Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१८ : शतपत्रे

असे ज्यांस वाटेल, त्यांस मात्र अधिकारावर ठेवावे. इतर ब्राह्मणांस ठेवू नये. कारण इतर जातीपेक्षा महत्त्वाचे गैरसमजुतीमुळे ते वाईट आहेत; पण हल्ली बहुधा सर्व रोजगार ब्राह्मणांनी बळकाविले आहेत. म्हणजे एकीकडे भटांनी धर्म व दुसरीकडे गृहस्थांनी रोजगार अशा दोन्ही बाजू धरून इतर लोकांस आत येऊ देऊ नये, अशी शक्कल केली होती.
 परंतु ईश्वरास हे कसे आवडेल ? त्याने जी उत्तम योजना करावयाची ती केली. यास्तव आता सर्व जातींचे अधिकारी होतात, हे ठीक आहे. कारण ब्राह्मणांचा गर्व व आढ्यता फार. तेव्हा इतर जात त्यापेक्षा बरी. तसेच ब्राह्मणांचा स्वार्थ पाहण्याचा स्वभाव इतका आहे की, त्यांस आपला नफा मात्र दिसतो. दुसरे काही दिसत नाही. पहा की, शिंदे, होळकर, गायकवाड या सर्वांस पेशव्यांबरोबर राज्ये मिळाली. त्यांची ती अद्यापि कायम आहेत व पेशव्यांचेच बुडाले, याची कारणे काय ? तर यास जी कारणे आहेत ती अशी-
 (१) ब्राह्मण कोणाचे ऐकावयाचे नाहीत. (२) ब्राह्मणांस गर्व फार, याजमुळे ते सर्वांस तुच्छ मानतात व म्हणतात की, आमच्यापेक्षा शहाणा कोण आहे ? (३) देवब्राह्मण यांचे जवळ जवळ नाते आहे. तेव्हा देव आपले रक्षण करील, असे म्हणून ब्राह्मण भलतेच करतात. (४) ब्राह्मणांकडून इतर वर्णांचा द्वेष होतो. (५) ब्राह्मणांस रयत राजी होत नाही. (६) ब्राह्मणांची स्नानसंध्या माजली, म्हणजे राजकीय काम व पराक्रम होत नाही. (७) ब्राह्मणांस अडचणी फार, त्यामुळे प्रवासात हे निभत नाहीत. (८) ब्राह्मणांस सोवळे फार; (९) ब्राह्मण आपल्या लोकांशी द्वेष करतात व परक्यांचे गुलाम होतात, (१०) ब्राह्मण स्वार्थ फार पाहतात आणि त्रास आणतात. (११) यास असे वाटते की, आम्ही ब्राह्मण आहो; कोणी काही दिले तरी त्याचा धर्म झाला म्हणून ते लोकांस नागवितात.

♦ ♦


गृहस्थ आणि भिक्षुक यांचा भेद

पत्र नंबर २१ : १६ जुलई ९८४८

 मागील अंकात एक पत्र आहे. त्यात ब्राह्मणांचे शापापासून नाश होतो व ब्राह्मण स्वधर्माप्रमाणे चालतात, असे वर्णन केले आहे. त्याचे उत्तर लिहितो