पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २१७

किती एक रांडांचे मागे तबले वाजवितात, असे असे निर्लज्ज झाले आहेत, तरी त्यांस असे वाटते की, आम्ही इतके केले, तरी उत्तम कुळंब्यापेक्षा आम्ही चांगले व श्रेष्ठ आहो. यास प्रमाण-

दुःशीलोsपि द्विजः पूज्यो न च शूद्रो जितेन्द्रियः ।
दुःशीलापि दुहेद् गावो न खरीं शीलवर्तिनीम् ॥१॥

अर्थ- चांगल्या शीलाचा नसला तरी ब्राह्मण पूज्य आहे. मोठा जितेंद्रिय झाला, तरी शूद्र पूज्य नाही. यास उदाहरण, गाय लाथाळ असली, तरी तीच दुधास योग्य, गाढवी गरीब असली तरी ती योग्य नाही.
 मला ब्राह्मणांचे व इतर लोकांमध्ये भिन्नपणा काहीच दिसत नाही. ब्राह्मण मरतात, जन्मतात व हातपाय त्यांस इतरांसारखेच असतात. मग इतरांपेक्षा त्यांचे मध्ये काय फरक आहे ? व ब्राह्मणाला गर्व कशाकरिता असावा ? त्याचा मुख्य गुण काय ती विद्या; तिचे तर त्यांचेमध्ये शून्य पडून काळे झाले आहे, तेव्हा आता कोणी काही पाठ करील, तर त्याला तेवढ्यावरून थोर म्हणावे काय ? त्याचा उपयोग काय ? बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या घातल्या तर त्याला जसा त्याचा उपयोग नाही, तद्वत ब्राह्मणांनी पुष्कळ पाठ केले, पण अर्थ ठाऊक नाही व ज्ञान नाही, तर हातात तंबाकू व दुसरे हातात चुना आणि तोंडात वेदपठण, हे तरी उत्तम आहे काय ? तेव्हा असे भ्रष्ट झाले ते ब्राह्मण म्हणावे किंवा त्यांस दुसरे काही म्हणावे ?
 वास्तविक म्हटले तर इतर जातीचे मनुष्यास जातीचा गर्व नसतो वा आपले हलके जातीचे समजुतीमुळे तो नम्रपणाने वागतो आणि ब्राह्मण मूळचा भिकारी असला तरी मी हिऱ्याचे जातीचा आहे, असे समजून जरी कोळसा असला तरी गर्वी असतो व मी सर्वांहून थोर, अशी त्याची समजूत असते. तशात त्यांस पैसा मिळाला किंवा काही सोय झाली म्हणजे तर त्याएवढा गर्विष्ठ कोणी नाही. मग तो कोणास मोजीत नाही. आपला मीपणा मिरवितो.
 आता वास्तविक पाहिले तर कोणत्याही युगात ब्राह्मणास राज्यावर किंवा अधिकारावर कोणी बसविले होते असे नाही. जे विद्वान ब्राह्मण असतील, त्यांचा राजाने सन्मान करून त्यांस संग्रहास बाळगावे, असे आहे; परंतु अधिकाराचे उपयोगी ते नाहीत. हे तर स्पष्ट आहे. ब्राह्मणाकडे राज्य असेल तर इतर जातीचा काय परिणाम होईल ? व ब्राह्मण किती माजोरीपणा करतील ? मला वाटते की, स्वभावेकरून किंवा विद्येचे जोराने जे निर्मळ असतील, ज्यांनी आपला गर्व टाकला असेल व आपण आणि इतर जातीचे लोक सारखे आहेत