पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २१९

ते असे-
 जर ब्राह्मण लोक आपल्या धर्माप्रमाणे चालावयाचा उद्योग करीत आहेत तर मग मुळी ब्राह्मणवर्णाच्या दोन जाती, एक गृहस्थ व एक भट अशा बहुत दिवस चालू आहेत, याचे कारण काय ? ब्राह्मणांनी विद्याभ्यास करावा हा धर्म सोडून ते गृहस्थ कसे झाले ? याचे कारण मला इतकेच वाटते की, ब्राह्मणवर्ग पहिला थोडा होता, तेव्हा लोकांस त्याचे सहज पालन करता येत होते व पुष्कळ वाढला तेव्हा तितक्यांचे पालन कसे होईल ? बरे, इतके ब्राह्मण अधिक झाले, म्हणून काही आंधळे, पांगळे, लंगडे, रोगी, वृद्ध, बाळ हे कमी झाले नाहीत व त्यांचे पोषणही केले पाहिजे. तेव्हा हे वास्तविक गरीब लोक व शिवाय ब्राह्मण, इतक्यांचे पोषण लोकांच्याने होईना, याजमुळे ब्राह्मणांनी गृहस्थपणा धरून इतर जातीचे रोजगार म्हणजे क्षत्रियांची शिपाईगिरी, वैश्यांचा व्यापार व शूद्राची चाकरी ही सर्व पत्करली व तेणेकरून ब्राह्मणांचे धर्मापासून पतन आपल्या आपण झाले. हे काही नीच लोकांनी केले, असे नाही.
 हल्ली ब्राह्मण लोक तर धर्माप्रमाणे वागण्याचा उद्योग करीत नाहीत; परंतु त्यांचा मोठा उद्योग इतकाच आहे की, कोठे तरी उद्योगावाचून फुकट जेवण मिळावे, असे स्थळ पाहून तेथे शिरावे. धर्माविषयी आपणास काय कळते, याविषयी जर कोणीही ब्राह्मण आपले अंतःकरणात विचार करून पाहील तर त्याचे सहज ध्यानात येईल. ब्राह्मणात फारसे विद्वान व नीतिवान आहेत, असे दिसत नाही. जसे इतर वर्णांचे लोक आहेत, त्याचप्रमाणे हेही आहेत. यांचे अंगी काही ज्ञानाचा थोरपणा नाही व भट तर बहुधा भोजनभाऊ आहेत. आणि गृहस्थ चाकरी व व्यापार करून पोट भरितात. तेव्हा धर्मप्रवर्तक ब्राह्मण आता कोठे आहेत ? कोठेच नाहीत. म्हणून हल्लीचे ब्राह्मणांस इतर जातीचे लोकांपेक्षा अधिक मान देणे योग्य नाही. जर कोणी देईल, तर तो अज्ञानी व आंधळा असावा, यात संशय नाही. ब्राह्मणांची बुद्धी अशी आहे की, सर्व अधिकार व द्रव्य आपल्यास असावे व विद्येचा थोरपणा घालवून ते द्रव्याचा थोरपणा पाहू लागले आहेत. आता जर कोणी शूद्र जातीचा कारकून झाला, तर सर्व ब्राह्मण लोक त्याजकडे डोळे वटारून पाहतात, त्यांस असे वाटते की, आमचा धर्म लिहिणे- पुसणे करावयाचा असून कुणबी आमचा वृत्तिच्छेद करतात.
 सारांश, त्यांस धर्मात थोरपणा आहे, तसाच सांसारिक थोरपणा असावा म्हणजे आपण सर्वांहून मुख्य होऊन बसावे, असे वाटते. आपण राजाप्रमाणे राहू, सर्व रयत काम करील. आम्ही मांडीवर मांडी चढवून खात जाऊ, पोटावर