जेवावयास घालावे, इतर जातींस घालू नये, असे त्यांस वाटते.
 ब्राह्मणांनी अन्नछत्रे घातली आहेत, तेथे कोणी ब्राह्मणांखेरीज दुसरा वर्ग जेवील काय? जरी अत्यंत पीडित, रोगी, थकलेला व शूद्र येईल, तरी ते निर्दयपणाने त्यांस नाही म्हणतील. आणि श्रीमंत, धट्टाकट्टा व मूर्खाचा राजा असा ब्राह्मण आला, तरी त्यांस जेवावयास घालतील. तेव्हा हा धर्म कशाचा ? त्यांच्या दुष्ट स्वभावाने एकमेकांत वितुष्टे मात्र पडली आहेत. आणि प्रत्येक जातीचे लोक जसे वेगळाले देशाचे लोक जसे आपसांत भांडतात तसे हे एक देशचे लोक असून, आपल्यात वेगवेगळे देशचे शत्रूप्रमाणे भांडतात, येणेकरून सर्वांची चित्ते फुटली आहेत व कोणामध्ये ऐक्य नाही. हा इतका या देशाचा फायदा ब्राह्मणांनी केला आहे.
 ब्राह्मणांचा धर्म काय, हा प्रश्न जरी पाच हजार ब्राह्मणांचे सभेत केला, तरी त्याचे उत्तर कोणी एकही देणार नाही, परंतु दक्षणा सर्व मागतील. तेव्हा हे भट कशाचे ? जसे इतर जातीचे सुतार, न्हावी, माळी तसेच हे मूर्ख राघूसारखे पढणारे, वेदविक्रयेकरून पोट भरणारे व निर्लज्जपणाने भीक मागून काम न करिता खाणारे आहेत. हे लोकांस सांगत फिरतात की ब्राह्मणांस द्यावे, म्हणजे मोठा धर्म आहे. कुळंब्यास काही देऊ नये. कुळंबी जरी म्हातारा व आंधळा असला तरी चिंता नाही. त्याने मेहनत करावी, हाच त्याचा धर्म आहे. अहाहा ! काय हा आपलपोटेपणा ! ब्राह्मणांस ब्रह्मदेवाने फुकट खावे म्हणून सनद करून दिली आहे काय ? बाजीरावाने ब्राह्मणांस पुष्कळ खावयास दिले. त्याचे ब्राह्मणांच्या आशीर्वादाने काय झाले ? अन्न मात्र व्यर्थ गेले आणि त्याचा नाश व्हावयाचा तो झालाच; तर ब्राह्मणांनी याचा विचार करावा. ब्राह्मणांच्या आशीर्वादाने होणार काय ? जे ईश्वर इच्छील ते घडेल. ब्राह्मणांच्याने काही होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे आणि आजपर्यंत ब्राह्मणांनी अज्ञानी लोकांस फसवून जे खाल्ले, ते आता सर्व उघड व्हावयाची वेळ आली आहे.

♦ ♦